Showing posts with label राजीव मासरूळकर. Show all posts
Showing posts with label राजीव मासरूळकर. Show all posts

तीन गझला : राजीव मासरूळकर


१.

किती असतात ना सुंदर मनाचे भास काही
मला ऐकायला येती फुलांचे श्वास काही 

शहारे देत रूंजी घालतो आहे कधीचा
तिची बट बोललीशी वाटते वा-यास काही

स्वत:चा धर्म राखावा, तुलाही वाटते का
कुणाच्या येत जा केव्हातरी कामास काही

कधीची रात्र सरली अन् किती वर सूर्य आला
तरी बिलगून दवबिंदू दिसति गवतास काही

सरळ रेषेत तू चालू कसा शकतोस इतका
कधी अभ्यासला नाहीस का इतिहास काही

२.

कुठे स्वातंत्र्य आल्यावर कुणाला देश मिळतो
मला आनंद याचा की मला गणवेश मिळतो

दिलेले काम तो करतो निमुट बैलाप्रमाणे
मिळत काहीच नाही, बस् नवा आदेश मिळतो

इथे सर्वस्व लावावे पणाला लागते बघ
तरी केवळ सुखाचा खिन्नसा लवलेश मिळतो

किती आटापिटा केलाय बोलायास आपण
अता एकाच क्लिकवर आतला संदेश मिळतो

मनाला पाहिजे असते मदत किरकोळशी पण
नकोसा नेमका तेव्हा खडा उपदेश मिळतो

स्वत:सोबत अनेकांचे मरण तात्काळ दिसते
अशावेळीच जगण्याचा खरा उद्देश मिळतो

मला मी शोधतो आहे कधीचा पण मिळेना
कधी राजू कधी राजीव वा राजेश मिळतो

३.

शोधतो आहे कधीचा मी मनाचा तळ
भेटते केवळ तिथे घोंगावते वादळ

वाढला आहे अचानक वेग दुनियेचा
दाबली कोणी कळेना काळजाची कळ

मी नवे सृष्टीसृजन माझ्यात बाळगतो
वाटतो आहे जरी दुनियेस पिकले फळ

काळ म्हणजे पिंप पाण्याचा जणू मोठा
टपटपत आहे कधीचा एक त्याचा नळ

पावसा, मुतलास तू वाळूमधे इतका
पूर म्हणजे कष्टकर्त्या लोचनी ओघळ

एकही मासा गळाला लागला नाही
डोह खोटा, देह खोटा आणि खोटा गळ