Showing posts with label स्वाती शुक्ल. Show all posts
Showing posts with label स्वाती शुक्ल. Show all posts

तीन गझला : स्वाती शुक्ल



१.

नको वाटतो जन्म हा पांगळा की जिथे मोकळे भेटता येत नाही
पुन्हा जोडव्यांचे वजन एवढे कि मला उंबरा लांघता येत नाही

जरी वाटते हीच ती वेळ आहे जिथे एकटे भेटणे शक्य आहे
तरी सभ्यता आडवी येत जाते मला दारही लावता येत नाही !

तिथे पैलतीरी तुझे गाव आहे मध्ये या नदीला भला पूर आहे
इथे कागदी नाव माझी अशी की किनारा तिला गाठता येत नाही

तुझे श्वास चाफा सुगंधी तरीही इथे माळला मोगरा मी कधीचा
किती दरवळावे उगा अंगणी तू मला जर तुला वेचता येत नाही

तुला ब्लॉक केले पुन्हा फेसबुकवर तुझे नाव केले डिलिट पण तरीही
मनावर तुझ्या गोंदलेल्या खुणांना किती खोडले खोडता येत नाही

मनाची अवस्था अशी दीनवाणी कुणाला खरे सांगता येत नाही
तुझा त्रास होतो नको वाटतो जो तरीही तुला सोडता येत नाही

किती शब्द माझे अडकलेत आणिक किती श्वास घेणेच राहून गेले
तरीही गळ्याभोवती बांधलेले मला डोरले काढता येत नाही

२.

जिथे तिथे पुन्हा पुन्हा दिसेल जर तुझेच घर
कशास गाव सोडला कशास सोडले शहर

मला जमेल का कधी वळून पाहणे तुला
मुळात लाजरीच मी तशात ही तुझी नजर

समोर भेटल्यावरी जरी नकार द्यायचे
मनात भेटण्यास हे अधीर व्हायचे अधर! 

तुला बघून का अशा मुजोर व्हायच्या बटा
उडायच्या हवेवरी जसा उडायचा पदर!

नवीन वाटतो जरी  तुझाच जन्म हा तुला
जुन्याच पुस्तकास "तो" नवीन घालतो कवर ! 

३.

सोबत आपण चालू शकतो
हात हवा तर सोडू शकतो

रस्ता आहे तोवर चालू
पुढे पुढे मग थांबू शकतो

वेळ अजुनही गेली नाही
ऐक,अजुनही  बोलू शकतो

इतके काही अवघड नाही
नंबर तो ही मागू शकतो

फोन नको चल करू मला पण
चुकुन कॉल तर लागू शकतो
 
..............................
 
स्वाती शुक्ल