१.
मला पाऊस दे ना तू तुझ्या हिश्शातला थोडा
दिलासा एक थेंबाचा मला रूजायला थोडा
जिथे मी जन्मलो आहे तिथे पाळेमुळे माझी
तिथेही जीव आहे हा अताही अडकला थोडा
निघालो एकटा होतो कवडसा आणण्यासाठी
तुझा आधार तेव्हाही हवासा वाटला थोडा
किती निष्ठूर होतो ना इथे येण्याअगोदर मी
अता शिकलो तुझ्यासोबत दयाळू व्हायला थोडा
युगांपासून आहे ती तुझ्याशी रुक्मिणी रुसली
अता तू बोल प्रेमाने तिच्याशी विठ्ठला थोडा
२.
एक भुंग्यापरी तळमळत राहिलो
जन्मभर मी फुलावर मरत राहिलो
पांगले सर्व वाहून श्रद्धांजली
मी चितेवरच त्या धगधगत राहिलो
ती मला नेहमी 'हो ' म्हणत राहिली
आणि दिवसेंदिवस मी फसत राहिलो
गाव पडला तिथे एकटा एकटा
मी शहर होउनी गजबजत राहिलो
भेटला गर्द काळोख आंदण मला
मग दिवा होउनी मी जळत राहिलो
केवढी शांतता त्या स्मशानामधे
मीच वेडा उगा बडबडत राहिलो
३.
केवढा लेकरांचा मला कळवळा
एक धृतराष्ट्र माझ्यात जन्मांधळा
लागला काळ मागे ससाण्यापरी
जन्म माझा जणू पांगळा कावळा
ती कसा काय सांभाळते नेहमी
एक माझ्यातला हा पती वेंधळा
आज द्यावेच लागेल उत्तर तिला
कोण प्रेमात बघु आणतो अडथळा
भोगला वाळवंटात मधुमास मी
सोहळा खास केला जगावेगळा
सांजवेळीच डोळ्यांत आला भरुन
आठवांचा तुझ्या ढग निळा जांभळा
....................................संतोष एकनाथ शेळके
बी/२०१, अंबरछाया अपार्टमेंट, रेल्वे फाटकाजवळ , गंगानगर - नेरळ , ता. कर्जत, जि. रायगड - 410101
मो. नं. 8669883566