चार गझला : निलेश कवडे .


१.

कुणी पाहू नये माझ्या, कधी जवळून शर्टाला
नवा गणवेश केला मी, जुन्या उसवून शर्टाला

मला तो आजही देतो पुन्हा जाणीव बाबांची
कधी चुपचाप बाबांच्या, बघा बिलगून शर्टाला

जरासे काय छातीशी, तिला मी घेतले होते
मनाच्या टाकले माझ्या, तिने भिजवून शर्टाला

कुणी स्वार्थाविना आता जुळत नाही कुणाशीही
जुळत शाळेमधे होते, कुणी पकडून शर्टाला

कहाणी सांगतो भलती गुलाबी डाग लिपस्टिकचा
नजर घेणार दुनियेची, कधी समजून शर्टाला

बदल दृष्टीमधे सुद्धा करावा लागतो मित्रा
कुणीही ना सुखी झाले, जुन्या बदलून शर्टाला

पुरावा एकही आपण, कधी ठेवायचो नाही
तरीही यायची टिकली तुझी चिटकून शर्टाला

२.

मेंदूमध्ये उत्पत्ती स्वार्थाची होते
रक्ताच्या नात्याची तेव्हा माती होते

त्याने इच्छांची यादी जाळावी आधी
ज्याची इच्छा निर्मोही होण्याची होते

साऱ्या ताऱ्यांनी देहाची होळी केली
अंधाराचे जाळे जागोजागी होते

मौनाने भिंतीशी बोलावे का आता?
माझे काही सांगायाचे बाकी होते

त्याच्या पाठीमागे ही संपत्ती होती
काही लोकांच्या डोळ्यांना पाणी होते

माझी जागा घेता आली नाही त्याला
त्याचे सारे काही ओठांसाठी होते

या छोट्याशा प्रश्नाला दोघेही टाळू
नाते कोणाशी लग्नाच्याआधी होते?

३.

ठेव ना तू कितीही पहारेकरी
राजधानीत जमतील मोर्चेकरी

शेवटी काय घेऊन जाते कुणी
सोडल्यावर परततात खांदेकरी

नेमके कायद्याचे कुणाला अभय
रोज फिरतात मोकाट मारेकरी

सांग ना काय अस्तित्व आहे तुझे
जीव देहामधे फक्त भाडेकरी

पाल काढून यात्रा जरी संपली
अंतरी राहिली एक यात्रेकरी

मोल ना व्यक्त होणार शब्दामधे
माय आहे किती थोर सेवेकरी

शेवटी फार नव्हते हजर सोयरे
वाढले मात्र कोर्टात वाटेकरी

४.

पायरीवर तुझ्या ठेवली पालखी
विठ्ठला सार्थकी लागली पालखी

आज आत्म्याविना देह अगतिक किती
चार खांद्यावरी चालली पालखी

ना समजणार मोजून गर्दीस या 
भावनांनी किती वेढली पालखी

जन्म वारीच असतो असे जाणुनी
मी दिशेने तुझ्या काढली पालखी

श्वास भोईप्रमाणे खरा वागला
वेदना सोसुनी वाहली पालखी

एक श्रावण तिच्या अंतरी गोंदला
होउनी चिंब मग लाजली पालखी

जन्मभर सोसतो दाह ज्याच्यामुळे
त्या उन्हाचीच तर सावली पालखी

2 comments:

  1. वाह भाई ! बढिया !!

    ReplyDelete
  2. वाह क्या बात है..चारही गझल निव्वळ अप्रतिम सर

    ReplyDelete