Showing posts with label व्यंकटेश कुळकर्णी. Show all posts
Showing posts with label व्यंकटेश कुळकर्णी. Show all posts

तीन गझला : व्यंकटेश कुळकर्णी


१.

रात्रभर जाग जागतो उगाच आता रात्र रात्रभर
पाश भोवती पुन्हा स्मृतींचा रात्र रात्रभर!

दाट सावल्या सभोवताली, भास सारखे..
त्रास आतल्या अशांततेचा रात्र रात्रभर

रात्र रात्रभर छळे पुन्हा ही खिन्न शांतता
स्पर्श पारखा मलाच माझा रात्र रात्रभर!

आसवांतली अधीरता मी रोज पाहतो 
स्वप्न ओलसर पुन्हा उशाला रात्र रात्रभर

रिक्त हस्त मी, असून माझे भाग्य शोधतो
गूढ बोलते ललाटरेषा रात्र रात्रभर

२.

गेलेले, की उरलेले, मी काय नेमके मोजू रे?
सरणाऱ्या या आयुष्याचे वर्ष कोणते मोजू रे?

उन्हे सावल्या सोसायाला भान स्वतःला हवेच ना?
मावळतीच्या खुणा सभोती, किती कवडसे मोजू रे?

असे अचानक सखे सोबती दूर दूर जातात कुठे?
सतावणारे भास नेमके कुणाकुणाचे मोजू रे?

होते- नव्हते झाले सगळे दोष  कुणाला देऊ मी?
विस्कटलेल्या श्वासांचे या कुठवर धागे मोजू रे?

चित्र विदारक होते आहे, या दुनियेचे रोज अता
हातावरती हात ठेवुनी काय उसासे मोजू रे?

३.

धुंद बावऱ्या खोल मनाशी तुझी आठवण
जखम सुगंधी भळभळणारी तुझी आठवण

किती कहाण्या लोभसवाण्या सभोवताली
पानोपानी दरवळणारी तुझी आठवण

उन्हे तापता पाउल हळवे... वाटेवरती
थंड गारवा, सोन सावली तुझी आठवण

येते, जाते, दंगा करते, मनास छळते..
कातरवेळी गूढ, आर्त, ही तुझी आठवण

आयुष्याच्या वळणावरती कितीक संभ्रम,
ध्रुवताऱ्यासम, क्षितिजावरती तुझी आठवण

तुझ्या सवे मी आकाशाला कवेत घ्यावे !
डोळ्यांमधला, ओघळ व्हावी तुझी आठवण