Showing posts with label अविनाश येलकर. Show all posts
Showing posts with label अविनाश येलकर. Show all posts

तीन गझला : अविनाश येलकर


१.

घेते आकाशात भरारी एक पाखरू, 
स्वप्ने बघते आकाशाची एक पाखरू. 

रंग बिरंगी स्वप्नांमध्ये झुलू लागले, 
तिच्या मनाच्या फांदीवरती एक पाखरू. 

झाड होउनी फांदी फांदी होते माझी,
बसते जेव्हा खांद्यावरती एक पाखरू. 

उडण्यासाठी पंख फडफडत होते त्याचे,
अपंग होते जन्मतः जरी एक पाखरू.

संध्याकाळी रडता रडता नदी म्हणाली, 
आले नाही काठावरती एक पाखरू.

जाळ्यामध्ये तडफडणारी बघून पक्षिण, 
करू लागले आई आई एक पाखरू. 

२.

दिसतो तुझा झोपेत झोपाळा मला,
ये एकदा भेटून जा बाळा मला. 

त्या वाळलेल्या जीर्ण वृक्षासारखी,
गावातली माझी दिसे शाळा मला.

आयुष्य माझे बंद ग्रंथासारखे,
उघडा कुणी, कोणीतरी चाळा मला.

मी राहिलो होतो भरोश्यावर तुझ्या, 
तू फसविले आहेस आभाळा मला.

मन पारदर्शक काच असल्यासारखे,
भरपूर सांभाळून हाताळा मला. 

तिरडीवरी काही नको आहे मला,
बस पाच शेरांची हवी माळा मला.

३.

गावी, माझ्या एका पडक्या घरट्याशिवाय काही नाही, 
मलब्याखाली दबून पडल्या स्वप्नाशिवाय काही नाही. 

रक्त,कत्तली,किंकाळ्या अन् जखमांशिवाय काही नाही,
दंगलीत या तलवारी अन् भाल्याशिवाय काही नाही. 

दाण्यासाठी भटकत भटकत कुण्या घरी आलास पाखरा,
तुला द्यायला माझ्यापाशी दुःखाशिवाय काही नाही.

हिरमुसून आकाश म्हणाले तुझ्या जवळ तर आई आहे,
माझ्यापाशी फक्त देखण्या चंद्राशिवाय काही नाही. 

हसता हसता क्षणात जर का ती दुःखाचे फूल बनवते,
तिच्या मनाच्या लेणीमध्ये बुद्धाशिवाय काही नाही.