तीन गझला : सौ. दिपाली महेश वझे


१.

वळणावर दगडांना मागे सारत होते
जिद्दीने आयुष्याला मी घडवत होते

रस्ता कोठे चुकला होता कळला नाही
झिजलेल्या आशेवर बहुधा चालत होते

जीवाच्या मोहाशी साधे उरले नाही 
तलवारीच्या धारेवर मी धावत होते

हिरव्या पानी आयुष्याचे सोने केले
गळल्यावर मातीला सारे सांगत होते

जीवन गाथा वाचत होते जाता जाता
कोड्या मध्ये अजुनी कोडे भासत होते

२.

याच वाटेवर सुखाचे गाव होते
आठवांनी घेतलेले नाव होते

दूर मी होते तरी नजरेत त्यांच्या 
सांत्वनांचे खोल दडले भाव होते

आरसा बघता जराशी थांबले मी
काय झाले ते क्षणांना ठाव होते

गात असते आसवांना मी अजूनी
तळ उराशी कोरलेले घाव होते

भावनांना काढल्या वेड्यात सार्‍या 
वास्तवाचे गूढ रचले डाव होते


माणसांना कोणता आधार आहे
माणसांना माणसांचा भार आहे
 
भोगते आता कुठे मी जीवनाला
लागला भलताच हा आजार आहे 

ठेव जखमांना उराशी बांधलेल्या
वेदनेला बोचणारे फार आहे
 
मोह माया सोडवे ना या क्षणाला 
लाख मोलाचा असा संसार आहे

देत जा देणे तुझे काही जगाला
प्रेम करणे तर इथे व्यापार आहे

सौ. दिपाली महेश वझे, बेंगळुरू
मो. ९७१४३९३९६९  

No comments:

Post a Comment