तीन गझला : निर्मला सोनी

१.

वाटते की विश्व सारे ... गीत माझे गात आहे,
कोणती जादू तुझ्या या, सांग आवाजात आहे

भेटता मी वादळाला, या जगाला काय व्हावे
कोण जाणे काय माझ्या, लेखले दैवात आहे

भेटली नाही कुठेही, शोधले मी खूप आई
सांगतो जो तो मला तू, राहते स्वर्गात आहे

अंतरी जे पेटले ते, सांगता ही येत नाही
अन् जगाला वाटते की, जीव हा प्रेमात आहे

घात केला माणसाचा, जीवघेण्या पावसाने
दुःख त्याचे या धरेने, सोसले गर्भात आहे

२.

सौख्य हासूनी जसे दारात येते,
दु:ख तेव्हा केवढे लाडात येते

नाव मी ठेवू कशी गझलेस माझ्या,
पूर्ण गोडी जर तिला लिहिण्यात येते

पाहतो आहे कुणाची वाट प्रेमा,
देव जाणे कोण या हृदयात येते

गर्व होतो ना तुला, मृत्यो जरासा,
जिंदगी जेव्हा तुझ्या विळख्यात येते

का भरवसा सांग ठेवू मी तुझ्यावर,
वागणे दुनिये तुझे लक्षात येते

जीवघेण्या संकटाशी झुंजतांना,
कोण जाणे बळ कसे पंखात येते

का करू तक्रार मी या जीवनाची,
मौज त्याची जर खरी जगण्यात येते

३.

असू दे तुलाही जरा भान देवा
खुले ठेव तूही तुझे कान देवा

असे खूप किंमती, हसू मानवाचे 
कसे तेच देऊ तुला दान देवा

करावे जगाचे भले वाटते तर,
जगावेगळे दे मला ज्ञान देवा

अडकला जिथे तू अडकले तिथे मी
कसे सांग उघडू नवे पान देवा

हवा खूप झाली विषारी इथे रे
तुझी आज दुनिया नसे छान देवा

तुझ्या देवळाला जसे बंद केले
तसे माजले बघ जगी रान देवा

तुला साकडे मी किती सांग घालू
दया कर जगावर दयावान देवा
......................

निर्मला सोनी

No comments:

Post a Comment