Showing posts with label रजनी निकाळजे. Show all posts
Showing posts with label रजनी निकाळजे. Show all posts

तीन गझला : रजनी निकाळजे


१.

व्यथा माझ्या मनाची देखणी आहे
दिसाया ती नभाची चांदणी आहे

फिरे जात्यापरी आयुष्य माझेही
इथे जगणे पिठाची चाळणी आहे

जळाला देह सरणावर जरी माझा
तुळसरूपी तुझ्या मी अंगणी आहे

सरी येतात नयनी चिंब भिजते मी
तुझ्या विरहातली सर श्रावणी आहे

त्रिकोणाच्या कुण्या रेषेत नव्हते मी
सरळ रेषेत जीवन मांडणी आहे

मनाला टोचते निब रोज दु:खाची
तरी हातात माझ्या लेखणी आहे

जरी हे रक्त आहे लाल सर्वांचे
तरी जातीत का मग फाळणी आहे

शरण बुद्धास जाता शांत होते मन
मिळाले ज्ञान जे सत्कारणी आहे

२.

दुनियेमध्ये सर्वच काही सुंदर आहे
जीवन म्हणजे आनंदाचे अत्तर आहे

आयुष्याच्या प्रश्नांना रांगोळी म्हणते
रांगोळीच्या ठिबक्यामध्ये उत्तर आहे

चोरी केली पोटासाठी त्याने बहुधा
झोळीमध्ये त्याच्या अर्धी भाकर आहे

चरणावरती झुकते त्यांच्या वेळोवेळी
आई-बाबा माझ्यासाठी ईश्वर आहे

नजरेच्या बाणाने त्यांने जखमी केले
जखमेवर प्रेमाचा फुटला कागर आहे

उपवासाचे नाटक मजला जमले नाही
देवाबद्दल ठेवत आले आदर आहे

आयुष्याच्या भिंती भिंती जोडत गेले
सुख दु:खाचे बांधत गेले मी घर आहे

३.

दाह मनाचा विझवत असतो शब्द गारवा
शाई मधून झिरपत असतो शब्द गारवा

काय कुठे घडले त्यालाही ठाउक असते
नोंदी साऱ्या ठेवत असतो शब्द गारवा

बाग फुलाची जशी फुलावी तसाच फुलतो
आनंदाला फुलवत असतो शब्द गारवा

बोलत असता ओठावरची साखर होतो 
धार जिभेला लावत असतो शब्द गारवा

रुंजी घालत फिरतो माझ्या अवतीभवती
मनातले तो जाणत असतो शब्द गारवा

गझलेच्या मैफिलीत बसतो शायर होउन
खरी शायरी बोलत असतो शब्द गारवा

चंद्र सावली कुठेच त्याला घावत नाही
रजनी सोबत जागत असतो शब्द गारवा

...................................
रजनी निकाळजे
(शब्द रजनी)