१.
जरी मी राहिलो नाही तरी हे व्हायचे आहे
उद्याला गीत हे माझे जगाला गायचे आहे
अरे निष्ठुर आयुष्या मला तू सांग रे आता
असे हे विष दुःखाचे किती मी प्यायचे आहे
मनाला सारख्या माझ्या दिलासा देत मी होतो
यशाच्या वाटचालीला तुलाही जायचे आहे
अताशा आसमंती का गुलाबी गंध हा येतो
अताशा या फुलांना का दवांनी न्हायचे आहे
जरी अंधार हा सारा सभोती दाटला आहे
उद्याला चांदणे माझ्या घराशी यायचे आहे !
२.
जेथे खुळेपणाला काहीच वाव नाही
आता असे कुठेही नाहीच गाव नाही
झेलीत मीच गेलो आवर्त वेदनांचा
बाकी कुणावरीही त्याचा प्रभाव नाही
हातात लोक येथे बंदूक ठेवती अन
त्यांचा म्हणे सुडाचा कुठलाच डाव नाही
कोणी नका विचारू आम्हा अता खुशाली
पोटातल्या भुकेचा काही अभाव नाही
माझी इमानदारी इतकी फळास आली
माझ्या चितेवरीही माझेच नाव नाही
३.
फुलांना आवडाया अन कळाया लागलो आहे
पुन्हा आयुष्य मी आता जगाया लागलो आहे
असो लखलाभ ती त्यांना तयांची वेद अन गीता
अशा खोटारड्यांना मी हसाया लागलो आहे
कसे ते बोलती आता सुडाची वेगळी भाषा
कशाला सत्य मी त्यांचे वदाया लागलो आहे
जयांना कालचे माझे नसे अस्तित्वही ठावे
सभोती मीच का त्यांना दिसाया लागलो आहे
मला चिंता नसे माझ्या उद्याच्या त्या विनाशाची
जगाची आज मी चिंता कराया लागलो आहे
.......................
अविनाश चिंचवडकर
बंगलोर
Mobile - 9986196940
No comments:
Post a Comment