तरक्कीपसंद गझलच्या दिशेने जाताना...

  

चित्र : विशाल इंगोले


प्रिय गझल रसिकांनो नमस्कार!

                   ‘गझलकार सीमोल्लंघन २०२१’ चे हे तेरावे वर्ष. अनेक दिग्गज गझलकार आणि आश्वासक नवगझलकारांच्या गझलांसह नव्या वाटेवर मार्गक्रमण करणारा हा विशेषांक आहे. म्हणूनच जगभरातील मराठी गझल रसिकांना हा अंक वैविध्यपूर्ण आनंदानुभूती देण्यास सक्षम ठरेल अशी आशा आहे. 

            आपल्या समोर हा अंक ठेवतांना आनंद आणि दु:खाची संमिश्र अनुभूती व्यक्तीशः आम्हाला होते आहे. आनंद याचा की, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मान्यवर, नवोदित गझलकारांनी भरभरून प्रतिसाद दिला. गझला पाठवल्या. त्यापैकी निवडक गझलांना या अंकात समविष्ट केले आहे. आणि दु:ख याचे की, याच अंकात तीन श्रद्धांजलीपर लेख समाविष्ट करावे लागले. 

                कोणतीही आपदा हा जगणाऱ्या जीवांसाठी परीक्षाकाळ असतो. पास झाला तो तरतो आणि तोच तारतोही. आपदा जशी विनाश घडवते तशीच जगण्याच्या नव्या वाटाही सुचवित असते. गेल्या दीड वर्षापासून कोवीडने सर्वांना घरात बसविले. प्रत्यक्ष भेटी जवळजवळ बंद केल्या. परिणामतः टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटर, पुस्तके जवळची वाटायला लागली. Whatsapp, फेसबुक मित्र झालेत. कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता सुप्तावस्थेत गेलेल्या साहित्यिकांची पिढी सामाजिक प्रसार माध्यमांवर अचानक सक्रिय झाली. अनेक मान्यवर कवी, गझलकारांनी आभासी व्यासपीठावरून मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केल्या. काहींनी मुशायरे आयोजित केले. नवोदितांना लिखाणासाठी / सादरीकरणासाठी प्रेरित केले. आणि जादू झाली. गझलेसारख्या तंत्रशुद्ध काव्यप्रकाराकडे नवी पिढी आकृष्ट झाली. ती प्रयत्नपूर्वक लिहू लागली आहे. चांगले लिहिते आहे. याचा मनस्वी आनंद होतो आहे.   

           गझल ही तंत्रानुगामी गेय विधा. गझलेचे शास्त्र सांभाळून, मोजक्या पण चपखल शब्दांत व्यक्त होणे आणखीनच कठीण. उत्तम काव्यप्रतिभा असणाऱ्या कवीला गझलेचे यामुळेच आकर्षण. मार्गदर्शनाच्या क्षेत्रातही सुरेश भटांनी दिलेल्या बाराखडी व्यतिरिक्त अभ्यास असलेले मार्गदर्शक विरळेच. त्यामुळे चार आंधळे आणि हत्तीच्या गोष्टीसारखीच ही परिस्थिती. आपापल्या समजानुसार प्रत्येकजण मार्गदर्शन करीत असतो. 

             कोणतेही शास्त्र कधीच परिपूर्ण नसते. त्यामुळे मराठी गझल शास्त्राचेही समीक्षण होणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक भाषेचे भाषाशास्त्र, काव्यशास्त्र, उच्चारशास्त्र आणि व्याकरणशास्त्र वेगळे असते. त्यामुळेच भाषेनुसार तंत्रामधेही संशोधन संभवते. हे आपण समजून घेतले पाहिजे. साहित्य कधीही काळाच्या पुढे जात नसते किंवा मागे रहात नसते. ज्या काळात ते लिहिल्या जाते त्याच काळात वाचकांना, समीक्षकांना कळले तरच त्यावर मंथन होते. अन्यथा बाजूला  ठेवल्या जाते. अर्थातच कालबाह्य  होते. त्याअर्थी साहित्य नेहमीच समकालीन असते. काळजाचा ठाव घेणारे, वैश्विक मूल्याधारित साहित्य लोकभाषेत लिहिल्या गेले असेल तरच ते चिरंतन ठरते. संत लोकभाषेत लिहीत. म्हणूनच संतनिर्मित साहित्य अधिक लोकांपर्यंत पोहोचले. गझलेचेही असेच आहे. तंत्र, लय, आशयघनता आणि गेयता ज्यांनी सांभाळली, त्यांची गझल लोकप्रिय झाली. रसिकांच्या भाषेत, काळजाला हात घालू शकणारी, काव्य जपणारी गझलच गझलेचे भविष्य घडवू शकणार आहे. 

            मराठी गझल मागे पडते किंवा पुढे जाते म्हणजे नेमके काय? हा प्रश्न अनेकांना कायम सतावत आला आहे. खरे तर जो ज्या काळात लिहितो तो त्या काळाशी, भाषेशी आणि अभिव्यक्तीशी प्रामाणिक असतो. मग आजच्या कवीच्या काव्याची तुलना ५०-१०० किंवा त्याही पूर्वीच्या कालखंडातील कवीशी, साहित्याशी वा साहित्यिकाशी करून काय साध्य होईल? त्याची निर्मिती त्याच्या कालखंडाशी, रसिकांशी, वाचकांशी तादात्म्य पावते की नाही, हे तपासणे महत्वाचे. 

                मराठी गझलेला वैभव प्राप्त करून देणारे सुरेश भट जेंव्हा सांगतात की ‘शक्यतो अक्षरगण वृत्तातच गझल लिहावी’ तेंव्हा त्यांचा त्यामागील दृष्टिकोन काय असावा? ते अभ्यासायचे सोडून आम्ही मात्रावृत्ताकडे वळत असू तर आमच्यासारखे करंटे आम्हीच. मात्रावृत्तातील यती न सांभाळलेली गझल लय हरवून बसते. स्वर काफियाचा गझलेतील वापर कवीच्या भावविश्वाला व्यापक व्यासपीठ प्रदान करतो पण त्याच वेळी काव्य आणि लालित्य, जो गझलेचा स्थायीभाव आहे तो हरवतो. स्वरकाफियाच्या गझलेत रदीफ नसेल तर ती गझल गद्यप्राय होते. दीर्घ वेलांटी, उकार ऱ्हस्व करण्याची सवलत कवींना आहे. पण शब्दाचा अर्थ बदलत नसला तरी मात्रापूर्तीसाठी शब्दातील ऱ्हस्वाचे दीर्घ करणे म्हणजे शुद्धलेखनाची वाट लावणे होय !  मात्रा गिराना उर्दू अरूजला म्हणजे उर्दू छंद शास्त्राला मान्य आहे.परंतु मात्रा वाढवणारा इजाफा मंजूर नाही. त्यामुळेच तरक्कीपंसद गझलेच्या नावाखाली केले जाणारे मराठी गझलेतील प्रयोग – जसे फक्त मात्रावृत्त, स्वरकाफिया, गैरमुरद्दफ स्वरकाफिया, ‘अ’कारांत स्वरकाफिया, अशुद्धलेखन असे प्रयोग अल्पायुषी ठरण्याचीच शक्यता अधिक आहे. त्यामुळेच कवीने आपल्या प्रवृत्ती आणि प्रकृतीला साजेसे, आनंद देणारे वृत्त निवडून काव्यनिर्मिती केली तर ती अधिक परिणामकारक ठरेल यात शंका नाही.        

           ‘गझलकार सीमोल्लंघन २०२१’ अंकात जवळपास १३० सहभागी गझलकारांच्या सुमारे ४०० गझलांचा आस्वाद आपण या दीपावली पर्वात घेऊ शकणार आहात. अंकाच्या ‘विशेष’ सदरात गझलकार प्रशांत पोरे यांच्या ‘दिवान ए प्रशांत’ या पहिल्या मराठी गझल दिवानच्या निमित्ताने संग्रहातील गझलांच्या अनुक्रमावर समतोल भाष्य करणारा श्रीकृष्ण राऊत यांचा लेख चिंतनीय आहे. हास्यव्यंगाच्या शालजोडीतून जीवनातल्या विरोधाभासावर मार्मिक वार करणारा प्रकार म्हणजे हझल. कालिदास चवडेकरांच्या सहा हझला  आपल्याला विशेष आनंद देऊन जातील. गझलकार तथा हझलकार स्व.धनश्याम धेंडे यांच्यानंतर हझलेचा वारसा कालिदास चवडेकर सक्षमपणे चालवत आहेत. 

              गझलेतील ‘अंदाजे बयाँ’ तील वेगळेपण सांगणारा संजय गोरडे यांचा अभ्यासपूर्ण लेख, ‘माझी मुलगी’ या गझलेची जन्मकथा सांगणारा किरण डोंगरदिवे यांचा लेख, गीतकार, संगीतकार, गायक आणि हिंदी गझलांच्या चाली कशा तयार झाल्या यांची कथा सांगणारा  ‘अफसाना लिख रही हूँ ' हा डॉ. संगीता म्हसकर यांचा लेख, सुप्रसिद्ध गझलकार म. भा. चव्हाणांच्या ‘खुलासा’ या गझलेचे अविनाश चिंचवडकर यांनी केलेले  रसग्रहण उत्तम आहे.प्रा.बी.एन. चौधरी यांनी 'उन्हात घर माझे ' या नितीन भट यांच्या गझलसंग्रहाचा परिचय त्यांच्या लेखातून करून दिला आहे. मयूर महाजन यांनी आपल्या लेखात गझलगंधर्व  सुधाकर कदम यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उजागर केले आहेत. ह्या सर्व लेखाने प्रस्तुत विशेषांकाला समृद्ध केले आहे. 

                 कोरोना महामारीच्या काळात आपण काही गझलकार मित्रांना गमावले. ही बाब निश्चितच दु:खदायी आहे. ‘कुडीच्या कारावासातून सुटका’ हा व्यंकटेश कुळकर्णी यांचा लेख गझलकार इलाही जमादार यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणारा आहे. त्यांच्यासोबत व्यतीत केलेल्या क्षणाची उजळणी करणारा आहे. गझलभूषण मधुसूदन नानिवडेकर यांची गझल सफरीतील मिश्किली सुयोग्य शब्दात निशा डांगे यांनी मांडली आहे. बदीऊज्जमा बिराजदार उर्फ साबिर सोलापुरी यांनी त्यांच्या श्रद्धांजलीपर लेखातून गझलकार कलीम खान यांच्या स्मृतींना उजाळा दिलेला आहे. तिन्ही गझलकारांची ओळख मनमिळावू, नवोदितांना मार्गदर्शन करणारे, प्रेरणादायी मार्गदर्शक म्हणून होती, हे विशेष. गझलेसाठी आयुष्य जाळणाऱ्या तीनही गझलकारांना भावपूर्ण श्रद्धांजली.  

         डबलिन -कॅलिफोर्निया स्थित प्रियंका सातपुते यांनी काढलेले छायाचित्र    मुखपृष्ठाकरिता उपलब्ध करून दिले. ग्राफिक्सचा माध्यमाने विनोद देवरकर यांनी त्याला सुरेख केले. यांच्यासह सर्व गझलकार, गझलकारा, अभ्यासक यांच्या  लेखन सहकार्याशिवाय अंक साकार होणे अशक्य होते, याची नम्र जाणीव संपादकांना आहे. म्हणूनच प्रस्तुत अंकाला योगदान देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार.

              आजपर्यंत प्रकाशित झालेल्या 'गझलकार सीमोल्लंघन'च्या सर्वच अंकांना  जगभरातल्या मराठी गझल रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. याही वर्षी तो अपेक्षित आहे. सर्वांना सीमोल्लंघनाच्या-दीपावलीच्या अंतःकरणपूर्वक शुभेच्छा.

- संपादक


दोन गझला : स्मिता गोरंटीवार

 


१.


केव्हा केव्हा विश्रांतीला येते घुसमट 

मौनामध्ये शब्दांसोबत चालू फरफट


दैवामध्ये रुसणे झाले एकाएकी 

पांचालीची द्युतामध्ये झाली भरकट 


ब्रम्हानंदी तंद्री माझी लागत आहे

दारावरची घंटी तेव्हा करते कटकट 


निद्रेमध्ये आखत आहे मर्यादांना

ज्वालेमध्ये स्वप्ने झाली माझी धुरकट


पाणी येता पेरत गेले मी स्वप्नांना 

पानोपानी दवबिंदूनी भरला मळवट


आधाराला कोणी नाही, कोठे जावे 

चालायाची केली हिम्मत वाटा अनवट


इच्छापूर्ती होते ईश्वर आधाराने

शरयूकाठी रामासाठी आतुर केवट


२.


दिवा वस्तीत दिसला लाल रात्रीला

कुणाचे मोडले घर काल रात्रीला


कुणाची थाप दारावर अशा वेळी

कशी मी आवरू बेताल रात्रीला


किती म्हणतेस सोडव तू मला कोडी

जसा मानेवरी वेताल रात्रीला


कुणाचे भाग्य बहरू लागले आहे

तिची ऐकून रुणझुण याल रात्रीला


तुझ्यासोबत नको दुःखा कुणा आश्रय

रिकामी ओसरी  कंगाल रात्रीला



तरक्कीपसंद गझलच्या दिशेने जाताना...

 

चित्र : विशाल इंगोले


....................................................

प्रिय गझल रसिकांनो नमस्कार!

                   ‘गझलकार सीमोल्लंघन २०२१’ चे हे तेरावे वर्ष. अनेक दिग्गज गझलकार आणि आश्वासक नवगझलकारांच्या गझलांसह नव्या वाटेवर मार्गक्रमण करणारा हा विशेषांक आहे. म्हणूनच जगभरातील मराठी गझल रसिकांना हा अंक वैविध्यपूर्ण आनंदानुभूती देण्यास सक्षम ठरेल अशी आशा आहे. 

            आपल्या समोर हा अंक ठेवतांना आनंद आणि दु:खाची संमिश्र अनुभूती व्यक्तीशः आम्हाला होते आहे. आनंद याचा की, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मान्यवर, नवोदित गझलकारांनी भरभरून प्रतिसाद दिला. गझला पाठवल्या. त्यापैकी निवडक गझलांना या अंकात समविष्ट केले आहे. आणि दु:ख याचे की, याच अंकात तीन श्रद्धांजलीपर लेख समाविष्ट करावे लागले. 

                कोणतीही आपदा हा जगणाऱ्या जीवांसाठी परीक्षाकाळ असतो. पास झाला तो तरतो आणि तोच तारतोही. आपदा जशी विनाश घडवते तशीच जगण्याच्या नव्या वाटाही सुचवित असते. गेल्या दीड वर्षापासून कोवीडने सर्वांना घरात बसविले. प्रत्यक्ष भेटी जवळजवळ बंद केल्या. परिणामतः टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटर, पुस्तके जवळची वाटायला लागली. Whatsapp, फेसबुक मित्र झालेत. कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता सुप्तावस्थेत गेलेल्या साहित्यिकांची पिढी सामाजिक प्रसार माध्यमांवर अचानक सक्रिय झाली. अनेक मान्यवर कवी, गझलकारांनी आभासी व्यासपीठावरून मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केल्या. काहींनी मुशायरे आयोजित केले. नवोदितांना लिखाणासाठी / सादरीकरणासाठी प्रेरित केले. आणि जादू झाली. गझलेसारख्या तंत्रशुद्ध काव्यप्रकाराकडे नवी पिढी आकृष्ट झाली. ती प्रयत्नपूर्वक लिहू लागली आहे. चांगले लिहिते आहे. याचा मनस्वी आनंद होतो आहे.   

           गझल ही तंत्रानुगामी गेय विधा. गझलेचे शास्त्र सांभाळून, मोजक्या पण चपखल शब्दांत व्यक्त होणे आणखीनच कठीण. उत्तम काव्यप्रतिभा असणाऱ्या कवीला गझलेचे यामुळेच आकर्षण. मार्गदर्शनाच्या क्षेत्रातही सुरेश भटांनी दिलेल्या बाराखडी व्यतिरिक्त अभ्यास असलेले मार्गदर्शक विरळेच. त्यामुळे चार आंधळे आणि हत्तीच्या गोष्टीसारखीच ही परिस्थिती. आपापल्या समजानुसार प्रत्येकजण मार्गदर्शन करीत असतो. 

             कोणतेही शास्त्र कधीच परिपूर्ण नसते. त्यामुळे मराठी गझल शास्त्राचेही समीक्षण होणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक भाषेचे भाषाशास्त्र, काव्यशास्त्र, उच्चारशास्त्र आणि व्याकरणशास्त्र वेगळे असते. त्यामुळेच भाषेनुसार तंत्रामधेही संशोधन संभवते. हे आपण समजून घेतले पाहिजे. साहित्य कधीही काळाच्या पुढे जात नसते किंवा मागे रहात नसते. ज्या काळात ते लिहिल्या जाते त्याच काळात वाचकांना, समीक्षकांना कळले तरच त्यावर मंथन होते. अन्यथा बाजूला  ठेवल्या जाते. अर्थातच कालबाह्य  होते. त्याअर्थी साहित्य नेहमीच समकालीन असते. काळजाचा ठाव घेणारे, वैश्विक मूल्याधारित साहित्य लोकभाषेत लिहिल्या गेले असेल तरच ते चिरंतन ठरते. संत लोकभाषेत लिहित. म्हणूनच संतनिर्मित साहित्य अधिक लोकांपर्यंत पोहोचले. गझलेचेही असेच आहे. तंत्र, लय, आशयघनता आणि गेयता ज्यांनी सांभाळली, त्यांची गझल लोकप्रिय झाली. रसिकांच्या भाषेत, काळजाला हात घालू शकणारी, काव्य जपणारी गझलच गझलेचे भविष्य घडवू शकणार आहे. 

            मराठी गझल मागे पडते किंवा पुढे जाते म्हणजे नेमके काय? हा प्रश्न अनेकांना कायम सतावत आला आहे. खरे तर जो ज्या काळात लिहितो तो त्या काळाशी, भाषेशी आणि अभिव्यक्तीशी प्रामाणिक असतो. मग आजच्या कवीच्या काव्याची तुलना ५०-१०० किंवा त्याही पूर्वीच्या कालखंडातील कवीशी, साहित्याशी वा साहित्यिकाशी करून काय साध्य होईल? त्याची निर्मिती त्याच्या कालखंडाशी, रसिकांशी, वाचकांशी तादात्म्य पावते की नाही, हे तपासणे महत्वाचे. 

                मराठी गझलेला वैभव प्राप्त करून देणारे सुरेश भट जेंव्हा सांगतात की ‘शक्यतो अक्षरगण वृत्तातच गझल लिहावी’ तेंव्हा त्यांचा त्यामागील दृष्टीकोन काय असावा? ते अभ्यासायचे सोडून आम्ही मात्रावृत्ताकडे वळत असू तर आमच्यासारखे करंटे आम्हीच. मात्रावृत्तातील यती न सांभाळलेली गझल लय हरवून बसते. स्वर काफियाचा गझलेतील वापर कवीच्या भावविश्वाला व्यापक व्यासपीठ प्रदान करतो पण त्याच वेळी काव्य आणि लालित्य, जो गझलेचा स्थायीभाव आहे तो हरवतो. स्वरकाफियाच्या गझलेत रदीफ नसेल तर ती गझल गद्यप्राय होते. दीर्घ वेलांटी, उकार ऱ्हस्व करण्याची सवलत कवींना आहे. पण शब्दाचा अर्थ बदलत नसला तरी मात्रापूर्तीसाठी शब्दातील ऱ्हस्वाचे दीर्घ करणे म्हणजे शुद्धलेखनाची वाट लावणे होय !  मात्रा गिराना उर्दू अरूजला म्हणजे उर्दू छंद शास्त्राला मान्य आहे.परंतु मात्रा वाढवणारा इजाफा मंजूर नाही. त्यामुळेच तरक्कीपंसद गझलेच्या नावाखाली केले जाणारे मराठी गझलेतील प्रयोग – जसे फक्त मात्रावृत्त, स्वरकाफिया, गैरमुरद्दफ स्वरकाफिया, ‘अ’कारांत स्वरकाफिया, अशुद्धलेखन असे प्रयोग अल्पायुषी ठरण्याचीच शक्यता अधिक आहे. त्यामुळेच कवीने आपल्या प्रवृत्ती आणि प्रकृतीला साजेसे, आनंद देणारे वृत्त निवडून काव्यनिर्मिती केली तर ती अधिक परिणामकारक ठरेल यात शंका नाही.        

           ‘गझलकार सीमोल्लंघन २०२१’ अंकात जवळपास १३० सहभागी गझलकारांच्या सुमारे ४०० गझलांचा आस्वाद आपण या दीपावली पर्वात घेऊ शकणार आहात. अंकाच्या ‘विशेष’ सदरात गझलकार प्रशांत पोरे यांच्या ‘दिवान ए प्रशांत’ या पहिल्या मराठी गझल दिवानच्या निमित्ताने संग्रहातील गझलांच्या अनुक्रमावर समतोल भाष्य करणारा श्रीकृष्ण राऊत यांचा लेख चिंतनीय आहे. हास्यव्यंगाच्या शालजोडीतून जीवनातल्या विरोधाभासावर मार्मिक वार करणारा प्रकार म्हणजे हझल. कालिदास चवडेकरांच्या सहा हझला  आपल्याला विशेष आनंद देऊन जातील. गझलकार तथा हझलकार स्व.धनश्याम धेंडे यांच्यानंतर हझलेचा वारसा कालिदास चवडेकर सक्षमपणे चालवत आहेत. 

              गझलेतील ‘अंदाजे बयाँ’ तील वेगळेपण सांगणारा संजय गोरडे यांचा अभ्यासपूर्ण लेख, ‘माझी मुलगी’ या गझलेची जन्मकथा सांगणारा किरण डोंगरदिवे यांचा लेख, गीतकार, संगीतकार, गायक आणि हिंदी गझलांच्या चाली कशा तयार झाल्या यांची कथा सांगणारा  ‘अफसाना लिख रही हूँ ' हा डॉ. संगीता म्हसकर यांचा लेख, सुप्रसिद्ध गझलकार म. भा. चव्हाणांच्या ‘खुलासा’ या गझलेचे अविनाश चिंचवडकर यांनी केलेले  रसग्रहण उत्तम आहे.प्रा.बी.एन. चौधरी यांनी 'उन्हात घर माझे ' या नितीन भट यांच्या गझलसंग्रहाचा परिचय त्यांच्या लेखातून करून दिला आहे. मयूर महाजन यांनी आपल्या लेखात गझलगंधर्व  सुधाकर कदम यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उजागर केले आहेत. ह्या सर्व लेखाने प्रस्तुत विशेषांकाला समृद्ध केले आहे. 

                 कोरोना महामारीच्या काळात आपण काही गझलकार मित्रांना गमावले. ही बाब निश्चितच दु:खदायी आहे. ‘कुडीच्या कारावासातून सुटका’ हा व्यंकटेश कुळकर्णी यांचा लेख गझलकार इलाही जमादार यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणारा आहे. त्यांच्यासोबत व्यतीत केलेल्या क्षणाची उजळणी करणारा आहे. गझलभूषण मधुसूदन नानिवडेकर यांची गझल सफरीतील मिश्किली सुयोग्य शब्दात निशा डांगे यांनी मांडली आहे. बदीऊज्जमा बिराजदार उर्फ साबिर सोलापुरी यांनी त्यांच्या श्रद्धांजलीपर लेखातून गझलकार कलीम खान यांच्या स्मृतींना उजाळा दिलेला आहे. तिन्ही गझलकारांची ओळख मनमिळावू, नवोदितांना मार्गदर्शन करणारे, प्रेरणादायी मार्गदर्शक म्हणून होती, हे विशेष. गझलेसाठी आयुष्य जाळणाऱ्या तीनही गझलकारांना भावपूर्ण श्रद्धांजली.  

         डबलिन -कॅलिफोर्निया स्थित प्रियंका सातपुते यांनी काढलेले छायाचित्र    मुखपृष्ठाकरिता उपलब्ध करून दिले. ग्राफिक्सचा माध्यमाने विनोद देवरकर यांनी त्याला सुरेख केले. यांच्यासह सर्व गझलकार, गझलकारा, अभ्यासक यांच्या  लेखन सहकार्याशिवाय अंक साकार होणे अशक्य होते, याची नम्र जाणीव संपादकांना आहे. म्हणूनच प्रस्तुत अंकाला योगदान देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार.

              आजपर्यंत प्रकाशित झालेल्या 'गझलकार सीमोल्लंघन'च्या सर्वच अंकांना  जगभरातल्या मराठी गझल रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. याही वर्षी तो अपेक्षित आहे. सर्वांना सीमोल्लंघनाच्या-दीपावलीच्या अंतःकरणपूर्वक शुभेच्छा.

- संपादक


दोन गझला : सौ.अंजली आ. मराठे




१.

जगली किती झेलून शब्दांचे विषारी  घाव 'ती'
टाकायला शिकली पुन्हा आता नव्याने डाव 'ती'

चाणाक्ष नजरेला तिच्या कळले मनाचे सांगणे
तो-यात उडवुन मान पण खाऊन गेली भाव 'ती'

वादात सा-या जिंकले पण हारले नात्यात मी
का टाळली नाही जरा मी, 'मी' पणाची हाव 'ती'? 

आयुष्य सारे वेचले कर्तेपणाने आजवर
जोडेल का नावापुढे त्याचे तरीही नाव 'ती'? 

शिकली सवरली लेकही शहरात राहूनी किती
ज्याने दिला विश्वास तो नाही विसरली गाव 'ती'

२. 

हट्ट वेडा सोड आता
बोल थोडे गोड आता

दे झुगारुन बंधनांना
तू नियम पण मोड आता

आसवे घेऊन गेली
पावसाची झोड आता

फार झाले मौन मित्रा 
आळ सारे खोड आता

भार त्यांचा सोसवेना
रुक्ष नाती तोड आता

दाखवी सारेच उलटे
आरशाला फोड आता

झाकते अब्रूसही ती
एक चिंधी जोड आता 
...............................
सौ. अंजली आशुतोष मराठे, 
बडोदे, गुजरात 

एक नितांत सुंदर गझल! : अविनाश चिंचवडकर

     


         काही कविता किंवा गझला मनाचा अगदी ठाव घेतात. एकएक ओळ कशी मनाला स्पर्श करून जाते. जीवनाच्या वाटचालीवर प्रत्येक क्षणी त्या ओळींची आठवण होत राहते. एखादी सुखद वाऱ्याची झुळूक यावी तसे ती गझल वाचून वाटते. 

खरंतर चांगली गझल लिहिणे हे काही सोपे काम नाही. गझलेची जमीन म्हणजे आकृतीबंध हा मतल्यापासूनच म्हणजे पहिल्या दोन ओळीपासूनच निश्चित व्हायला हवा. काफिया, रदीफ, अलामत या सगळ्या गोष्टी सांभाळून उत्तम गझल लिहिणे हे काही येऱ्या गबाळ्याचे काम नव्हे. पण म.भा. चव्हाण यांची  'खुलासा ' शीर्षकाची गझल या सगळ्या कसोट्यांवर खरी उतरते. 

खुलासा

तुला मी टाळतो आहे, तुझ्यामाझ्या भल्यासाठी
जीवाला जाळतो आहे, तुझ्यामाझ्या भल्यासाठी

मनाई मी मला केली कुणाशी बोलण्याचीही
मला सांभाळतो आहे तुझ्यामाझ्या भल्यासाठी

मनाच्या पावसाळ्याची कहाणी संपली माझी
उन्हे मी गाळतो आहे तुझ्यामाझ्या भल्यासाठी

फुले जी वाळली त्यांनी दिली वार्ता सुगंधाची
ऋतू रेंगाळतो आहे तुझ्यामाझ्या भल्यासाठी

खुलासा ऐक तू माझा खुलासा ऐकण्याआधी
खुलासा टाळतो आहे तुझ्यामाझ्या भल्यासाठी

- म.भा.चव्हाण

या गझलेचा मतलाच मनाचा ठाव घेतो. अत्यंत सोप्या शब्दात अगदी नेमकेपणाने गझलकाराने आपल्या प्रियेला 'खुलासा ' सादर केला आहे.

तुला मी टाळतो आहे, तुझ्यामाझ्या भल्यासाठी
जीवाला जाळतो आहे, तुझ्यामाझ्या भल्यासाठी

प्रिये, मी तुला का टाळतो आहे, हा प्रश्न तुला कदाचित पडला असेल! पण तुझे माझे एकत्र येणे या ढोंगी दुनियेला कदापि पसंत पडणार नाही. म्हणूनच मी माझा जीव जाळतो आहे आणि तुला टाळतो आहे.

 'तुझ्यामाझ्या भल्यासाठी ' एवढा प्रदीर्घ रदीफ वापरण्याची कवीची कल्पना अफलातूनच आहे. एवढा मोठा रदीफ असूनही त्यामुळे कुठेही रसभंग होत नाही. टाळतो आहे ,जाळतो आहे हा काफिया खूपवेळा वापरल्या गेला आहे. पण तरीही या रदीफ सोबत छान वाटतो. 

ही गझल वियदगंगा या वृत्तात लिहिली आहे. 'लगागागा लगागागा लगागागा लगागागा ' असा त्याचा लगक्रम आहे. हे वृत्त कविश्रेष्ठ सुरेश भट यांचे अतिशय आवडते होते. त्यांनी या वृत्तात तब्बल १५ गझला लिहिल्याची माहिती 'सुरेश भट आणि मी' या प्रदीप निफाडकर यांच्या पुस्तकात आहे. त्यामध्ये अतिशय गाजलेल्या गझला 'जगाची झोकुनी दुःखे, सुखाशी भांडतो आम्ही ' किंवा 'स्मराया सारखा आता तसा मी राहिलो नाही ' यांचा समावेश आहे. श्री म.भा.चव्हाण हे सुरेश भट यांचे आवडते शिष्य होते. त्यामुळे सुरेश भट यांचे संस्कार त्यांच्या गझलेवर जाणवतात. परंतु त्यासोबतच त्यांनी स्वतःची वेगळी ओळखही निर्माण केली, हे 'खुलासा ' या गझलेत सतत जाणवत राहते.

'मनाई मी मला केली कुणाशी बोलण्याचीही
मला सांभाळतो आहे तुझ्यामाझ्या भल्यासाठी '

माझ्या ओठांना मी बोलण्याचीही बंदी आता केली आहे, कारण बोलताना मी तुझा उल्लेख केला तर पुन्हा विषारी प्रहार तुझ्यावर होतील. आणि तेच मला नको आहे 

'मनाच्या पावसाळ्याची कहाणी संपली माझी
उन्हे मी गाळतो आहे तुझ्यामाझ्या भल्यासाठी '

सखे, प्रेम आणि सुखाचा तो स्वप्नील बहर कधीच ओसरून गेला आहे. आता फक्त कठोर, कटू वास्तव माझ्यासमोर उभे आहे. मन मोहवणारी श्रावणाची रिमझिम कधीच ओसरली आहे आणि फक्त कडक उन्हात तप्त पायवाटेवर वाटचाल करणे माझ्या नशिबात आहे. 

'पुन्हा जो कोरडा झाला असा मी माळ एकाकी
पुना भेगाळतो आहे तुझ्यामाझ्या भल्यासाठी '

पुन्हा एकदा मी जेथून निघालो तेथेच येऊन पोचलो आहे. माझ्या आयुष्याची वाटचाल  वाळवंटापासून सुरु झाली होती. तुझ्या चाहुलीने काही काळ माझ्या जीवनात प्रीतीचा ओलावा निर्माण झाला होता. पण आता पुन्हा त्या रुक्ष माळासारखा मी एकाकी झालो आहे. 

'फुले जी वाळली त्यांनी दिली वार्ता सुगंधाची
ऋतू रेंगाळतो आहे तुझ्यामाझ्या भल्यासाठी '

हा गुलाबी सुगंध कोठून येतो आहे? कदाचित तुझ्या आगमनानेच या वाळलेल्या फुलांना सुगंध येऊ लागला असावा. मला तर असे वाटते की तू यावीस म्हणून हा ऋतूपण रेंगाळत असावा. 

'खुलासा ऐक तू माझा खुलासा ऐकण्याआधी
खुलासा टाळतो आहे तुझ्यामाझ्या भल्यासाठी '

म्हणूनच प्रिये आज मी माझा खुलासा तुझ्यासमोर मांडतो आहे. पण हा खुलासा तुला पटेल का, हा सुध्दा एक प्रश्नच आहे. म्हणूनच मी खुलासा करण्याचेही टाळतो आहे, जीवाला जाळतो आहे !

डोळ्यासमोर एक नितांतसुंदर चित्र उभे करून ही लहानशी गझल संपते! कवीचा खुलासा आपल्याला पटत जातो, तिचा चेहरा स्मरत जातो आणि आपण आपल्या आठवणींमध्ये रममाण होतो! उत्कृष्ट गझल यापेक्षा अधिक चांगली काय असू शकते?

गझलेच्या तंत्रानुसार अतिशय तंत्रशुद्ध आणि तरीही प्रभावी, भावपूर्ण अशी ही गझल ऐकून कितीतरी वर्षे झालीत ! तारुण्यात ही गझल खूपच आवडली होती, ती त्यातील प्रेमातील आर्तता हृदयाला भिडल्यामुळे! आणि आजही इतक्या वर्षानंतर ही गझल मनाला चटका लावुन जाते, ती त्यातील खरेपणामुळे! नकळत आपण गुणगुणू लागतो - तुला मी टाळतो आहे तुझ्यामाझ्या भल्यासाठी! 
........................
अविनाश चिंचवडकर, बंगलोर
avinashsc@yahoo.com
9986196940

तीन गझला : श्रीराम गिरी







१.

जरा थांबून केलेला पुकारा हा;
तुझ्या लक्षात आला का इशारा हा.

कशाला जीव वेड्या जाळतो इतका;
तुला जर जायचे सोडुन पसारा हा.

पुरे झाल्या अता लाटांवरी शंका;
तुला बोलावतो आहे किनारा हा.

कधी संतापतो मीही इथे मजवर;
पकडला मी कशाकरिता निखारा हा.

खरे कळले तुझ्यावर प्रेम 
जडल्यावर;
कसा असतो मनावरती पहारा हा.

२.

भावना एक अफवा आहे;
कोण मनाने हळवा आहे.

फुटले ओठांवर हसू तिच्या;
दिवा पेटला हिरवा आहे.

धार बघुन घे 'शेरा'ची तू;
शब्दांमध्ये बिचवा आहे.

प्रीत असे जन्मोजन्मीची;
युगायुगाचा रुसवा आहे.

त्या वाटेने जावे आधी; 
ज्या वाटेवर चकवा आहे.

कष्ट वगैरे काही नाही;
चिंतेचा हा थकवा आहे.

३.

शब्द साधा एवढा उच्चार नाही;
ऐक, कवितेसारखे हत्यार नाही.

खर्च केली पुस्तकांवर ह्या कमाई;
 फर्निचरने थाटले घरदार नाही.

झूठ आहे प्रेमबिम हे शपथ,वचने;
पण कुणी मानायला तय्यार नाही.

तू नको इतक्यात भाळी विजय गोंदू;
घेतली अद्याप मी माघार नाही.

हे कुणा कळले खरे दुखणे जगाचे;
हा कुणापाशी खरा उपचार नाही.

       


तीन गझला : प्रफुल्ल कुळकर्णी


१.

गळे फूल वा-यामुळे 
जवळच्या शिका-यामुळे 

चुकीची दिशा भेटते 
चुकीच्या इशा-यामुळे 

विनाकष्ट रस्ता मिळे
पुढे चालणा-यामुळे

मिळे रूप काचेसही
निराकार पा-यामुळे

असे मोल दारा तुझे
कडी घालणा-यामुळे

उजेडाघरी मी उभा
दिवे लावणा-यामुळे

किती देह वैतागतो
मनाच्या पसा-यामुळे 

२.

कधी पूर येतो कधी निर्जळी
तुझी धोरणे का अशी वेगळी?

कधी रोप काढून टाकू नये 
जमीनीत आक्रंदते पोकळी 

जरी बंगले बांधले खेटुनी
सलोख्यात जागा हवी मोकळी

उभी अन्नछत्रेच शाळेमध्ये 
भुकेचा कुणीही नसावा बळी

तुला घट्ट बांधेल माझ्यासवे 
अशी जीवना पाहिजे साखळी

३.

झोप पेंगुळते मनाच्या गावभर
का उगी पण जागते सारे शहर?

माणसे गेली कधीची खर्चुनी
राहिले शिलकीत पारोसे प्रहर 

फूलही सांगे सुगंधाला सतत
घे भरारी सोड आईचा पदर

ओरडे पेशीतले कर्कशपण 
वेळ काढुन वाच मौनाची बखर

का , कधीपासून , कुठवरती उगी
काळ मागे लागला अष्टौप्रहर

तीन गझला : सौ.वैशाली भागवत


१.

कातळ काळा कधी नव्हे तो खुलतो आहे 
भेट तुझी अन् माझी तोही स्मरतो आहे  

मला जगाने रोज बदलले थोडे थोडे   
म्हणतात अता किती वेगळा दिसतो आहे   

तुझ्यावाचुनी आयुष्या मी जपू कुणाला 
कोण तुझ्यासम सोबत माझी करतो आहे

थांबशील ना जरा वेळ तू इथे विधात्या
भाळावरले जुने डाग मी पुसतो आहे    

कोसळतो का उगाच येथे मेघ एवढा 
दु:ख उराशी किती धरेचे जपतो आहे  

२ 

आणा भाका जुन्या पुराण्या ती ही पाळत नाही
सुंदर मूर्तीवरती आता मी ही भाळत नाही

आठवणींची अनेक पाने वहीत भरली होती
बघून त्यांना मनास हल्ली उगाच जाळत नाही

ओंजळीत मी जपून आहे फुललेले क्षण माझे 
दारी येणाऱ्या दु:खांना मी कवटाळत नाही 

हर एक हिरा दडून असतो दगडामध्ये साध्या 
म्हणून सगळे दगड उराशी मी सांभाळत नाही 

विचारले जर रहस्य कोणी आनंदाचे माझ्या    
उत्तर सोपे नसून सुद्धा सवाल टाळत नाही    

३.

जे तुला सांगायचे सांगून घे  
त्यात थोडे प्रेमही मिसळून घे  

वादळाला यायचे तर येउ दे   
तू लव्हाळ्यासारखे वाकून घे  

चेहऱ्याला रंगरंगोटी किती 
अंतरीचा रंग तू पाहून घे 

जे हवे आहे तुला ते माग ना     
पाहिजे तर जीव ही मागून घे

टाळले आहे जगाने शेवटी 
भेट आता.. शब्द तू पाळून घे 

कैक आले या जगी.. गेले तसे 
वाट थोडी वेगळी चालून घे 

वाचली आहेत जर तू पुस्तके 
मौन माझे तेवढे वाचून घे 
.......................
सौ.वैशाली भागवत, बडोदे

तीन गझला : भागवत विजय देवकर

१.

ध्येय देखणे लोभस आहे
इच्छा बहुधा डोळस आहे

जीवनातल्या वाटेमध्ये
खरा अडथळा आळस आहे

दोष कुणाला नकोस देऊ
तुझे बियाणे बोगस आहे

सुख गोंधळले बघून येथे
दुःख केवढे सालस आहे

धूर दाटला जिकडेतिकडे
जगी एवढा आकस आहे

२.

फुटलेल्या पत्र्यांनी सारे गोळा केले
दिवसाढवळ्या घरात तारे गोळा केले

पडला आहे पाऊस कुठे मनासारखा
अंदाजाने नुसते वारे गोळा केले

पूर्तता कधी वचनाची तू केली नाही
जनतेनेही फुसके नारे गोळा केले

जमिनीमध्ये पाऊल घट्ट रोवत गेलो
कानामध्ये उनाड वारे गोळा केले

आयुष्याची चव राखण्यास कायम येथे
डोळ्यामध्ये अश्रू खारे गोळा केले

रस्ते,वळणे, मिठ्या मुके अन पत्रे तिकिटे...
आठवणीचे  तुझ्या पसारे गोळा केले

प्रेमळ, रागट,मादक बाधक आणिक चावट
नजरेने हे प्रकार न्यारे गोळा केले

अपयश आलेल्यांच्या गोष्टी वाचत गेलो
अनुभव पदरी मी म्हातारे गोळा केले

३.

जर स्वप्नातही तो आठवानी तळमळू शकतो
तो माणूस डोळ्यातील पाण्याने जळू शकतो

चुकचुकली जराशी पाल जर डोक्यात शंकेची
निर्णय घेत असताना कुणीही गोंधळू शकतो

आजी गोष्ट सांगे अस्वलाची का मला कळले
संकट येत असताना जवळचा ही पळू शकतो

वेगावर नियंत्रण ठेव आता आपुल्या वेड्या
बघ अपघात थोड्या सावधानीने टळू शकतो

फुटली वाळक्या खोडास नवती पाहिल्यावर तू
प्रेमाचा ऋतू देहात जख्खड सळसळू शकतो
......................
©भागवत देवकर

तीन गझला : निर्मला सोनी

१.

वाटते की विश्व सारे ... गीत माझे गात आहे,
कोणती जादू तुझ्या या, सांग आवाजात आहे

भेटता मी वादळाला, या जगाला काय व्हावे
कोण जाणे काय माझ्या, लेखले दैवात आहे

भेटली नाही कुठेही, शोधले मी खूप आई
सांगतो जो तो मला तू, राहते स्वर्गात आहे

अंतरी जे पेटले ते, सांगता ही येत नाही
अन् जगाला वाटते की, जीव हा प्रेमात आहे

घात केला माणसाचा, जीवघेण्या पावसाने
दुःख त्याचे या धरेने, सोसले गर्भात आहे

२.

सौख्य हासूनी जसे दारात येते,
दु:ख तेव्हा केवढे लाडात येते

नाव मी ठेवू कशी गझलेस माझ्या,
पूर्ण गोडी जर तिला लिहिण्यात येते

पाहतो आहे कुणाची वाट प्रेमा,
देव जाणे कोण या हृदयात येते

गर्व होतो ना तुला, मृत्यो जरासा,
जिंदगी जेव्हा तुझ्या विळख्यात येते

का भरवसा सांग ठेवू मी तुझ्यावर,
वागणे दुनिये तुझे लक्षात येते

जीवघेण्या संकटाशी झुंजतांना,
कोण जाणे बळ कसे पंखात येते

का करू तक्रार मी या जीवनाची,
मौज त्याची जर खरी जगण्यात येते

३.

असू दे तुलाही जरा भान देवा
खुले ठेव तूही तुझे कान देवा

असे खूप किंमती, हसू मानवाचे 
कसे तेच देऊ तुला दान देवा

करावे जगाचे भले वाटते तर,
जगावेगळे दे मला ज्ञान देवा

अडकला जिथे तू अडकले तिथे मी
कसे सांग उघडू नवे पान देवा

हवा खूप झाली विषारी इथे रे
तुझी आज दुनिया नसे छान देवा

तुझ्या देवळाला जसे बंद केले
तसे माजले बघ जगी रान देवा

तुला साकडे मी किती सांग घालू
दया कर जगावर दयावान देवा
......................

निर्मला सोनी

तीन गझला : सतीशसिंह मालवे


१. 

ज्वारी जपून थोडी पेवात ठेवली
दाबून भूक आम्ही पोटात ठेवली

आयुष्यभर उन्हाच्या मी सोसल्या झळा
पण सावली घरावर तैनात ठेवली

मी शोध घेत आहे,त्यांचा अजूनही
ज्यांची खरी कहाणी अज्ञात ठेवली

मी काय ऐतिहासिक माणूस वाटलो?
बनवून मूर्त माझी चौकात ठेवली

भोळ्या बळीस इथल्या फसवून वामना
घालून लाथ अमुच्या डोक्यात ठेवली

होईल काय वैद्या उपचार नेमका?
ताजी जखम मनाच्या जर आत ठेवली

२.

गावाकडून आला शहरात एक पक्षी
पडला अजून तेव्हा पेचात एक पक्षी

अंधार जीवनाचा करण्यास दूर अंती
सूर्याकडे निघाला रागात एक पक्षी

पाहून झेप त्याची आश्चर्य होत आहे
झाला असेल मोठा त्यांच्यात एक पक्षी

लावून एक डोळा टिपला अचूक पक्षी
आहे अजून माझ्या स्मरणात एक पक्षी

सोडून देश माझा आलो उगाच येथे
चिंता करून मेला विरहात एक पक्षी

कुंकू तुझ्या कपाळी पाहून आज माझे
रुसला असेल बहुधा लग्नात एक पक्षी

सोसून झळ उन्हाची दाणे टिपून येतो
दिसतो मला हमेशा बापात एक पक्षी

३.

आधी व्यथा सोसून घे...बाकी बघू पुढचेपुढे
दुःखास कवटाळून घे...बाकी बघू पुढचेपुढे

काटे कुठे रुतले मला,माझे मला ठाउक सखे
गजरा तुझा माळून घे...बाकी बघू पुढचेपुढे

होऊ नये अपुल्यामुळे वाईट कोणाचे कधी!
इतुके इथे समजून घे... बाकी बघू पुढचेपुढे

भर पावसामध्ये कसे दिसणार अश्रू आपले?
पाण्यामधे मिसळून घे...बाकी बघू पुढचे पुढे

रस्ता जसा आहे तसा, त्यावर प्रवासी चालतो
ध्येयास तू गाठून घे... बाकी बघू पुढचेपुढे

तो आज संसारामुळे बंदीस्त पोपट जाहला
त्याची दशा पाहून घे... बाकी बघू पुढचेपुढे

येईल थकवा जीवना, चालायचा जेव्हा तुला
वळणावरी थांबून घे.... बाकी बघू पुढचेपुढे

........................
सतिशसिंह मालवे
मु-हा देवी

तीन गझला : ओमप्रकाश ढोरे


१.

पात्रता ठरवीत असतो,कागदाचा एक तुकडा
मान्यता मिळवीत असतो,कागदाचा एक तुकडा

काळजाची मान्यता ही,कागदाला भेटते पण
प्रेम हे फुलवीत असतो,कागदाचा एक तुकडा

हे कळाया मार्ग नाही,चाहते का ती कुणाला?
मी तरी पुरवीत असतो,कागदाचा एक तुकडा

जिंदगानी माणसाची,कागदावर चाल करते
चाल ही अडवीत असतो,कागदाचा एक तुकडा

अर्ज द्या प्रस्ताव करतो,दाखला मंजूर नाही
योजना बुडवीत असतो,कागदाचा एक तुकडा

आखल्या सीमा घराच्या,भावकीचा वाद झाला
ही दुही घडवीत असतो,कागदाचा एक तुकडा

घ्यायची ती दक्षता घे,तू नको गाफील राहू
'न्याय'ही तुडवीत असतो,कागदाचा,एक तुकडा

  
२.

वेळ काढुन, भेट म्हणतो,दोन मिनटे
बोलण्याला,वेळ नसतो,दोन मिनटे

आस-याला,चार भिंती,अन् खुले छत
तारकांची,स्वप्न बघतो,दोन मिनटे

तू बरोबर,बोलला की, चूक नव्हती
चूक अपुली,कोण स्मरतो,दोन मिनटे

औपचारिकता,जगाची,पाळतो मी
स्तब्ध राहुन,मौन धरतो,दोन मिनटे

३.

वागला तू मी पणाने,वाईट त्याचे वाटले
दूर केले तू मनाने,वाईट त्याचे वाटले

शोधता आलाच नाही,माणूस तुजला आतला
फक्त केले तू गा-हाणे,वाईट त्याचे वाटले

तू स्वतःला वाचवाया,टाकून गेला आळ ही
फसवले तू एवढ्याने,वाईट त्याचे वाटले

होत नाही भाव ज्याचा,केलास त्याचा भाव तू
तोलली मैत्री दराने,वाईट त्याचे वाटले

लक्ष नव्हते चूक झाली,बोलून गेला एवढा
छान केले तू बहाणे,वाईट त्याचे वाटले
........................
     ओमप्रकाश ढोरे
     ९४२३४२७३९०

चार गझला : निलेश कवडे .


१.

कुणी पाहू नये माझ्या, कधी जवळून शर्टाला
नवा गणवेश केला मी, जुन्या उसवून शर्टाला

मला तो आजही देतो पुन्हा जाणीव बाबांची
कधी चुपचाप बाबांच्या, बघा बिलगून शर्टाला

जरासे काय छातीशी, तिला मी घेतले होते
मनाच्या टाकले माझ्या, तिने भिजवून शर्टाला

कुणी स्वार्थाविना आता जुळत नाही कुणाशीही
जुळत शाळेमधे होते, कुणी पकडून शर्टाला

कहाणी सांगतो भलती गुलाबी डाग लिपस्टिकचा
नजर घेणार दुनियेची, कधी समजून शर्टाला

बदल दृष्टीमधे सुद्धा करावा लागतो मित्रा
कुणीही ना सुखी झाले, जुन्या बदलून शर्टाला

पुरावा एकही आपण, कधी ठेवायचो नाही
तरीही यायची टिकली तुझी चिटकून शर्टाला

२.

मेंदूमध्ये उत्पत्ती स्वार्थाची होते
रक्ताच्या नात्याची तेव्हा माती होते

त्याने इच्छांची यादी जाळावी आधी
ज्याची इच्छा निर्मोही होण्याची होते

साऱ्या ताऱ्यांनी देहाची होळी केली
अंधाराचे जाळे जागोजागी होते

मौनाने भिंतीशी बोलावे का आता?
माझे काही सांगायाचे बाकी होते

त्याच्या पाठीमागे ही संपत्ती होती
काही लोकांच्या डोळ्यांना पाणी होते

माझी जागा घेता आली नाही त्याला
त्याचे सारे काही ओठांसाठी होते

या छोट्याशा प्रश्नाला दोघेही टाळू
नाते कोणाशी लग्नाच्याआधी होते?

३.

ठेव ना तू कितीही पहारेकरी
राजधानीत जमतील मोर्चेकरी

शेवटी काय घेऊन जाते कुणी
सोडल्यावर परततात खांदेकरी

नेमके कायद्याचे कुणाला अभय
रोज फिरतात मोकाट मारेकरी

सांग ना काय अस्तित्व आहे तुझे
जीव देहामधे फक्त भाडेकरी

पाल काढून यात्रा जरी संपली
अंतरी राहिली एक यात्रेकरी

मोल ना व्यक्त होणार शब्दामधे
माय आहे किती थोर सेवेकरी

शेवटी फार नव्हते हजर सोयरे
वाढले मात्र कोर्टात वाटेकरी

४.

पायरीवर तुझ्या ठेवली पालखी
विठ्ठला सार्थकी लागली पालखी

आज आत्म्याविना देह अगतिक किती
चार खांद्यावरी चालली पालखी

ना समजणार मोजून गर्दीस या 
भावनांनी किती वेढली पालखी

जन्म वारीच असतो असे जाणुनी
मी दिशेने तुझ्या काढली पालखी

श्वास भोईप्रमाणे खरा वागला
वेदना सोसुनी वाहली पालखी

एक श्रावण तिच्या अंतरी गोंदला
होउनी चिंब मग लाजली पालखी

जन्मभर सोसतो दाह ज्याच्यामुळे
त्या उन्हाचीच तर सावली पालखी

अफ़साना लिख रही हूं : डॉ.संगीता म्हसकर


इंग्रजांच्या काळात गझलचा फारसा विकास जरी झालेला नव्हता हे जरी खरं असलं तरीही तिची वाटचाल त्या दिशेने सुरू होती हे नाट्यसंगीताच्या इतिहासातून जाणवते.खरं तर नाट्यसंगीताचा काळ हा गझलच्या भविष्यातल्या सुवर्ण युगाची नांदीच होती असं आपल्याला म्हणता येईल.
याचं कारण म्हणजे काळाच्या ओघात मराठी आणि उर्दू रंगभूमीवरचा संगीत नाटकांचा काळ जरी मागे पडला तरी त्या काळातूनच चित्रपट संगीताचं अद्वितीय असं दालन निर्माण झालं.जणू ललित कलांच्या सह -अस्तित्वाची प्रचिती आल्यामुळे, सिनेमा मधे गाणी हवीच हा जसा काही भारतीयांचा अलिखित नियमच बनला. गाण्यांशिवाय चित्रपट भारतात सहसा बनत नाहीत.साहजिकच इतर गाण्यांसोबत गझलचाही चित्रपटात प्रवेश झाला.चित्रपटात आलेली ही गझल मात्र पारंपरिक गझलच्या तुलनेत बरीच वेगळी होती.तिचं स्वरुप हलकं फुलकं, चित्रपट गीताला साजेसं असंच होतं.मात्र महत्वाची बाब म्हणजे या काळात गझलला उत्तम शायर, उत्तम संगीतकार आणि गायक लाभले.त्यामुळे गझल ख-या अर्थाने सर्वसामान्य रसिकांच्या ओठांवर रुळली.
चित्रपटातली गझल लोकप्रिय करण्याचं श्रेय बेगम अख्तर आणि तलत मेहमूद या कलावंतांचं !
'रोटी' या चित्रपटात गायिका आणि नायिका अशा दोन्ही भूमिका बेगम अख्तर यांनी केल्या होत्या.
चित्रपट सृष्टीसाठी गझलची सुरुवात मात्र नसीम बानो यांनी गायलेल्या गझलने झाली होती.
'पुकार' या सिनेमासाठी,

'ज़िन्दगी का साज़ भी क्या साज़ हैं..
बज रहा है और बे आवाज़ हैं... '

कमाल अमरोही यांच्या लेखणीतून उतरलेली ही गझल, 'मीरसाहेब' यांनी संगीतबद्ध केली होती.
तलत मेहमूद यांनी सुद्धा सुरुवातीला गायक आणि नायक अशा दोन्ही भूमिका केल्या.गझलला खरा न्याय त्यांनी दिला.

'मुहब्बत ही ना जो समझे,
वो ज़ालिम प्यार क्या जाने,
निकलती दिल के तारोंसे
जो है झंकार क्या जाने '

'परछाई' चित्रपटातली नूर लखनवी यांची ही गझल सी.रामचंद्र यांनी संगीतबद्ध केली होती.ही गझल तलत मेहमूद यांच्या कातर स्वरातून मनाची सैरभैर अवस्था नेमकी व्यक्त करुन गेली.आणि हा दर्द हीच तलतच्या आवाजाची खासियत ठरली.
तलत मेहमूद यांच्या सांगितिक आयुष्यातलं महत्त्वाचं पाऊल म्हणजे 'मिर्झा ग़ालिब'

'दिल की उलझन में पता चलता नहीं
हम कहां हैं,सुबह हैं या शाम हैं,
हम तडपते हैं,नही उनको खबर
क्या मोहब्बत का यहीं अंजाम है '

अशा एका पेक्षा एक सरस गझल असलेल्या या चित्रपटाचे संगीतकार होते गुलाम महंमद!
विशेष म्हणजे सोबत होती सुरैय्या !

'हमको उनसे वफा की हैं उम्मीद,
जो नहीं जानते वफा क्या है..
दिल-ए-नादां तुझे हुआ क्या है
आखिर इस दर्द की दवा क्या है '

अशा कितीतरी गझल सुरैयाने अमर केल्या.

'यह ना थी हमारी क़िस्मत के विसाल-ए- यार होता
अगर और जीते यहीं
और इंतज़ार होता '

तिच्या डोळ्यांतले भाव वाचतांना तिचा स्वर जास्त भावपूर्ण होतो आहे असं जाणवायचं.
तसं पाहिलं तर जवळपास सगळ्याच गायकांनी कमी जास्त प्रमाणात गझल गायल्या.मोहम्मद रफी,यांचा आवाज सगळ्या गीतांना न्याय देणारा होता.
गझल ही त्यांच्या स्वरातून साकारली ती अविस्मरणीय ठरण्यासाठी!
रफींच्या स्वरांतल्या  'लाल किला'
या चित्रपटाल्या,

'न किसीकी आंख का नूर हूं '
आणि,
'लगता नही हैं दिल मेरा उजडे दयार में '

या बहादुरशहा ज़फर यांच्या गझल म्हणजे मूर्तिमंत व्यथेची प्रचिती होती.
या गझलांना पं. श्रीनाथ त्रिपाठी यांनी संगीत दिलं होतं.बनारसी ठुमरी,होरी,कजरीचे सूर ऐकण्यात बालपण घालवलेल्या त्रिपाठीजींना गझलचा नेमका सूर गवसला होता.
संगीतकार जयदेव यांचं संगीत लाभलेली 'हम दोनो ' चित्रपटातली रफींनी गायलेली ही गझल विसरणं तर केवळ अशक्य !

'मै ज़िन्दगी का साथ निभाता चला गया
हर फिक्र धुऐं मे उड़ाता चला गया'

जयदेव अली अकबर खाँ यांचे शिष्य होते.संगीताइतकाच साहित्याचाही त्यांचा व्यासंग विलक्षण होता.फारसी, उर्दू, हिंदी अशा तिन्ही भाषांतल्या काव्याचा त्यांनी अभ्यास केला होता.एखादा शेर वाचतांना उस्फूर्तपणे त्यांची चाल तयार व्हायची.
शायर अदम यांच्या

'मैत्री गर्दिश - ए - जाम लडाता चला गया..
हंसता हंसाता पीता पिलाता चला गया '

हा शेर वाचतांना जी चाल सुचली त्या चालीवर ही गझल साहीर लुधियानवी यांनी लिहिली होती.साहीर म्हणजे गझलच्या इतिहासातील देखणे वळण !

किशोरजींची स्टाईलच अफलातून होती.गझलची हळुवार शैली त्यांना मानवेल असं कुणाला वाटलं नव्हतं.पण किशोर कुमार यांच्या स्वराचा आवाका फार विलक्षण होता.
ज्या ताकदीने त्यांनी डाराडूडू ची गाणी गायली तितक्याच ताकदीने हळुवार गाण्यांनाही न्याय दिला.त्यातली उत्कटता, भावुकता अत्यंत नजाकतीने पेलली.

'मेरे दिल में आज क्या है
तू कहे तो मै बता दूं
तेरी ज़ुल्फ फिर संवारुं
तेरी मांग फिर सजा दूं '

यासारख्या थोड्याच पण लक्षात राहाणा-या गझल किशोरकुमार यांनी दिल्या.

एक अनोखा दर्द अशी ओळख असणाऱ्या मुकेश यांच्या स्वरात ही क्वचित काही गझल आढळतात.

'आया है मुझे फिर याद वो ज़ालिम
गुज़रा ज़माना बचपनका
हाय रे अकेले छोड के जाना
और न आना बचपन का '

किंवा,

'छोड चले है महेफिल को
याद आए कभी तो मत रोना
इस दिल को तसल्ली दे देना
घबराए कभी तो मत रोना '

यासारख्या रचना विसरता येत नाहीत.

चित्रपट संगीताच्या त्या सुवर्ण युगात, प्रत्येक गायकाचा एक विशेष असा चेहरा होता.स्वतंत्र अशी ओळख होती.संगीतकार आणि गायक अशा दोन्ही क्षेत्रांत लोकप्रिय असलेल्या हेमंत कुमार यांचा उल्लेख या संदर्भात आवश्यक आहे.
हेमंत कुमार यांच्या स्वराभोवती एक गूढ असं वलय जाणवतं.अंतरंगात खोल उतरणारा त्यांचा स्वर इतरांपेक्षा वेगळा होता.या आवाजाने गझल अधिक समृद्ध झाली.

'तेरी दुनिया में जीने से तो
बेहतर हैं के मर जाए,
वहीं आंसू,वहीं आंहें,
वहीं ग़म हैं,जिधर जाए '

साहीर यांची ही गझल एस.डी.बर्मन यांनी संगीतबद्ध केली होती.
या व्यतिरिक्त उमादेवी, नूरजहाँ, मुबारक बेगम, शमशाद बेगम यांनी देखील वेगवेगळ्या संगीतकारांच्या दिग्दर्शनात गझल गायल्या होत्या.
'शगून ' चित्रपटासाठी जगजीत कौर यांनी गायलेली

'तुम अपना रंजो ग़म 
अपनी परेशानी मुझे दे दो
तुम्हे ग़म की क़सम,इस
दिल की विरानी मुझे दे दो '

ही गझल खूप गाजली होती.
या गझलला ख़य्याम यांनी संगीत दिलं होतं.
तर उमादेवी यांनी गायलेली

'अफसाना लिख रही हूं
दिल-ए-बेक़रार का
आंखोमें रंग भरके 
तेरे इंतज़ारका '

ही 'दर्द ' या चित्रपटातली गझल लोकप्रिय झाली होती.
लता मंगेशकर
संगीत क्षेत्रातल्या या अनभिषिक्त सम्राज्ञीच्या स्वरात अनेक गझल अजरामर झालेल्या आहेत.लता मंगेशकर यांनी अनेक संगीतकारांकडे गझल गायल्या.मात्र मदनमोहन यांचे गझलवर विशेष प्रेम होते.फैज़ खाँ,अब्दुल वहीद खां यांचं मार्गदर्शन आणि रोशन आरा, बेगम अख्तर यांचा सुरेल सहवास लाभलेल्या मदनमोहनजींवर गझलचा प्रभाव असणं स्वाभाविकच होतं.
राजा मेहेदी अली खाँ, मदनमोहन आणि लता मंगेशकर यांच्या त्रिवेणी संगमातून अनेक अद्वितीय अशा गझलांची निर्मिती झाली.
'अदालत ' या चित्रपटातली ही गझल ,

'युं हसरतोंके दाग मोहब्बत में धो लिए
ख़ुद दिलसे दिलकी बात कही और रो लिए '

म्हणजे मूर्तिमंत वेदना होती.
लतादीदींच्या स्वरातली आर्तता, आणि नर्गिसच्या डोळ्यातला दर्द ! दाद द्यावी तर कोणाला ?
लता मंगेशकर यांनी अनेक गझल गायल्या.

'रहते थे कभी जिनके दिल में
हम जान से भी प्यारोंकी तरह,
बैठे हैं उन्ही के कुंचे में हम
आज गुनहगारोंकी तरह '

यासारख्या आर्त किंवा,

'नग्मा ओ शेर की सौगात किसे पेश करुं
यह छलकते हुए जज़बात किसे पेश करूं '
यासारख्या रोमॅंटिक,सगळ्याच गझल
त्यांनी समृद्ध केल्या.

आशा भोसले यांच्या बद्दल सांगण्या आधी थोडं खय्याम यांच्या बद्दल!
गझल सोबत विशेष ऋणानुबंध असलेले संगीतकार ख़य्याम यांनी चित्रपटातल्या गझलला एक नवीन वळण दिलं.नव्या आकारात,नव्या स्वरुपातली ही गझल आधीच्या गझल पेक्षा थोडी वेगळी होती.या आधी सिनेमातली इतर गाणी आणि गझल यात फारसा फरक केला जात नव्हता.या गाण्यांसाठी वापरली जाणारी,ट्रम्पेट, पियानो हीच वाद्ये गझल साठी वापरली जात होती. ख़य्यामजींनी मात्र गझलची भावपूर्णता लक्षात घेऊन तिच्यासाठी खास सतार, संतूर,सारंगी,
स्वरमंडळ इत्यादी वाद्यांचा उपयोग करून तिची नज़ाकत जपली.गझलेतून साकार होणारी भावना यामुळे जास्त उत्कट झाली.
खय्याम आणि आशा भोसले यांच्या गझलांवर 'उमराव जान ' चित्रपटाने एक मोहोर उमटवली हे तर खरंच पण तरीही या आधी च्या काळातही आशा भोसले यांनी गायलेल्या वेगवेगळ्या मूड्स च्या गझल कशा विसरता येतील?

'चेहरे पे ख़ुशी छा जाती हैं
आंखोमें सुरुर आ जाता है,
जब तुम मुझे अपना कहते हो,
अपने पे गुरुर आ जाता है '

'वक़्त ' चित्रपटासाठी आशाजींनी गायलेलीही मस्तीभ-या मूड ची गझल फक्त त्यांच्या साठीच होती.
उमराव जान, च्या सगळ्या गझल क्लासिक टच असलेल्या होत्या.याच काळात 'बाज़ार ', 'अर्थ ' या सिनेमातून ही दर्जेदार गझल सादर झाल्या.
'अर्थ ' मधे जगजितसिंग यांनी विलक्षण मुलायम गझलचा आविष्कार घडवला.

'तुम इतना जो मुस्कुरा रहे हो
क्या ग़म है जिसको छुपा रहे हो '

यासह सगळ्या गझल खूप लोकप्रिय झाल्या.
'निकाह ' या सिनेमात गायिका आणि नायिका अशा दोन्ही भूमिका मध्ये सलमा आगा यांनी रसिकांची मने जिंकली.

'दिल के अरमां आंसूओंमें बह गए
हम वफा करके भी तनहां रह गए '

ही गझल लक्षात राहिली.
चित्रपटातल्या गझलांचा या ठिकाणी थोडक्यात आढावा घेतला आहे.
अर्थात चित्रपटातल्या गझलांची संख्या खूप मोठी आहे.गझलच्या वाटचालीतल्या या महत्त्वाच्या मुद्द्याला स्पर्श करण्याचा हा प्रयत्न, एवढंच.
........................
 

तीन गझला : आरती पद्मावार

१.

जिथे धागाच कुजका फार लोकांचा
कसा बनणार  सांगा हार लोकांचा

गरज नसतेच त्यांना चार भिंतींची
सुखी पालातही संसार लोकांचा

तळाशी गाळही असणार लोकांच्या
नितळ वर डोहही दिसणार लोकांचा

नका ठेवू भरवसा फार लोकांवर
बदलतो नेहमी आकार लोकांचा

उजेडाची करत होते जिथे भाषा
तिथे मी पाहिला अंधार लोकांचा

२.

विचारांच्या दरीने व्यापला रस्ता
तसा मग लांबला दोघातला रस्ता

उडवले काल शिंतोडे जरी त्याने
मला पाहून का भारावला रस्ता

खुणावत केवढे रस्ते मला होते
निवडला नेमका जो भावला रस्ता

कितीदा चालले मी याच रस्त्यावर
नवा का वाटला आता मला रस्ता

जरा सांभाळुनी तू जा बरे पोरी
मला थोडा निसरडा वाटला रस्ता

३.

बंद खिडकीचा कधी हुंकार आठवतो
सोसलेला कालचा अंधार आठवतो

एकतेमधली खरी ताकद समजतांना
आज तुकड्यांना पुन्हा आकार आठवतो

रोपट्याइतुके तरी बळ दे जरा देवा
वेल म्हटली की पुन्हा आधार आठवतो

राहतो काटा उभा अंगावरी अजुनी
एक झंझावात वारंवार आठवतो

इंद्र अजुनी भेटतो इथल्या अहिल्येला
राहता पडुनी शिळा उद्धार आठवतो

तीन गझला : रवींद्र सोनवणे

 

१.

प्रत्येकाची धडपड असते जगण्यासाठी
जीवन मोठे युद्धच ठरते जगण्यासाठी !

दुःखांनी जर्जर झालेल्या त्या आत्म्यांना
आपुलकीची फुंकर पुरते जगण्यासाठी

जेव्हा जेव्हा पोटासाठी  वणवण होते
संघर्षाची किंमत कळते जगण्यासाठी!

आत्म्याला तर मुक्ती मिळते मेल्यानंतर
इच्छांची आसक्ती छळते जगण्यासाठी!

खचलेल्यांना हिंमत देतो जेव्हा आपण
आशा,उर्जा त्यांना मिळते जगण्यासाठी!


मायेची पाखर गरजेची असते जाणा
सृष्टीसुद्धा नभ पांघरते जगण्यासाठी!

कर्मगतीचा फेरा काही चुकला नाही
आसक्ती कोणाला सुटते जगण्यासाठी?

हसण्यासाठी सच्चे कारण दुर्मिळ झाले
कृत्रिम हासू जग आचरते जगण्यासाठी!


क्षण कुठला मृत्यूचा हे  माहित नसल्याने
अभिलाषा हृदयी अंकुरते जगण्यासाठी

           
२.

दुःख दुनियेचेच जेव्हा एक झाले
सांत्वनांचे मार्गही कित्येक झाले

सोसण्याचा धीर जेव्हा संपलेला
आत्महत्यांचे किती उद्रेक झाले

कोणती जादू तिच्या नजरेत होती
सत्तरीचे वृद्धही दिलफेक झाले

षड् रिपूंना ठेवले काबूत ज्यांनी
ते तथागत या जगी बस एक झाले
    
जिंदगीभर वंचना खात्यात आली
कॅश ना कुठलेच त्यांचे चेक झाले!

कोणत्या मापात हा विध्वंस तोलू?
वादळाचे केवढे अतिरेक झाले !

राबले भट्टीत छोटे हात जेव्हा
वाढदिवसाला कितींचे केक झाले

३.

भेटण्या येतात आता नित्य मजला वादळे
मी असा की संकटांचे रोज करतो सोहळे

पाहण्या माझी परीक्षा दैव फासे टाकते
संकटांचे रूप घेते रोज नियती वेगळे!

वार आयुष्या तुझे मी झेलतो आहे पुन्हा
सोडले आहे तुला मी याचसाठी मोकळे!

संकटांवर मात करुनी चालले जे जे पुढे
जीवनाचा अर्थ त्यांना नेमका येथे कळे!

आयते मिळणार नाही गोष्ट इतकी जाण तू
मनगटी ज्याचा भरवसा भाग्य त्यालाची फळे!

रंजल्यांचे दुःख जेव्हा आपलेसे वाटले
भेटली सेवेत तेथे तू  विठाई सावळे!

तू तुझा दर्जा नको सोडूस इतके सांगतो
माणसांमध्येच असती टोचणारे कावळे!

चार गझला : जयप्रकाश सोनुरकर



१.

बातमी वाऱ्यासवे गावात आली
एक शंका नेमकी  डोक्यात आली

फक्त ऐकानेच केली चूक भलती
माणसांची जिंदगी धोक्यात आली

मागतो प्याला लगोलग खूपदा तो
कोणती नवखी नशा प्याल्यात आली

वल्गना आपापली केली खुशीने
जिंदगी त्यांचीच मग गोत्यात आली

बाप झिजला जन्मभर मातीत इथल्या
मौज करण्या लेकरे शहरात आली

२.

चाललो मी कुठे भान आहे कुठे
जिंदगी ही तशी  छान आहे कुठे

गावगाड्यातही मी बदल पाहतो
थोर लोकासही  मान आहे कुठे

चार ओळी तुझ्या, वेदना सांगते
जीर्ण पत्रातले पान आहे कुठे

सोडले मी तुला सोडले तू मला
खोल जखमेवरी ...ध्यान आहे कुठे

झाड पक्ष्याविना राहिले का ? इथे
मुक्त संचारण्या रान आहे कुठे

बातमी गोड ही का ?कडू वाटली
योग्य ऐकावया कान आहे कुठे

न्याय गावी खरा  व्हायचा आपुल्या
हेच न्यायालयी  दान आहे कुठे

३.

हा गुलामी भोगण्याचा काळ नाही

वेदना सांभाळण्याचा काळ नाही


टाक त्या झटकून साऱ्या शृंखलांना

हा स्वतःला जाळ्ण्याचा काळ नाही


कोण, केंव्हा, डंख मारे ना भरोसा
साप , विंचू पाळण्याचा काळ नाही

एकदा प्रतिकार कर सामर्थ्यशाली
आसवांना गाळण्याचा काळ नाही

झुंज द्या माझ्या मुलींनो संकटाशी
हात आता जोडण्याचा काळ नाही

४.

फक्त ताज्या बातमीची वाट बघतो
कोणती येणार येथे लाट बघतो

संकटे येवोत जनतेवर भलेही
राजसत्तेचा बसाया पाट बघतो

कर्ज हा पर्याय नाही उन्नतीचा
मी दशा बदलायची वहिवाट बघतो

टाळतो रे मी लबाडांच्या सभांना
मेंढरांनी गच्च भरला हाट बघतो

हातभर पोटास या चिंता उद्याची
भाग्यरेषा सांगणारा भाट बघतो

लेकरांचा बाप गेला फास घेवुन
संकटांची सावली घनदाट बघतो
.......................
जयप्रकाश सोनुरकर
बॅचलर रोड ,वर्धा
मो .न .९७६५५४७९४०

तीन गझला : अविनाश चिंचवडकर


१.

जरी मी राहिलो नाही तरी हे व्हायचे आहे
उद्याला गीत हे माझे जगाला गायचे आहे
 
अरे निष्ठुर आयुष्या मला तू सांग रे आता 
असे हे विष दुःखाचे किती मी प्यायचे आहे 
 
मनाला सारख्या माझ्या दिलासा देत मी होतो 
यशाच्या वाटचालीला तुलाही जायचे आहे 
 
अताशा आसमंती का गुलाबी गंध हा येतो 
अताशा या फुलांना का दवांनी न्हायचे आहे 
 
जरी अंधार हा सारा सभोती दाटला आहे 
उद्याला चांदणे माझ्या घराशी यायचे आहे !
 
२.
 
जेथे खुळेपणाला काहीच वाव नाही 
आता असे कुठेही नाहीच गाव नाही 
 
झेलीत मीच गेलो आवर्त वेदनांचा 
बाकी कुणावरीही त्याचा प्रभाव नाही
 
हातात लोक येथे बंदूक ठेवती अन 
त्यांचा म्हणे सुडाचा कुठलाच डाव नाही
 
कोणी नका विचारू आम्हा अता खुशाली 
पोटातल्या भुकेचा काही अभाव नाही
 
माझी इमानदारी इतकी फळास आली 
माझ्या चितेवरीही माझेच नाव नाही
 
३.

फुलांना आवडाया अन कळाया लागलो आहे 
पुन्हा आयुष्य मी आता जगाया लागलो आहे 
 
असो लखलाभ ती त्यांना तयांची वेद अन गीता 
अशा खोटारड्यांना मी हसाया लागलो आहे 
 
कसे ते बोलती आता सुडाची वेगळी भाषा 
कशाला सत्य मी त्यांचे वदाया लागलो आहे 
 
जयांना कालचे माझे नसे अस्तित्वही ठावे 
सभोती मीच का त्यांना दिसाया लागलो आहे 
 
मला चिंता नसे माझ्या उद्याच्या त्या विनाशाची 
जगाची आज मी चिंता कराया लागलो आहे 
.......................
अविनाश चिंचवडकर 
बंगलोर
Mobile - 9986196940

तीन गझला : सौ. दिपाली महेश वझे


१.

वळणावर दगडांना मागे सारत होते
जिद्दीने आयुष्याला मी घडवत होते

रस्ता कोठे चुकला होता कळला नाही
झिजलेल्या आशेवर बहुधा चालत होते

जीवाच्या मोहाशी साधे उरले नाही 
तलवारीच्या धारेवर मी धावत होते

हिरव्या पानी आयुष्याचे सोने केले
गळल्यावर मातीला सारे सांगत होते

जीवन गाथा वाचत होते जाता जाता
कोड्या मध्ये अजुनी कोडे भासत होते

२.

याच वाटेवर सुखाचे गाव होते
आठवांनी घेतलेले नाव होते

दूर मी होते तरी नजरेत त्यांच्या 
सांत्वनांचे खोल दडले भाव होते

आरसा बघता जराशी थांबले मी
काय झाले ते क्षणांना ठाव होते

गात असते आसवांना मी अजूनी
तळ उराशी कोरलेले घाव होते

भावनांना काढल्या वेड्यात सार्‍या 
वास्तवाचे गूढ रचले डाव होते

३

माणसांना कोणता आधार आहे
माणसांना माणसांचा भार आहे
 
भोगते आता कुठे मी जीवनाला
लागला भलताच हा आजार आहे 

ठेव जखमांना उराशी बांधलेल्या
वेदनेला बोचणारे फार आहे
 
मोह माया सोडवे ना या क्षणाला 
लाख मोलाचा असा संसार आहे

देत जा देणे तुझे काही जगाला
प्रेम करणे तर इथे व्यापार आहे

सौ. दिपाली महेश वझे, बेंगळुरू
मो. ९७१४३९३९६९  

जाणिवांचे आशयघन संदर्भ 'मधुमिश्किलीतून ' मांडणारे गझलकार मधुसूदन नानिवडेकर : निशा डांगे



         महाराष्ट्रातील ख्यातनाम आणि रसिकांच्या हृदयावर राज्य करणारे रसिकप्रिय कवी, गझलकार, लेखक, ज्येष्ठ पत्रकार कै. मधुसूदन नानिवडेकर. ९ व्या अखिल भारतीय मराठी गझल संमेलनाचे अध्यक्ष असलेले नानिवडेकरांचे नाव घेतले की, 'तू जन्माची भूल ' आणि 'हरकत नाही ' ह्या त्यांच्या गझला आधी ओठांवर रुंजी घालतात. मनाचे तरल भावबंध गुंफणारा आणि जाणिवांचे संदर्भ मांडणारा नानिवडेकर यांचा 'चांदणे नदीपात्रात ' हा काव्यसंग्रह प्रकाशित आहे. २००४ मध्ये प्रकाशित झालेल्या या काव्यसंग्रहाची पुणे विद्यापीठात संदर्भ ग्रंथ म्हणून निवड करण्यात आलेली आहे. या काव्यसंग्रहास लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर चिपळूणचा अत्यंत प्रतिष्ठेचा कविवर्य द्वारकानाथ शेंडे विशेष साहित्य पुरस्कार   प्राप्त झालेला आहे. युआर एल फाउंडेशनचा गझल गौरव पुरस्कार, अष्टपैलू कलामंचचा गझल भूषण पुरस्कार  कोमसापचा कवी माधव पुरस्कार असे अनेक पुरस्कार नानिवडेकर यांच्या शिरपेचात खोवलेले आहेत. 

            मधुसूदन नानिवडेकर यांनी दैनिक पुढारी मध्ये काही काळ उपसंपादक म्हणून कार्य केले. २०२१ अर्थात आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते महाराष्ट्र टाइम्सचे सिंधुदुर्ग प्रतिनिधी म्हणून काम करीत होते. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नानिवडेकर या त्यांच्या जन्म गावाच्या ग्रामपंचायतीचे ते सरपंच होते. एक राजकारणी माणूस आणि तोही गझलकार अगदीच जगावेगळे समीकरण वाटतं ना! पण ….हे खरं आहे. प्रशासन सेवेत कार्य करत असताना त्यांनी समाजातील तळागळातील समस्या जाणून घेतल्या.  सरकारी योजना आणि सामान्य माणूस या सर्वांचा ताळमेळ घालून कधी टीकात्मक लेखन तर कधी सकारात्मक लेखन ते करत असत. प्रशासकीय सेवेतील अतिशय रूक्ष भाषेचा सुद्धा त्यांनी आपल्या  लेखन कौशल्याने योग्य वापर केला. राजकारण असो वा शिक्षण क्षेत्र, अलंकृत ललित लेखन असो वा वैचारिक लेखन, साहित्यातील प्रत्येक साहित्य प्रकार ते लीलया साकारत असत. त्यांच्या खालील सुट्या शेरांवरून हे वाचकांच्या सहज लक्षात येईल.

धनादेश सत्तर रुपयाचा
पाऊणशे त्याची वटणावळ
निधी कमी पडणाच नाही
सुभाषित हे किती भयंकर

रोज त्याच त्या सभा बैठका
ठराव झाले फक्त ढीगभर

              अनेकदा नात्यांमधील ओलाव्याचे पेट्रोल संपल्यावर धक्का मारत मारत नाते पुढे रेटत न्यावी लागतात. ओढ, उत्कटता केव्हाच निखळून गेल्यावर प्रेमाचे इंजिन वारंवार रिपेयर करून करून एस टी महामंडळाच्या गाड्यांप्रमाणे नाती पुढे पुढे सरकवावी लागतात. केवळ जीवनाचे रहाटगाडे पुढे पुढे चालावे यासाठी.व्यवस्थापनाचा सुरेख ताळमेळ आयुष्याशी जोडून त्यांनी आपल्या लेखनातून वास्तवदर्शन घडवले होते.

प्रेम डबघाईला येत आहे तरी
चालवू या महामंडळासारखे

              माहितीच्या अधिकारालाही त्यांनी सोडले नाही. माहितीच्या अधिकाराचा योग्य उपयोग कमी आणि दुरुपयोग जास्त होतो. शृंगार रसाची रसात्मकता त्यांनी माहितीच्या अधिकाराकडे सूचकता दर्शविण्यासाठी अगदी चपखलपणे वापरली.

माहितीचा दे मला अधिकार थोडा
ये गडे लाजू नको आता जराही

         'सिंधुदुर्गचे सुपुत्र ' मधुसूदन नानिवडेकर यांचा जन्म कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाघिवरे गावात १८ मे १९६० रोजी झाला होता. नानिवडेकरांनी आपल्या आईकडून कविता लेखनाची प्रेरणा घेतली होती. त्यांच्या आईंना श्लोक तोंडपाठ असायचे. त्या नेहमी काहीतरी गुणगुणत राहायच्या. एक दिवस लहानपणी मधुसूदन आपल्या आईसोबत पाणी आणायला विहिरीवर गेले. तिथे एक स्त्री भर उन्हात पायाला कुंभ्याची पाने बांधून पाणी भरायला आली होती. त्या पानांतूनही तिचे पाय पोळत होते. तिच्या वेदनांतून  नानिवडेकरांच्या पहिल्या कवितेची निर्मिती झाली. १९७७ सालापासून ते कवितेच्या प्रेमात पडले आणि तिथून त्यांचे संपूर्ण आयुष्याचे संदर्भ बदललेत. वयाच्या सतराव्या वर्षांपासून त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली.  'ठेव तू मनातल्या मनात' ही कविता गझलसम्राट सुरेश भट यांच्या निदर्शनास आली. सुरेश भट यांनी नानिवडेकर यांना गझललेखनास प्रोत्साहन दिले. त्यानंतर ते गझलेकडे वळले. संपूर्ण महाराष्ट्रात ते गझलकार व साहित्यिक म्हणून लोकप्रिय झालेत. नानिवडेकर आपल्या लिखाणातून भावभावनांच्या कुंचल्यातून जाणिवांचे आशयघन संदर्भ रेखाटत. एक संवेदनशील कवी, एक प्रतिभावंत गझलकार, एक दर्जेदार साहित्यिक, पत्रकार, राजकर्ते म्हणून ते जेवढे ओळखले जातात. तेवढेच एक हळव्या मनाचा साधा सरळ माणूस म्हणून मधुसूदन नानिवडेकर यांना त्यांचे निकटवर्तीय ओळखतात. त्यांच्या स्वभावातील विनोदी शैली सुद्धा रसिकांना चांगलीच परिचित आहे. 'मधुमिश्किली' या आपल्या खास विनोदी शैलीतून ते रसिकांशी थेट मधुसंवाद साधतात. हसत खेळत रसिकांना खिळवून ठेवून आपल्या बहारदार रचनांनी मैफिल गाजवतात. विनोदी शैलीतून ते समाजातील व्यंगावर, अनिष्ट रूढी परंपरांवर भाष्य करतात. त्यांचे शिक्षण फक्त दहावीपर्यंत असले तरीही मराठी साहित्यात ते निपुण होते. मराठीच्या प्राध्यापकांच्या तोडीस तोड त्यांचे मराठी भाषेवर प्रभुत्व होते. कितीही बिकट परिस्थिती असली तरीही खळखळून हसायचे. विनोदी शैलीतून त्यावर व्यंग करत स्वतःलाच सकारात्मक प्रेरणा द्यायचे. 'हरकत नाही' हे जणू त्यांच्या आयुष्याचे ब्रीदवाक्य होते. नानिवडेकर यांची अतिशय लोकप्रिय गझल 'हरकत नाही' त्यांच्या मिश्किल स्वभावाला अधोरेखित करते.

हासलीस तू नुसते वरवर हरकत नाही
म्हणालीस तू भेटू नंतर हरकत नाही

घड्याळात पाहिले तिने.. पण समजून गेलो
निघावयास नानिवडेकर हरकत नाही

               महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात त्यांना बोलावले असतांना त्यांनी सादर केलेली गझल ऐकून सर्व विद्यार्थी त्यांच्या गझला व कविता अक्षरशः डोक्यावर घेत असत. नानिवडेकर आणि प्रेम कविता, विनोदी कविता यांचे जुने समीकरण आहे. मंगेश पाडगावकर यांची 'जिप्सी ', कुसुमाग्रजांचा 'विशाखा' जसा तरुणाईला भुरळ पाडतो त्याचप्रमाणे नानिवडेकरांच्या प्रेम कविता, गझल तरुणाईला बेधुंद करतात. टाळ्यांच्या कडकडाटाने संपूर्ण सभागृह गुंजत असे.

कसे मी जगावे स्वभावाप्रमाणे
तुलाही हवा मी ठरावा प्रमाणे

असा राग येतो तुझा रोज हल्ली
तरी हासतो मी सरावा प्रमाणे

अखेरीस ती त्यास सांगून गेली
(अरे, तू मला फक्त भावाप्रमाणे)

                 अशा रचनांनी रसिक आपलं सर्व सुखदुःख क्षणभर विसरून खळखळून हसत. सादरीकरण कौशल्य शिकावे तर ते नानिवडेकर यांच्याकडूनच. त्यांची रसिकांच्या हृदयाचा ठाव घेणारी संवादफेक त्यात त्यांचे चोख पाठांतर अगदीच सर्व अद्भूत! कोजागिरीच्या मैफिलीतील त्यांचे सादरीकरण म्हणजे जणूकाही आकाशातील 'चांदणे नदीपात्रात ' उतरले. त्यांची प्रत्येक मैफिल म्हणजे साहित्यिक मेजवानी. समोर बसलेल्या रसिकांच्या हृदयाचा अचूक वेध घेऊन समयोचित काव्यपंक्ती, शेर, विनोदाचे चांदणे ते बेमालूमपणे उधळत असत. वसंतातील चैत्रमास असो वा कोजागिरी मैफिलित रंग भरणे एवढेच काय ते त्यांना माहीत होते. ते म्हणत -

अंतरात नेहमीच
चैत्रमास पाहिजे
पालवीसही नव्या
जुना सुवास पाहिजे

हे सर्व फक्त अनुभवावं, त्यावर लिहिणे शक्य नाही. त्यांची एक षडाक्षरी रचना जी त्यांनी सह्याद्री वाहिनीवरील मुलाखतीत सादर केली होती. ती त्यांच्याच शैलीत ऐकण्यात एक वेगळीच मजा आहे. त्यातील काही ओळी…..

हल्ली तू पाऊस
पिऊन घेतेस
पाऊस पिऊन
बेभान होतेस
बेभान होताना
माझेच एकांती
नाव तू कशाला
उगीच घेतेस

रसिकांच्या वाहवात नानिवडेकर कधी वाहून गेले नाहीत. प्रतिभेचं देवदत्त लेणं लाभलेलं असतांनाही त्यांना त्याचे भूषण नाही. 'मला कुठे काय येतंय?' असे ते सहजपणे बोलून जात.  त्यांच्या अनन्यसाधारण व्यक्तिमत्त्वाचे प्रगटीकरण करणारा त्यांचाच एक शेर

मी लिहू शकणार नाही आत्मवृत्ताचे रकाने
तेवढा आहे कुठे साधासुधा इतिहास माझा

              गझल, कविता लेखनात अपेक्षित असते तो मनांचा थेट संवाद. भावभावनांची व्यक्तता, तसेच मानवी वृत्तीचे बारकावे, निसर्गवर्णन, प्रेम, विरह, सुखदुःख, सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ नानिवडेकर यांच्या कवितेत हे सर्वच आहे. म्हणूनच गेली कित्येक दशकं ते रसिक वाचकांच्या हृदयावर विराजमान आहेत. त्यांच्या कित्येक कविता आणि गझलांची गाणी झालीत. शृंगार आणि प्रेम हा स्थायीभाव त्यांनी जिवंत ठेवला आहे. पतिपत्नी यांच्या अतूट नात्यात होणाऱ्या थोड्या कुरबुरीतही गझल तयार होऊ शकते? यावर विश्वास बसत नाही ना! पण ते मधुसूदन नानिवडेकर यांनी करून दाखवले. त्यांच्या अनेक गझलांना गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी आपले स्वरसाज चढवून घराघरातून देशविदेशात पोहचवले आहे.

भलभलते सांगतेस, का उगाच भांडतेस?
जन्माचे चुकलेले, गणित पुन्हा मांडतेस

क्षणभर थांबून गडे, मोज जुने आराखडे
घाव नवे त्यावर तू, मीठ किती सांडतेस?

प्रेयसी रुसली असेल तर तिचा रुसवा सोडवण्यासाठी अतिशय सुंदर गझल त्यांनी लिहिली आहे. नानिवडेकर सर नवरंग चित्रपटातील नायकाप्रमाणे आपल्या पत्नीलाच प्रेयसी समजून रचनांची निर्मिती करतात.

हा अबोला ठीक नाही
बोल बाई बोल काही

पापण्यांनी बोलण्याचे
कोणती आहे तऱ्हा ही

     भांडण झाल्यावर पत्नीशी बोलण्याची सुद्धा त्यांची हिंमत होत नसे. अशावेळी ते गझल लिहायचे भांडणं झाली तरी गझल, रुसवा - अबोला असला तरी गझल लिहायचे. आनंद, दुःख आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगाला व घटनेला अनुसरून कुठल्याही परिस्थितीत गझल आणि कविता लिहिणारे नानिवडेकर हे एकमेव कवी, गझलकार होते. बोलत असतानाही ते सहजपणे कविता करून जायचे तेही वृत्तबद्ध! त्यांच्याशी चाललेल्या संवादातून इतरांच्याही कविता तयार व्हायच्या. बोलता-बोलता ते त्यांच्या लयबद्ध कविता, शेर गाऊन दाखवायचे त्यांना आवडलेल्या कवी, गझलकारांच्या कविता, शेर देखील त्यांना मुखपाठ असायचे. पत्नीला चहा करून मागण्याची हिंमत होत नव्हती मग त्यावरही गझल लिहिली विशेष म्हणजे त्यांना त्यानंतर चहा मिळाला तेही न मागताच! त्यांच्या पत्नीने त्यांचे हे गझलप्रेम आयुष्यभर जपले.

तुझ्याकडे मागावे काही
ही तर माझी हिम्मत नाही

समजून काही द्यावे घ्यावे
तुझी तेवढी दानत नाही

प्रेमाचा व्यवहार खुला हा
करार नाही करावयाचा

किती द्यायचे किती घ्यायचे
कुणीच आधी ठरवत नाही

                  लय आणि आशयसमृद्धीचे धनी असलेले गझलभूषण मधुसूदन नानिवडेकर नवोदितांना कविता व गझललेखनात न कंटाळता मार्गदर्शन करत होते. नवोदितांना आपल्या ज्ञानाचे, आपल्या अनुभवाचे दान देतांना ते हातचे काही राखून ठेवत नसत. त्यासाठी त्यांनी अनेक काव्य, गझललेखनाच्या कार्यशाळा घेतल्या. ऑफलाइन आणि ऑनलाईन या दोन्ही माध्यमातून ते कार्यशाळा घेत असत. नवोदितांचे ते दीपस्तंभ व भरभक्कम आधारवड होते. नवोदितांच्या कविता आवडल्या तर त्यांना ते पत्र पाठवत असत. असंच एक पत्र त्यांनी हिंमत डांगे यांना पाठवून त्यांची मेनका वृत्तातील गझल आवडल्याचे कळवले होते. कालांतराने सोशल मीडियाच्या जगात ते फोन करून आणि मॅसेज देऊन कविता आवडल्याचे कळवत असत. आवडलेल्या साहित्यावर दिलखुलासपणे खुली दाद प्रथितयश तसेच नवोदितांनाही द्यायचे. नवोदितांना सहसा असे ज्येष्ठ आणि लोकप्रिय साहित्यिक दाद देत नाहीत परंतु नानिवडेकरांच्या ठायी कुठल्याही गर्व, अहंकाराचा लवलेशही नव्हता. त्यांना प्रत्यक्षात कधीही न भेटलेले नवोदित सुद्धा त्यांच्याशी संवाद साधून आज प्रथितयश साहित्यिक झाले आहेत. याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. बोलता बोलता त्यांनी पारिजातकावर कविता केली मी पारिजातकावर गद्यात लालित्यपूर्ण शैलीत बोलले. ते मला लगेच म्हणाले, ''तू ललित छान लिहू शकतेस. '' इतकेच नव्हे तर ते सारखा पाठपुरावा करत राहिले. मी 'आनंदाने बहरलेला प्राजक्त ' हा ललित लेख लिहिला. पहिलाच ललित लेख अक्षरबंधच्या दिवाळी अंकातून अतिशय लोकप्रिय झाला. त्या लेखामुळे मला जनमंगल साप्ताहिकात ललित लेखनाचे सदर मिळाले ते आजतागायत सुरू आहे. असे अनेक नवोदित हात नानिवडेकरांनी लिहिते केलेत. नवोदित ज्येष्ठ असा कधीही भेदभाव मनात न बाळगता साहित्य दिंडीतील प्रत्येक वारकऱ्यास मान देत असत. मा. नामानंद मोडक यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भरवलेल्या चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी नानिवडेकर यांनी दीपप्रज्वलन करत असतांना उपस्थितांपैकी सरिता पवार या नवोदित कवयित्रीला व्यासपीठावर बोलवून आपल्यासोबत दीपप्रज्वलनाची संधी दिली होती. आज त्या कोकणातील सुप्रसिद्ध कवयित्री आहेत.

        ते नेहमी म्हणत असत, ''जुन्या लोकांनी नवोदितांच्या खांद्यावर हात टाकून त्यांना आपल्या सोबत नेले पाहिजे." नानिवडेकर नवोदितांसाठी सकारात्मक ऊर्जा स्त्रोत होते. ते केवळ मार्गदर्शन करत नव्हते तर त्यांच्या ओळखीतील वृत्तपत्रे, मासिके, दिवाळी अंक यातून नवोदितांचे साहित्य ते प्रकाशित करत असत. कविता गझललेखना सोबतच सादरीकरणाचे कौशल्यही ते विकसित करत असत. इतकेच नव्हे तर नवोदितांच्या संग्रहाला प्रस्तावना देऊन त्यांना साहित्य वाटेवर धीटपणे चालण्यास प्रेरणा देत असत. ज्येष्ठ साहित्यिक असो वा नवोदित प्रस्तावनेत ते आपले मत स्पष्टपणे मांडत. त्यांचा हा स्पष्टवक्तेपणा आज सर्वांनी अनुसरायला हवा. नवोदितांवरच नव्हे तर जुन्या दिवंगत आणि दिग्गज साहित्यिकांनाही अडगळीत टाकणारी एक फळी प्रत्येक काळात असते. फक्त ताशेरे ओढण्यात ती स्वतःला धन्य समजत असते. अशा लोकांचा खरपूस समाचार ते आपल्या भाषणातून लेखातून घेत असत. वि. स. खांडेकर साहित्यिकच नव्हते असे विधान राजरोसपणे करणाऱ्या साहित्यिकांनी खांडेकरांसह कोकणात होऊन गेलेल्या साहित्यिकांवर नजर टाकावी असे त्यांनी कोमसापचे अध्यक्ष सुरेश ठाकूर संपादित आणि 'सत्वश्री प्रकाशन 'तर्फे प्रकाशित 'सिंधुसाहित्यसरिता ' या पुस्तकाच्या प्रस्तावनेत स्पष्टपणे लिहिलेले आहे. मराठी साहित्याच्या समृद्धीत भर घालणारे कोकणातील अनेक मराठीचे शिल्पकार काळाच्या पडद्याआड गेले परंतु त्यांचे देदीप्यमान कार्य आणि त्यांनी निर्माण निर्माण केलेल्या वैभवशाली साहित्यकृतींचा परिचय नवीन पिढीला व्हावा म्हणून कोमसापच्या मालवण शाखेने 'सिंधु साहित्य सरिता' हे पुस्तक प्रकाशित केले कोकणातील २१ साहित्यिकांचा परिचय मालवण कोमसापच्या १६ नव लेखकांनी केलेला आहे ते पुस्तक आजही सर्वत्र गाजत आहे. या पुस्तकाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे नानिवडेकर यांची 'जाणिवेचा अनोखा सरित्सागर संगम ' या शीर्षकाखाली लिहिलेली प्रस्तावना!

      ते अगदीच स्पष्ट वक्ते होते.ह्याचे उदाहरण द्यायचे म्हणजे कणकवलीचे डॉ. सतीश पवार यांनी त्यांना आपल्या 'मी कवी थातुरमातुर' या पहिल्या काव्यसंग्रहात शुभेच्छा देणारा त्यांचा अभिप्राय मागितला परंतु बरेच दिवस त्यांनी अभिप्राय दिला नाही तेव्हा डॉ. पवारांनी त्यांना मॅसेज करून सांगितले की, फक्त तुमचा अभिप्राय राहिलाय. तेव्हा ते आपल्या स्पष्टवक्त्या शैलीत म्हणाले, "तुम्ही सांगाल आणि मी लिहीन असा मी सांगकाम्या कवी नाही परंतु तुमचा पहिला संग्रह आहे त्यामुळे मी निगेटिव्ह काही लिहिणार नाही. निगेटिव्ह आढळले तर ते खाजगीत सांगेन."

     फक्त दहावीपर्यंत शिकलेल्या व्यक्तीच्या मागे अनेक साहित्यिक प्रस्तावना, अभिप्राय घेण्यासाठी मागे लागलेले असत. डॉ. सतीश पवारांच्या मते, 'हा प्रतिभेने शिक्षण व्यवस्थेवर घेतलेला कडकडीत सूड! '.मधुसूदन नानिवडेकर कमी शिकलेले होते परंतु मराठीच्या प्रचुर पंडिताला लाजवेल असे त्यांचे मराठी भाषेवर प्रभुत्व होते. 'मराठीचे संदर्भ साहित्य' म्हणून ते कोकणात सुप्रसिद्ध होते. मराठी साहित्यातील कुठलाही प्रश्न विचारा उत्तर तयार! देहाची उंची कमी असलेल्या नानिवडेकरांच्या साहित्याची व बुद्धिमत्तेची उंची कोणत्याही फूट पट्टीत मोजता न येण्याइतपत मोठ्ठी होती. 'मूर्ती लहान पण कीर्ती महान 'याचे मूर्तिमंत उदाहरण.

      कोकणातील नानिवडेकर हा 'संदर्भ साहित्य' सर्वांसाठी खुला होता. ते कोमसापचे अविभाज्य भाग होते. कोणताही कार्यक्रम असला की त्यांची हजेरी असे. कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुका शाखांना त्यांचे साहित्यिक मार्गदर्शन असायचे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्याच्या कोमसापचे २०१३ ते २०१८ एकूण पाच वर्षे ते अध्यक्ष होते. अगदी सहज सोप्या शब्दात ते वाचकांच्या काळजात घर करून जायचे. या काळजाचा त्या काळजाशी थेट संवाद घालण्यासाठी "सोपे लिहावे आणि सोपे लिहीणेच कठीण आहे" असे ते नेहमी म्हणत. निरनिराळी उदाहरणेआणि दाखले देऊन ते सोप्या पद्धतीने नवोदितांना समजावून सांगत. काव्य म्हणजे काय असे विचारले असता त्यांनी दिलेले उत्तर वरील विवेचनाचे समर्थन करते.

            'माणसाला एक चेहरा असतो. चेहऱ्याच्या आत एक मन असते. मनाच्या आत आणखी एक मन असतं. तिथेच कुठेतरी हृदय असतं आणि एक काळीजही असतं. त्या काळजाच्या आत एक जाणिवेचा खोपा असतो. त्या खोप्यात अनेक कप्पे असतात. त्या कप्प्यातून जे उद्गार बाहेर पडतात ते काव्य.' नानिवडेकरांची वाक्ये कविता होऊन नवोदितांच्या कोऱ्या हृदयावर कोरल्या जातात. गझलेला सर्वसामान्य लोकांच्या काळजात रुजवण्याचे अमूल्य कार्य त्यांनी केले. नवी मुंबईत वाशी येथे ११ नोव्हेंबर २०१७ रोजी भरलेल्या नवव्या अखिल भारतीय गझल संमेलनाचे ते अध्यक्ष होते. कोकणभूमीला अध्यक्षपदाचा हा सन्मान पहिल्यांदा मिळाला तो केवळ नानिवडेकर यांच्यामुळे. व्यासपीठावर आचरे गावाचा सत्कार झाला. अध्यक्षीय भाषण करतांना आनंदनाने सद्गदित होऊन त्यांचे हृदय भरून आले. त्यांचे ते अध्यक्षीय भाषण खूप गाजले होते.

       मधुसूदन नानिवडेकर भावभावनांचे हळवे मनतरंग गुंफतांना त्यांचा गुंता होणार नाही ह्याची काळजी घेतात. कल्पनाविश्वात रमण्याबरोबरच वास्तव जीवनातील समस्या देखील त्यांनी आपल्या लिखाणातून रेखाटल्या आहेत. शिक्षणसंस्था, प्रशासकीय कारभार ते तंटामुक्ती पर्यंतचे सर्व प्रश्न त्यांच्या कविता नि गझलेत आलेत. 'गझलमाधुर्य ' म्हणून त्यांना संबोधले जायचे. कोकणात तर कुणी दुःखी, आजारी असेल तर त्या व्यक्तीला नानिवडेकरांच्या विनोदी व हलक्याफुलक्या कविता, गझल ऐकवल्या जातात. त्यांच्या मिश्किल शैलीचे आणि गालावरच्या खळीचे अख्खा कोकण प्रांताला वेड लावले होते. सकारात्मक ऊर्जा तसेच अश्रूंच्या फायामधून अत्तर फवारणी करत त्यांची गझल खट्याळ, खोडकर होत शेवटी सुखांतिकेत निरोप घेते.

नानिवडेकर यांच्या गझलेतील काही शेर काळजावर वार करून जातात -

मी कधी केली न माझ्या वेदनांची रोषणाई
मी दिवाळी सोसण्याची साजरी साधीच केली

घावही त्यांनीच केले दंशही त्यांनीच केले
शेवटी श्रद्धांजलीची भाषणे त्यांनीच केली

      'कोकण Now ' या प्रसिद्ध चॅनल द्वारे मा. विजय शेट्टी यांनी कोकणातील कवींच्या काव्यसादरीकरणाचा 'प्रभाते मने' हा कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमाचे नानिवडेकर प्रमुख mentor होते. अलीकडच्या काळात नानिवडेकर पत्रकारितेमुळे तळेरे येथे राहत होते. पत्रकार असूनही नानिवडेकर अत्यंत हळव्या मनाचे होते. कधीही कुणाचेही मन चुकूनही दुखावत नसत. त्यांना कोणी वाकडे बोलले तरीही ते वाकड्या शब्दांत प्रतिउत्तर देत नसत. आतल्या आत त्यांच्या मनाला ती टोचणी सतत बोचत असे. त्यातूनच आर्थिक परिस्थिती अगदीच बेताची.  ताण -तनावाने वरचेवर त्यांची तब्येत बिघडत असे. सतत उच्च रक्तदाब व मधुमेह वाढल्याने ते वारंवार आजारी पडत. अति विचाराने त्यांना सतत थकवा जाणवत असे. अचानकपणे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचे वयाच्या ६१ व्या वर्षी अकस्मात निधन झाले.

अवेळीच हा पाऊस आला
घरटे माझे भिजून गेले
आणिक माझे प्राक्तन आता
पावसात वणवणते आहे

      पावसातही वणवण भटकणारी एक व्याकुळता आता कायमची विसावली आहे. 'आषाढास्ये प्रथम दिवसे' गझलेचा मेघदूत देव दरबारात इहलोकीचा वृत्तांत सादर करण्यास कायमचा निघून गेला. दिनांक ११ जुलै २०२१ च्या पावणे दोनच्या सुमारास सुमारे चाळीस वर्षाचा आनंदयात्री म्हणून केलेला गझलप्रवास थांबला.  नानिवडेकरांच्या अशा अचानकपणे निघून जाण्याने साहित्य विश्वात कधीही न भरून निघणारी खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अनंताच्या प्रवासाला निघालेल्या नानिवडेकरांच्या काही जुन्या कवितेतील ओळी -

झाडामधला काजवा
गावी सूर्याच्या निघाला आणि आभाळाच्या घरी सुन्न काळोख दाटला

देतेस कशाला आता
मागील जुने संदर्भ
सरणावर जळतो आहे
स्मरणांचा  हिरवा दर्भ

..............................

निशा संजय डांगे(नायगांवकर)
पुसद
8329065797