दोन गझला : स्मिता गोरंटीवार

 


१.


केव्हा केव्हा विश्रांतीला येते घुसमट 

मौनामध्ये शब्दांसोबत चालू फरफट


दैवामध्ये रुसणे झाले एकाएकी 

पांचालीची द्युतामध्ये झाली भरकट 


ब्रम्हानंदी तंद्री माझी लागत आहे

दारावरची घंटी तेव्हा करते कटकट 


निद्रेमध्ये आखत आहे मर्यादांना

ज्वालेमध्ये स्वप्ने झाली माझी धुरकट


पाणी येता पेरत गेले मी स्वप्नांना 

पानोपानी दवबिंदूनी भरला मळवट


आधाराला कोणी नाही, कोठे जावे 

चालायाची केली हिम्मत वाटा अनवट


इच्छापूर्ती होते ईश्वर आधाराने

शरयूकाठी रामासाठी आतुर केवट


२.


दिवा वस्तीत दिसला लाल रात्रीला

कुणाचे मोडले घर काल रात्रीला


कुणाची थाप दारावर अशा वेळी

कशी मी आवरू बेताल रात्रीला


किती म्हणतेस सोडव तू मला कोडी

जसा मानेवरी वेताल रात्रीला


कुणाचे भाग्य बहरू लागले आहे

तिची ऐकून रुणझुण याल रात्रीला


तुझ्यासोबत नको दुःखा कुणा आश्रय

रिकामी ओसरी  कंगाल रात्रीला



4 comments: