१.
जळतो तरी न ढळतो कणभर मराठवाडा
दळतो हजार दुखणे कणखर मराठवाडा
गहिरेपणा विचारा गोदावरीस माझ्या
कोणासही न कळतो वरवर मराठवाडा
आभाळ शासनाचे गर्जेल या आशेवर
वाळू भरून घेते वावर मराठवाडा
नामा जना नि गोरा हे मायबाप अमुचे
यांच्या समान आम्हा आदर मराठवाडा
जयजय मराठवाडा हरहर मराठवाडा
एकेक लोक इथले हर घर मराठवाडा
२.
कुठे ना नोंदली गेली अशी तक्रार आहे मी
बहरला ना पुन्हा केंव्हा असा बाजार आहे मी
उभ्या फासावरी तू टांग माझ्या जीर्णशा ओळी
गळाही दान करण्याएवढा दिलदार आहे मी
छताला गर्व की माझ्याविना पर्यायही नाही
भिताडेही असे म्हणती 'अरे घरदार आहे मी'
पुन्हा दुरडीस ओझे भाकरीचे एवढे झाले
खुळी चटणी म्हणे डोळ्यास की संसार आहे मी
घराने टाकलेल्या कोपऱ्याचे एक मी भाकित
जसे की गंजलेले मोडके औजार आहे मी
३.
बरे झालेच म्हणतो मी मला की पोरगी नाही
कुठे बेमौत मेली तर?अता ती काळजी नाही
तुझी किंवा तिची आई मलाही वाटते माझी
जगाची हीच प्रॉपर्टी अशी जी खाजगी नाही
जरा चिडचिड भिंत करते छताला तापही आहे
तशी तब्येत ही आता घराची चांगली नाही
जिने डोळे पिऊन सारे समुद्राचे तळे केले
अशी ती बापही असते ,फक्तच आई नाही
उतरली फ्रेमही खाली बाप अंधूक झाल्यावर
मुक्याने मायही गेली जराही बोलली नाही
भळी* बांधून पायाला उभारीले जिने घरटे
तिची तर एकही खपली कधीही बोलली नाही
* भेगा, चिरा
....................................
अरविंद सगर, परभणी
9970995853