१.
बातमी वाऱ्यासवे गावात आली
एक शंका नेमकी डोक्यात आली
फक्त ऐकानेच केली चूक भलती
माणसांची जिंदगी धोक्यात आली
मागतो प्याला लगोलग खूपदा तो
कोणती नवखी नशा प्याल्यात आली
वल्गना आपापली केली खुशीने
जिंदगी त्यांचीच मग गोत्यात आली
बाप झिजला जन्मभर मातीत इथल्या
मौज करण्या लेकरे शहरात आली
२.
चाललो मी कुठे भान आहे कुठे
जिंदगी ही तशी छान आहे कुठे
गावगाड्यातही मी बदल पाहतो
थोर लोकासही मान आहे कुठे
चार ओळी तुझ्या, वेदना सांगते
जीर्ण पत्रातले पान आहे कुठे
सोडले मी तुला सोडले तू मला
खोल जखमेवरी ...ध्यान आहे कुठे
झाड पक्ष्याविना राहिले का ? इथे
मुक्त संचारण्या रान आहे कुठे
बातमी गोड ही का ?कडू वाटली
योग्य ऐकावया कान आहे कुठे
न्याय गावी खरा व्हायचा आपुल्या
हेच न्यायालयी दान आहे कुठे
३.
हा गुलामी भोगण्याचा काळ नाही
वेदना सांभाळण्याचा काळ नाही
टाक त्या झटकून साऱ्या शृंखलांना
हा स्वतःला जाळ्ण्याचा काळ नाही
कोण, केंव्हा, डंख मारे ना भरोसा
साप , विंचू पाळण्याचा काळ नाही
एकदा प्रतिकार कर सामर्थ्यशाली
आसवांना गाळण्याचा काळ नाही
झुंज द्या माझ्या मुलींनो संकटाशी
हात आता जोडण्याचा काळ नाही
४.
फक्त ताज्या बातमीची वाट बघतो
कोणती येणार येथे लाट बघतो
संकटे येवोत जनतेवर भलेही
राजसत्तेचा बसाया पाट बघतो
कर्ज हा पर्याय नाही उन्नतीचा
मी दशा बदलायची वहिवाट बघतो
टाळतो रे मी लबाडांच्या सभांना
मेंढरांनी गच्च भरला हाट बघतो
हातभर पोटास या चिंता उद्याची
भाग्यरेषा सांगणारा भाट बघतो
लेकरांचा बाप गेला फास घेवुन
संकटांची सावली घनदाट बघतो
.......................
जयप्रकाश सोनुरकर
बॅचलर रोड ,वर्धा
मो .न .९७६५५४७९४०
No comments:
Post a Comment