तीन गझला : आरती पद्मावार

१.

जिथे धागाच कुजका फार लोकांचा
कसा बनणार  सांगा हार लोकांचा

गरज नसतेच त्यांना चार भिंतींची
सुखी पालातही संसार लोकांचा

तळाशी गाळही असणार लोकांच्या
नितळ वर डोहही दिसणार लोकांचा

नका ठेवू भरवसा फार लोकांवर
बदलतो नेहमी आकार लोकांचा

उजेडाची करत होते जिथे भाषा
तिथे मी पाहिला अंधार लोकांचा

२.

विचारांच्या दरीने व्यापला रस्ता
तसा मग लांबला दोघातला रस्ता

उडवले काल शिंतोडे जरी त्याने
मला पाहून का भारावला रस्ता

खुणावत केवढे रस्ते मला होते
निवडला नेमका जो भावला रस्ता

कितीदा चालले मी याच रस्त्यावर
नवा का वाटला आता मला रस्ता

जरा सांभाळुनी तू जा बरे पोरी
मला थोडा निसरडा वाटला रस्ता

३.

बंद खिडकीचा कधी हुंकार आठवतो
सोसलेला कालचा अंधार आठवतो

एकतेमधली खरी ताकद समजतांना
आज तुकड्यांना पुन्हा आकार आठवतो

रोपट्याइतुके तरी बळ दे जरा देवा
वेल म्हटली की पुन्हा आधार आठवतो

राहतो काटा उभा अंगावरी अजुनी
एक झंझावात वारंवार आठवतो

इंद्र अजुनी भेटतो इथल्या अहिल्येला
राहता पडुनी शिळा उद्धार आठवतो

3 comments: