१.
पात्रता ठरवीत असतो,कागदाचा एक तुकडा
मान्यता मिळवीत असतो,कागदाचा एक तुकडा
काळजाची मान्यता ही,कागदाला भेटते पण
प्रेम हे फुलवीत असतो,कागदाचा एक तुकडा
हे कळाया मार्ग नाही,चाहते का ती कुणाला?
मी तरी पुरवीत असतो,कागदाचा एक तुकडा
जिंदगानी माणसाची,कागदावर चाल करते
चाल ही अडवीत असतो,कागदाचा एक तुकडा
अर्ज द्या प्रस्ताव करतो,दाखला मंजूर नाही
योजना बुडवीत असतो,कागदाचा एक तुकडा
आखल्या सीमा घराच्या,भावकीचा वाद झाला
ही दुही घडवीत असतो,कागदाचा एक तुकडा
घ्यायची ती दक्षता घे,तू नको गाफील राहू
'न्याय'ही तुडवीत असतो,कागदाचा,एक तुकडा
२.
वेळ काढुन, भेट म्हणतो,दोन मिनटे
बोलण्याला,वेळ नसतो,दोन मिनटे
आस-याला,चार भिंती,अन् खुले छत
तारकांची,स्वप्न बघतो,दोन मिनटे
तू बरोबर,बोलला की, चूक नव्हती
चूक अपुली,कोण स्मरतो,दोन मिनटे
औपचारिकता,जगाची,पाळतो मी
स्तब्ध राहुन,मौन धरतो,दोन मिनटे
३.
वागला तू मी पणाने,वाईट त्याचे वाटले
दूर केले तू मनाने,वाईट त्याचे वाटले
शोधता आलाच नाही,माणूस तुजला आतला
फक्त केले तू गा-हाणे,वाईट त्याचे वाटले
तू स्वतःला वाचवाया,टाकून गेला आळ ही
फसवले तू एवढ्याने,वाईट त्याचे वाटले
होत नाही भाव ज्याचा,केलास त्याचा भाव तू
तोलली मैत्री दराने,वाईट त्याचे वाटले
लक्ष नव्हते चूक झाली,बोलून गेला एवढा
छान केले तू बहाणे,वाईट त्याचे वाटले
........................
ओमप्रकाश ढोरे
९४२३४२७३९०
No comments:
Post a Comment