Showing posts with label पवन नालट. Show all posts
Showing posts with label पवन नालट. Show all posts

तीन गझला : पवन नालट


१.

शुभ्र आकाशात ज्याचा सूर असतो
कोणता त्याला किनारा दूर असतो

लेखणीला जो सुगीचे शस्त्र करतो
लेखणीपासून कोसो दूर असतो

नेहमी काळोख ज्या असतो दिशेला
त्याच आकाशी उद्याचा नूर असतो

लेखणीला धार ज्याच्या रोज असते
तो खरे तर वेदनांनी चूर असतो

रोज जळतो अन् तरी गंधाळतो तो
काय त्याच्या अंतरी कापूर असतो

२.

काय सांगायचे सांगण्यासारखे
लोक उरले कुठे बोलण्यासारखे

जन्म गेला तरी कोण कळला तुला
मागणे संपले मागण्यासारखे

पापणी सांगते वाहत्या काळजा
दिवस सरले अता जागण्यासारखे

नाव ती चालली स्तब्ध पाण्यावरी
अंतरांचे दुवे कापण्यासारखे 

बांधली काळजीची शिदोरी पुन्हा
झाकले दुःख मी झाकण्यासारखे
    
३.

फार कोठे आसवांना धार आहे
बस जरासा पापण्यांना भार आहे

नेहमी देतो सुखाला आसरा जो
तोच दुःखाचा खरा कैवार आहे

एकतारी वाजते तर वाजू दे ना
ही तिलिस्मी काळजाची तार आहे
 
संशयाने वेढले नात्यास तर मग
श्वास नात्यांचे कसे उरणार आहे

जखम आहे काळजाची आत आहे
ती तुला वरवर कशी दिसणार आहे