१.
प्रत्येकाची धडपड असते जगण्यासाठी
जीवन मोठे युद्धच ठरते जगण्यासाठी !
दुःखांनी जर्जर झालेल्या त्या आत्म्यांना
आपुलकीची फुंकर पुरते जगण्यासाठी
जेव्हा जेव्हा पोटासाठी वणवण होते
संघर्षाची किंमत कळते जगण्यासाठी!
आत्म्याला तर मुक्ती मिळते मेल्यानंतर
इच्छांची आसक्ती छळते जगण्यासाठी!
खचलेल्यांना हिंमत देतो जेव्हा आपण
आशा,उर्जा त्यांना मिळते जगण्यासाठी!
मायेची पाखर गरजेची असते जाणा
सृष्टीसुद्धा नभ पांघरते जगण्यासाठी!
कर्मगतीचा फेरा काही चुकला नाही
आसक्ती कोणाला सुटते जगण्यासाठी?
हसण्यासाठी सच्चे कारण दुर्मिळ झाले
कृत्रिम हासू जग आचरते जगण्यासाठी!
क्षण कुठला मृत्यूचा हे माहित नसल्याने
अभिलाषा हृदयी अंकुरते जगण्यासाठी
२.
दुःख दुनियेचेच जेव्हा एक झाले
सांत्वनांचे मार्गही कित्येक झाले
सोसण्याचा धीर जेव्हा संपलेला
आत्महत्यांचे किती उद्रेक झाले
कोणती जादू तिच्या नजरेत होती
सत्तरीचे वृद्धही दिलफेक झाले
षड् रिपूंना ठेवले काबूत ज्यांनी
ते तथागत या जगी बस एक झाले
जिंदगीभर वंचना खात्यात आली
कॅश ना कुठलेच त्यांचे चेक झाले!
कोणत्या मापात हा विध्वंस तोलू?
वादळाचे केवढे अतिरेक झाले !
राबले भट्टीत छोटे हात जेव्हा
वाढदिवसाला कितींचे केक झाले
३.
भेटण्या येतात आता नित्य मजला वादळे
मी असा की संकटांचे रोज करतो सोहळे
पाहण्या माझी परीक्षा दैव फासे टाकते
संकटांचे रूप घेते रोज नियती वेगळे!
वार आयुष्या तुझे मी झेलतो आहे पुन्हा
सोडले आहे तुला मी याचसाठी मोकळे!
संकटांवर मात करुनी चालले जे जे पुढे
जीवनाचा अर्थ त्यांना नेमका येथे कळे!
आयते मिळणार नाही गोष्ट इतकी जाण तू
मनगटी ज्याचा भरवसा भाग्य त्यालाची फळे!
रंजल्यांचे दुःख जेव्हा आपलेसे वाटले
भेटली सेवेत तेथे तू विठाई सावळे!
तू तुझा दर्जा नको सोडूस इतके सांगतो
माणसांमध्येच असती टोचणारे कावळे!
No comments:
Post a Comment