Showing posts with label विजयानंद जोशी. Show all posts
Showing posts with label विजयानंद जोशी. Show all posts

दोन गझला : विजयानंद जोशी

१.

बघुन सावली जरा थांबलो झाडाखाली
उन्हे उतरली माझ्यावरती पुढे तांबडी

मिठी मारता तिने जशी करकचून अगदी
पंख फुलवुनी आत उडाली नाजुक चिमणी

मख्ख राहिला तेव्हा कळले समोरच्याला
वाया गेली इतकी सगळी बडबड त्याची

कुठल्या त्या अद्भुत काळामधुनी आलेला
आज भेटला बालपणीचा एक सोबती

सुरेखशी पाठवली होती भेट मी मधे
सांग मोकळेपणे तुला ती जर आवडली

आभाळच आले थेंबांनी मला भेटण्या
थेंबांचे त्या मनात नंतर झाले मोती

दुनिया आहे तितकीच अजुनही सुंदर पण
अजून नाही तुम्ही बदलली नजर आपली

२.

सांग होकार की नकार तुझा
काय आहे तरी विचार तुझा

लाजणार्‍या फुलांमधून हळू
वार हा एक आरपार तुझा

जाहिराती नव्या तरी पहिल्या
घोषणेचा जुना पुकार तुझा

भेट नाहीच,बातमी नाही
नेमका काय हा प्रकार तुझा

घ्यायचे का मिटून डोळे मी
भक्क आहे उजेड फार तुझा