तीन गझला : सौ.वैशाली भागवत


१.

कातळ काळा कधी नव्हे तो खुलतो आहे 
भेट तुझी अन् माझी तोही स्मरतो आहे  

मला जगाने रोज बदलले थोडे थोडे   
म्हणतात अता किती वेगळा दिसतो आहे   

तुझ्यावाचुनी आयुष्या मी जपू कुणाला 
कोण तुझ्यासम सोबत माझी करतो आहे

थांबशील ना जरा वेळ तू इथे विधात्या
भाळावरले जुने डाग मी पुसतो आहे    

कोसळतो का उगाच येथे मेघ एवढा 
दु:ख उराशी किती धरेचे जपतो आहे  

२ 

आणा भाका जुन्या पुराण्या ती ही पाळत नाही
सुंदर मूर्तीवरती आता मी ही भाळत नाही

आठवणींची अनेक पाने वहीत भरली होती
बघून त्यांना मनास हल्ली उगाच जाळत नाही

ओंजळीत मी जपून आहे फुललेले क्षण माझे 
दारी येणाऱ्या दु:खांना मी कवटाळत नाही 

हर एक हिरा दडून असतो दगडामध्ये साध्या 
म्हणून सगळे दगड उराशी मी सांभाळत नाही 

विचारले जर रहस्य कोणी आनंदाचे माझ्या    
उत्तर सोपे नसून सुद्धा सवाल टाळत नाही    

३.

जे तुला सांगायचे सांगून घे  
त्यात थोडे प्रेमही मिसळून घे  

वादळाला यायचे तर येउ दे   
तू लव्हाळ्यासारखे वाकून घे  

चेहऱ्याला रंगरंगोटी किती 
अंतरीचा रंग तू पाहून घे 

जे हवे आहे तुला ते माग ना     
पाहिजे तर जीव ही मागून घे

टाळले आहे जगाने शेवटी 
भेट आता.. शब्द तू पाळून घे 

कैक आले या जगी.. गेले तसे 
वाट थोडी वेगळी चालून घे 

वाचली आहेत जर तू पुस्तके 
मौन माझे तेवढे वाचून घे 
.......................
सौ.वैशाली भागवत, बडोदे

10 comments:

  1. तिन्ही गझला सुंदर वैशाली

    ReplyDelete
  2. खूप सुंदर गझल

    काव्या शिरभाते

    ReplyDelete
  3. अप्रतिम गझला...
    कविता तुझ्या ओंजळीत रिती होत आहे
    तुझेच देणे तुला देऊनी ....

    ReplyDelete
  4. खूप सुंदर गझल सर्वच वैशालीताई

    ReplyDelete
  5. छान गझला. हे शेर विशेष आवडले.


    कातळ काळा कधी नव्हे तो खुलतो आहे
    भेट तुझी अन् माझी तोही स्मरतो आहे


    आणा भाका जुन्या पुराण्या ती ही पाळत नाही
    सुंदर मूर्तीवरती आता मी ही भाळत नाही


    वादळाला यायचे तर येउ दे
    तू लव्हाळ्यासारखे वाकून घे

    ReplyDelete