Showing posts with label प्राजक्ता पटवर्धन. Show all posts
Showing posts with label प्राजक्ता पटवर्धन. Show all posts

तीन गझला : प्राजक्ता पटवर्धन

१.

आपल्यातले नाते म्हणजे अळवावरचे पाणी
जगास आपण दिसतो सुंदर राजा आणिक राणी

आपल्यात तर नवीन काही होइल वाटत नाही
पुलाखालुनी बरेच गेले आहे निघून पाणी

आयुष्याला दिले सोडुनी भटकायाला आता
भणंग म्हणती कोणी त्याला,कोणी म्हणे लमाणी

व्यापलेस तू सारे माझे, जागा नाही आता
मन माझे मांडत आहे अतिक्रमणाची गाऱ्हाणी

मानवजन्मा येउन इतके काय मिळवले आहे
सुखीच असते झाले, मी जर असते पक्षी-प्राणी

मैफिलीत त्या गोंधळ झाला गजल गायले तेव्हा
मौन गाउनी गेले जे जे टाळत होती वाणी 

दिलाच नाही प्रतिसाद मला कुणीच तेव्हा तेथे
साद घातली होती का मी निर्जन अशा ठिकाणी

२.

जरी मोकळा एक कोपरा माझ्यामध्ये
मिळायचा ना तुला आसरा माझ्यामध्ये 

मान्य तुला की प्रेम नभाचे खुणावते पण
कधीतरी डोकाव पाखरा माझ्यामध्ये

तुझ्या सयी, स्वप्ने माझी आहेत तळाशी
टाकुन बघ तू कधी पोहरा माझ्यामध्ये

जरा वेगळा हळवा आहे मुखडा माझा
तुला हवासा बांध अंतरा माझ्यामध्ये

उगाच दरवळ पसरायाचा काळासोबत
नकोस ठेवू तुझा मोगरा माझ्यामध्ये

तरंग म्हणण्याचे धाडस तू करू नको ना
आहे भीषण फक्त भोवरा माझ्यामध्ये 

दिसतच नाही का आताशा? होता पूर्वी,
पाउसवेडा मोर नाचरा माझ्यामध्ये

गढूळता ही मनातली तू तुझ्या कमी कर
दिसेल तेव्हा नितळसा झरा माझ्यामध्ये

३.

जे मिळाले ते मना स्वीकारना आहे तसे
बघ हिरे मिळतीलही नसतात सगळे कोळसे 

पाहिली विमनस्कता साऱ्या जगाने आतली
भेदुनी देहास माझ्या आत शिरले कवडसे

तू कधी होऊ नको गाथा सुखाची, जीवना
नाहितर मग मी लिहावे शेर कोणावर, कसे?

चल स्वतःच्या अस्मितेवर घाव घालू जोरकस
एकदा होऊन जाऊ दे हवे त्यांना जसे 

शांतता जर पाहिजे जगण्यामधे आता मना
'सुख' असे तू वेदनेचे कर नव्याने बारसे 

वळचणीची पाखरे गेली उडूनी आणि मग
छत विचारत राहिले तेव्हा, स्वतःला 'का असे?'

आवरावे लागते आता कुठे वेड्या तुला?
आपल्या येथे 'घरा', येते कुणी ना फारसे 

ना कुणी सांधायला जातात नाती मोडकी
ना कुणी सांभाळतीही तडकलेले आरसे