तीन गझला : विनोद देवरकर


१.

जर्जर जरी पांथस्थ तू जगण्यावरी भाळून जा
आनंद या गुंत्यातला नात्यांमधे माळून जा

अलवार ती फुंकर तुझी गाईल जेंव्हा बासरी
त्या मोरपंखी कामना हळुवार तू जाळून जा

ज्यांनी दिला धोका तुला, प्रेमात अन् युद्धातही..
जा  शेवटी सरणावरी तू आसवे गाळून जा

का आपल्यांनी जीवनी लाथाडले कित्येकदा ?
कोठे किती अन् काय ते चुकले तुझे ताळून जा!

का थेंब रक्ताचा तुझ्या मातीमधे ना सांडला ?
यादीस फितुरांच्या जरा डोळसपणे चाळून जा !

चिंता नको विश्वास कर, सारील दुःखे दूर तो
जीवावरी सृष्टीतल्या, तू जीव ओवाळून जा

धन, रूप, नाती अन् मती येणार नाही सोबती;
कवटाळ गझलेला उरी, आत्म्यास तेजाळून जा

२.
 
जी भोगतो दशा मी सांगू कशी कुणाला ?
प्रारब्ध कोसताहे  माझ्याच प्राक्तनाला

कोळून प्यायलो मी ते वेद अन् ऋचाही
का त्रास बोलण्याचा, होई जना-मनाला?

चाले अखंड जेथे अभिषेक दानपात्री
ती भूक जीव सोडी दारी क्षणाक्षणाला!

लाजून अर्धमेला इंद्रायणी किनारा
अंगार वासनेचा भिजवी मनामनाला

आषाढ पूर येतो भक्तीस तीर्थक्षेत्री
झाडून भाव येतो ओसाड अंगणाला

भक्ती नसे जराशी पण पाहिजेल मुक्ती
लागेल वाळवी बघ ढोंगी तुझ्या मनाला

येशील का कधी तू  बाहेर पांडुरंगा
नाही खिशात दमडी देण्यास दर्शनाला

तू 'सोड रे' म्हणाला; माझा अहम् सुटेना
ना एवढा शहाणा ; सोडेन 'मी' पणाला

काळोख अंतरीचा करशील दूर केंव्हा ?
पणती सवाल करते दीपावली सणाला

३.

पेटण्याआधी स्मशानी त्या चिता भांडायच्या
मंदिरे, रुग्णालये की छावण्या बांधायच्या ?

त्या यमाच्या सावलीने बावरा झालो जरी
मी कुणाला जीवघेण्या वेदना सांगायच्या ?

लोळतो जो पांघरूनी ती रजाई मखमली
पापण्या मग का उशीवर आसवे सांडायच्या?

लोकशाहीच्या गुळाला पार करती वारुळे
राखणाऱ्याने चुली का वेगळ्या मांडायच्या ?

कर्जबाजारी बळीला एक कोडे सारखे
माझिया दारी कशाला योजना थांबायच्या?

ठेव कर्माला उशाशी अन् श्रमाला मनगटी...
प्राक्तनाच्या फोल घुगऱ्या का अता रांधायच्या?

‘माणसाने माणसाला हात द्यावा संकटी
ऐकल्या मीही कथा त्या माणसे पांगायच्या !
........................
विनोद देवरकर, उमरगा
मोबा. - ९४२१३५५०७३

15 comments:

  1. Replies
    1. मनापासून धन्यवाद सर जी🙏

      Delete
    2. This comment has been removed by the author.

      Delete
  2. वाह क्या बात है सर अभिनंदन

    ReplyDelete
    Replies
    1. आपले मनस्वी धन्यवाद. आपला अभिप्राय प्रेरणादायी आहे.

      Delete
  3. Replies
    1. आपले मनःपूर्वक आभार!

      Delete
  4. तिघही रचना अप्रतिम

    ReplyDelete
    Replies
    1. अंतःकरणातून आभार🙏🙏

      Delete
  5. यादीस फितुरांच्या..उत्तम

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद सर!

      Delete
  6. सर, तीनही गझला अप्रतिम...
    'येशील का कधी तू बाहेर पांडुरंगा
    नाही खिशात दमडी देण्यास दर्शनाला'..... लाजवाब! 👌👌👍

    ReplyDelete
    Replies
    1. आपला अभिप्राय प्रेरणादायी आहे. मनःपूर्वक धन्यवाद सर जी!🙏🙏

      Delete