Showing posts with label चंदना सोमाणी. Show all posts
Showing posts with label चंदना सोमाणी. Show all posts

दोन गझला : चंदना सोमाणी


१.

गेला कुठे फुलांचा बहर हा
अद्याप का रिकामा मखर हा

 मी पाहिलेच नाही परंतू
आला तसाच गेला प्रहर हा

ठेवू कशात आता फुलांना
जर फाटका निघाला पदर हा

झाल्यात भावनाही अनावर
वाटे हवाहवासा असर हा

आभाळ टेकलेले छताला
दारात पावसाचा कहर हा

शोधू कुठे तुला रातराणी
डोळ्यासमोर माझ्या तगर हा 

२.

आयुष्याला पुरुन उरतो क्षण एखादा 
होत्याचेही नव्हते करतो क्षण एखादा 

फाटत जातो बुरखा टरटर सत्याचा अन्
म्हणता म्हणता खोटा ठरतो क्षण एखादा 

कोरी पाने उलटत गेली...भरली नव्हती    
शेवट सारी पाने भरतो क्षण एखादा

माझी नाही तुमची नाही साऱ्यांचीही
क्षणात एका गफलत करतो क्षण एखादा

किती वंचना, किती वेदना, किती यातना
हसरी फुंकर घालत सरतो क्षण एखादा

काळालाही कळला आहे कधी कुठे तो 
हसतो, रडतो अन् बावरतो क्षण एखादा

पैलतटावर धुन मृत्यूची ऐकू येता
ऐलतटावर मग मोहरतो क्षण एखादा 

मीच थोपवू शकतो केवळ सूर्यालाही
तशाच केवळ भ्रमात हरतो क्षण एखादा