Showing posts with label प्रमोद राठोड. Show all posts
Showing posts with label प्रमोद राठोड. Show all posts

तीन गझला : प्रमोद राठोड

१.

माझी नाडी बघून जेव्हा वैद्य हासला होता 
रक्तामध्ये 'ती' असल्याचा तोच पुरावा होता

ज्वलंत मुद्द्यावरून त्यांच्या भेटीगाठी झाल्या
नंतर कळले जनतेला तो फक्त दिखावा होता

तो असताना कोणी साधी भेट घेतली नाही
तो गेल्यावर म्हणती सारे,किती चांगला होता

म्हणून काही मित्रांनीही दूर लोटले मजला
ज्यांना कळले मनात माझ्या एक आरसा होता

डोळ्यादेखत शेवटचीही गाडी निघून गेली
तरी प्रवाशी कोणासाठी तिथे थांबला होता?

२.

या दुःखाची व्याख्या इतकी साधी आहे
एक गरज सरली की दुसरी ताजी आहे

अंधाराला दोष देउनी काय फायदा
जर का बघणाऱ्यांची दृष्टी काळी आहे

मला भेटला माझ्या आतिल एकटेपणा
मला म्हणाला बिकट अवस्था माझी आहे

हत्ती घोडे वजीर ठरले निरूपयोगी
ज्याने मात दिली ती साधी प्यादी आहे

तो चंद्राची  गोटी बनवुन खेळू म्हणतो
कवी समजतो दुनिया इतकी भोळी आहे

मला विठ्ठला इतक्यासाठी माफी द्यावी 
माझ्यासाठी माझा विठ्ठल आई आहे

३.

जरी लढाई तत्वांशी तत्वाची होते
दोघांमध्ये हार नेमकी माझी होते

हवे तेवढे मिळून जाते कुणाकुणाला  
कुणाकुणाचे अवघे जीवन खर्ची होते

हे कळल्यावर 'मी पणास' मी लाथ मारली
'मी पणात' या आयुष्याची माती होते

तुझ्याविना तर पूर्ण कोरडा असतो श्रावण
तू असल्यावर त्याचे पाणी पाणी होते

दिवस दिवसभर स्वतःशीच तो बोलत बसतो
अन नाहक या रात्रीची बदनामी होते

अता राहिला काय भरोसा या श्वासांचा 
क्षणात होते काही,क्षणात काही होते

फक्त एकदा हृदयातुन म्हण विठ्ठल विठ्ठल
घरीच अपुल्या बसल्या बसल्या वारी होते