Showing posts with label सुशांत खुरसाले. Show all posts
Showing posts with label सुशांत खुरसाले. Show all posts

दोन गझला : सुशांत खुरसाले


१.

थोडा थोडा वारा यावा अशी योजना होती 
हा पाचोळा उडत रहावा, अशी योजना होती

फिरत रहावे रस्तोरस्ती कंटाळा येईतो
मधे चहा एखादा घ्यावा अशी योजना होती

प्रत्येकाने आपआपले टुमणे विसरुन, केवळ
काळाचा ठेका ऐकावा, अशी योजना होती

उघडताच डोळे उघडावा हा देखावा सुद्धा
डोळे मिटता मिटून जावा अशी योजना होती

विचारचक्रांच्या मदतीने रात्र ढकलल्यावरती
दिवसाचा गाडा ओढावा अशी योजना होती 

तसे पाहता वाटावे की बरे चालले आहे
असे पाहता धीर सुटावा अशी योजना होती 

२.

गोष्ट ती होती, कशी होती, बघत होतो
संगती लावून घटनांची बघत होतो

भूतकाळाची अनागोंदी दिसत होती
डायरीमधल्या जुन्या नोंदी बघत होतो

काय आहे पाहतो मी, हे कळत नव्हते
काय ही माझी अवस्था मी बघत होतो

ते शहर अगदीच खात्रीचे कुठे होते
मी घरे कित्येक शंकांची बघत होतो

व्हायला सामील नव्हतो पात्र मी बहुधा
मग कथा लांबून सगळ्यांची बघत होतो

चाललो होतो जणू पाडायला नाटक
भूमिका घेऊन टोकाची बघत होतो 

एक तो बाजार होता कैक गोष्टींचा 
फक्त मी घेऊन का धास्ती बघत होतो ?

कल्पनांची आपल्या बांधून गाठोडी
लोक सारे परतले गावी बघत होतो