कविता उदंड झाली म्हणता म्हणता गझल कधी उदंड झाली हे लक्षातच आलं नाही अशी आजची परीस्थिती आहे. ह्या विधानाकडे दोन्ही अंगाने बघता येईल. हल्ली गझल लिहणाऱ्यांची संख्या वेगाने वाढते आहे. कवितेत आणि गझलेत मुख्य फरक आहे तो तंत्राचा. गझलेच्या तंत्रामुळे ती काहिशी किचकट आणि कृत्रिमतेकडे झुकते असा तिच्यावर आरोप लावला जातो. अर्थात हे वृत्तबद्ध कवितेलाही लागू पडते. मात्र, काही गझलकारांनी तिचं तंत्र सांभाळत तिला अशी काही नजाकत, समृध्दी आणि प्रसिध्दी मिळवून दिली आहे की गझलेच्या नावाने नाकं मुरडणारे देखील गझलेचे आशिक झाले आहेत. अश्याच गझलकारात समावेश होतो तो अमरावतीच्या नितीन भट यांचा. त्यांची गझल काळजावर आनंदाची लेणी कोरते. गझलसम्राट सुरेश भट ते नितीन भट हा प्रवास सहज नाही. या साठी अनेक गझलकारांनी निगर्वीपणे आपले सशक्त योगदान दिले आहे. या विषयी ते स्वतः काही बोलत नसले, तरी त्यांची गझलच त्यांची ओळख करुन द्यायला पुरेशी आहे. खरंतर, गझलेचा एक शेर म्हणजे मोठा आशय पेलणारी एक छोटी कविताच. त्या दोन ओळीत येणारा आशय, चमत्कृतीयुक्त भाष्य, कलाटणी देणारा शेवट आणि मनाला मोहून घेणारा विचार मनामनांवर गारुड करत आहे.
मराठी चित्रपट, मालिकांसाठी गीत लेखन करणारे आणि आपल्या संवेदनशील गझलांनी रसिक मनावर अधिराज्य गाजवणारे अमरावतीचे नितीन भट यांचा 'उन्हात घर माझे' हा नितांत सुंदर संग्रह नुकताच माझ्या हाती पडला. संग्रहाचं देखणं रुप आणि यातील गजला, गीत आणि मुक्तकांचा त्रिवेणी संगम मनाला खूप भावला. माझे सन्मित्र नंदुरबारचे विजय पाटील हे माझ्या आणि नितीन भटांच्या मैत्रीतला दुवा झाले. या निमित्ताने एका हळव्या आणि संवेदनशील मनाच्या कलंदर माणसाशी जुळता आले.
असं म्हणतात की माणूस कसा दिसतो या पेक्षा त्याचं असणं खूप महत्वाचं असतं. त्याचं वागणं, बोलणं, लिहणं आणि व्यक्त होणं, यातून तो आपल्याला उलगडत जातो. नव्याने समजतो. उमजतो. आणि आपण त्याच्या प्रेमात पडतो. तसंच काहीसं माझं झालं. नितीन भट यांच्या संग्रहातील गजला, गीतं आणि मुक्तकं मी वारंवार वाचली आणि मला त्यांच्या अंतर्मनाच्या डोहाचा तळ दिसला. जो अतिशय शांत, नितळ आणि पारदर्शी आहे. ज्याचे प्रतिबिंब त्यांच्या प्रत्येक रचनेत उमटलेले मला दिसले. मनाशी सहज संवाद साधणारे त्यांचे शब्द, व्यक्ती ते समिष्ट्येशी नातं जोडतात. त्यांचा अनुभव हा केवळ त्यांचा रहात नाही. तर तुम्हा, आम्हा सर्व रसिक वाचकांचा होवून जातो. थेट आपल्या मनाशी नातं जोडतो. म्हणूनच त्यांची रचना आपल्या मनाच्या गाभाऱ्यात गुंजन करायला लागते. आपलीच होवून जाते.
नितीनजींचा गझल प्रवास गझलसम्राट सुरेश भटांच्या तालमीत सुरु झाला. त्यांच्या रंग मैफिलीचा या सदरातून त्यांची पहिली गझल प्रसिद्ध झाली. संवाद वाढला. पुढे त्यांची लेखन शैली बघून भटसहेबांनीच त्यांना "झाला मंग तू, गझलकार" अशी प्रशस्ती दिली. त्यांच्या काही गझला भट साहेबांनीच इस्लाह केले आहेत, असे भाग्य फार थोड्याच्या नशीबी येते.
गझलनवाज भीमराव पांचाळे यांचा स्नेह त्यांना नित्याचा आहे. सहज, सुंदर आणि आशयाचा घन बरसावणारी गझल म्हणून भीमराव दादा त्यांच्या गझलेचा उल्लेख करतात. सहज मनाशी संवाद साधणारी ही गझल म्हणजे एक दर्जेदार दस्तऐवज असल्याचे ते नमूद करतात. तर गझलकार कमलाकर आबा देसले या गझलेला मनाला निखळ आनंद देणारी गझल म्हणून संबोधतात.
जीवन जगतांना अनेकांशी आपले जीवाभावाचे नाते जुळते. आपण एकमेकांची सुख, दुःखेच नाही तर गुप्त गोष्टीही शेअर करतो. मात्र, हे नातं बदललं की जीवलगच आपल्या जीवावर कसा उठतो, याचं मार्मिक भाष्य करतांना भट म्हणतात.
जो जीवाचा खास झाला,
तो गळ्याचा फास झाला.
असे एक ना अनेकदा आपण धोखे खातो. फसवले जातो. त्यातून स्वतःला सांभाळतोही. मात्र, एखादा घाव खूप खोलवर बसतो. त्याची तिव्रता, वेदना ये शेरात भेटते. आणि आपण आपल्याच दुखऱ्या जखमांना कुरवाळायला लागतो.
कैकदा सांभाळतांना तोल गेला,
तू दिला घाव इतका खोल गेला.
असं असलं तरी जगणं ही अपरिहार्यता आहे. जीवन जगावच लागतं. समेट करावा लागतो. तडजोडी स्विकाऱ्याव्या लागतात. त्यासाठी फुढाकार घ्यायला हवा. यातच शहाणपण आहे, असं त्यांना वाटतं
मिटव जर शक्य झाले तर,
तुझ्या माझ्यातले अंतर.
नातं, संबंध टिकवायचे असतील, तर तसं वाटणाऱ्यालाच नमतं घ्यावं लागतं. हे वैश्विक सत्य आहे. त्यासाठी कडू घोट पिऊन साखर पेरणी करायचीही, त्यांची तयारी आहे. ते म्हणतात.
मला पेरायची आहे,
कडू शब्दांमध्ये साखर.
आपली दुःखं, आपल्या वेदना पोटातच ठेवाव्या लागतात. नाहीतर, त्या जखमांवर मिठ टाकणारेही समाजात कमी नाहीत. यासाठी वरवर हसावं लागतं. हे शहाणपण ते या शेरात देतात.
मी स्वतःला सतत हसवत ठेवले,
मी जगाला फसवत राहिलो.
मैत्री निभवायची तर एकमेकांना सावरायला लागतं. कुणी चूकत असेल तर त्यास सुधरवावं लागतं. यासाठी स्वतःही कुणाला आपला कान धरु देण्याची तयारी असावी. तरच मैत्री पारदर्शी राहते. ते म्हणतात.
हक्क समजून हात धरतो मी,
तू प्रसंगास कान धर माझे.
एखाद्याला हे रुचत नाही. त्याचा दोष दाखविला तर तो रुष्ठ होतो. डुख धरतो. बोल लावतो. मात्र, तो हे समजून घेत नाही की असा खरा मित्र हा केवळ आरसा असतो. दोष तर त्या व्यक्तीतच असतो. आरश्याची चपखल प्रतिमा भटांची श्रीमंती व्यक्त करते.
कुरुपता चेहऱ्याचा दोष आहे,
परंतू आळ येतो आरश्यावर.
काही माणसं स्वतःच्या स्वार्थासाठी माणसं सोडून, भावना तोडून सहज वेगळे होतात. मात्र, यात सुख नाही. असा मोलाचा संदेश गझलकार देतो.
हवे तर जा तुडवून नाती,
अश्याने होत नाही मार्ग सुकर.
जग हे संकटांनी भरलेलं आहे. तिथं अनिश्चितता, भय, भिती आहे. त्याला घाबरला तो जगूच शकत नाही. त्यासाठी हिमतीने, पाण्यात नाव सोडावी लागते. जीव पणाला लावावाच लागतो.
सोडली पाण्यात माझी नाव मी,
खेळतो हा जीव घेणा डाव मी.
हिमतीने प्रवास करायचा असतो. वाटेत खाच-खडगे, काटे-कुटे हे येणारच. काट्यांचे काम आहे बोचणं. पावलांना ध्येय असतं चालण्याचे. किती सहज आणि रोजच्या जगण्यातला अनुभव शब्दबद्ध झाला आहे.
पावलांचे ध्येय असते चालणे,
काम काट्यांचे निरंतर बोचणे.
धोके, फसवणूक, तोटे, नियती या साऱ्यांना पुरुन उरतो तो जगावर राज्य करतो. त्यासाठी जगण्याची, लढण्याची आणि झालेल्या चूका दुरुस्त करण्याची मानसिकता हवी. ते गझलकार स्वतःच्या अनुभवातून इतरांना पटवून देत आहे.
मी आयुष्याला पुन्हा उभारत आहे,
मी गत काळाच्या चूका सुधारत आहे.
आपण किती ही चांगले, प्रामाणिक असलो तरी जग हे लबाड, फसव्या आणि घातकी माणसांनी भरलेलं आहे. काळ कठीण आहे. नियती क्रूर आणि माणूस मतलबी झालाय. यावर स्पष्ट परखड भाष्य करतांना भट म्हणतात.
झाला सुरु धरेचा उलटा प्रवास आता,
माणूस माणसाचा घेईल घास आता.
काळ कितिही कठीण असला, संकटांची मालिका लागली, तरी जगणं सुलभ करणं आपल्या हातात आहे. त्याचा मूलमंत्र म्हणजे स्वतःवर आणि आपल्या इच्छांवर लगाम लावणं. कवी म्हणतो.
गरजांना तर लगाम नसतो,
इच्छांवरती पाळत ठेवा.
जगायचं आहे, तर व्यवहार पाळावेच लागतील. घर जाळून तिर्थयात्रेला जाण्यात कुठलं शहाणपण ? मात्र, व्यवहार करतांनाही नाती सांभाळायलाच हवीत, माणुसकी जपायला हवी. तरच त्या जगण्याला मोल आहे. नाहीतर कोट्याधिशाच्या अंत्ययात्रेला चार खांदेकरीही, रोजाने लावावे लागतात. हा संदेश मानवतेला विस्तारीत करणारा आहे.
व्यवहारांच्या जगात थोडी,
नात्यांची पण किंमत ठेवा.
एव्हढं सर्व करुनही आपल्या मनासारखं घडेलच याची शास्वती नाही. अडचणी, दुःख संपतील याची कुणीही खात्री देवू शकत नाही. अश्यावेळी, बिनधास्तपणे काळजी, चिंता, दुःख, वेदना आणि वाट्याला येणाऱ्या उपेक्षा, क्लेशांची चक्क उशी करावी आणि तिला उश्याशी घ्यावे.
झोप निश्चित लागते आता,
घेतली काळजी उश्यास आता.
हा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही.
नितीन भटांची गझल अशी विविध विषयांचा पैस घेवून विस्तारत जाते. भावभावनांना कवेत घेते. जगण्याचे अनुभव त्यात पेरते आणि त्यातून संदेशाचं पीक येते. साधी, सरळ, सहज, सोपी भाषा आणि आशयघनता हे त्यांच्या गझलेचं वैषिष्ट्य आहे. त्यांच्या रचना काव्यसौदर्याने नटलेल्या आहेत. त्यात उपेक्षा, ऊपरोध, जीवनमंत्र, धक्कातंत्र भरलेलं आहे. प्रत्येक शेराला एक उंची आहे आणि भावनांची खोली आहे. स्पष्टवक्तेपणा आहे आणि आपल्या चूकाची कबूली आहे. सारं नितळ, निर्भेळ आणि पारदर्शी. म्हणूनच ही गझल सध्याच्या गझलगर्दीतही उठून दिसते. त्यांच्या बहुतेक गझला ह्या छोट्या बहरातील असल्या तरी त्यातला आशयाचा आवाका खूप रुंद आहे. म्हणून त्या क्षणात मनावर गारुड करतात. त्यांच्या गझलेत सतत एक सुप्त लय जाणवत राहते. त्यांच्यावर छंदोबद्ध कवितेचा एक पगडा जाणवतो. ते त्यांच्यात असलेल्या गीतकारामुळे असावं.
संग्रहात जलधारा, बोल रे मना, श्री गजानन, वंदितो तूज मोरया, जीवन माझे फुलले रे, जीवलगा, पु. ल. देशपांडे यांचं शब्दचित्र रेखाटणारं भाई, कोण तू कोण मी, खोल खोल हृदयात, गारवा, अंगाई हीगीत वाचता वाचता आपण कधी गुणगुणायला लागतो तेच समजत नाही. इतकी त्यांची गेयता जमून आली आहे.
नितीनजी कवी, गझलकार, गीतकार असून खुमासदार निवेदक देखील आहेत. त्यांनी आतापर्यंत ७०० वर सांगितीक मैफिलींचं सूत्रसंचलन केलं आहे. यातून त्यांचा अनुभव, आवाका आणि संपर्क लक्षात यावा. यात डाॅ. सलील कुलकर्णी, श्रीधर फडके, भीमराव पांचाळे, वैशाली माडे, आनंद जोशी, उत्तरा केळकर, रविंद्र साठे या दिग्गजांचा सहभाग आहे. त्यांनी प्रतिक्षा लोणकर, प्रवीण दवणे आणि राजू परुळेकर यांच्या प्रकट मुलाखती घेतल्या आहेत. यामुळे सहाजिकच त्यांच्या लेखनाला अनुभवांची श्रीमंती लाभली आहे.
"उन्हात घर माझे" या संग्रहाला सुप्रसिद्ध संगीतकार सलील कुलकर्णी यांची प्रस्तावना लाभली आहे. ते नितीनजी यांना एक कलंदर गझलकार म्हणतात. ते म्हणतात हा कलंदर माणूस जगाकडे बघताबघता गहिवरतो, घुसमटतो, तडफडतो कधी अस्वस्थ होवून अंगार होतो आणि त्याचीच एक गझल तयार होते. ज्यात आसवांचे, त्रासाचे, बेफिकिरीचे कलंदर रंग दिसतात.
असं म्हणतात की ज्याला विरह, दुःख भेटलंच नाही, वेदना झालीच नाही त्याच्या वाटेला गझल जातच नाही. त्याची अनुभूती या संग्रहात येते. नितीनजींचा शब्द, जगणं, गाणं आणि प्रेम गझलेत फेर धरुन नाचतात.
या निमित्ताने लेखक, कवी, गीतकार कसा तयार होतो या बद्दल सलीलजींनी सुंदर भाष्य केलं आहे. जे प्रत्येक लिहत्या व्यक्तीने वाचायलाच हवं. ते म्हणतात, वाचण्याची, ऐकण्याची ओढच माणसाला एके दिवशी लेखक, कवी बनवते. जितकं तुम्ही वाचता, ऐकता, ती पेरणी असते. पेरणी सकस असेल तर येणारं पीक दमदार आणि जोमाने येते. त्यासाठी सतत पेरणी करत रहायलाच हवं. पीक येणारच. खरंय, हा एक संदेशच आहे.
मेधा पबालिशींग हाऊस, अमरावती यांनी "उन्हात घर माझे" हा संग्रह प्रकाशीत केला आहे. १०२ पृष्ठसंख्या असलेल्या या संग्रहात ९५ रचना आहेत. संग्रहाचं मुल्य १२० रु. आहे. संग्रहाची सुबक बांधणी, मिलिंद पुंड याचे देखणं मुखपृष्ठ आणि सुलेखनकार चिंतामण पगारे यांची कॅलिग्राफी रसिक वाचकाला प्रथम दर्शनी प्रेमात पडायला भाग पाडेल असेच झाले आहे. आतील रचना विविधांगी आहेतच शिवाय आर्टपेपरवर दिलेली सलील कुलकर्णी यांची प्रस्तावना आणि भीमरावदादांची शुभेच्छा म्हणजे एक अभिनव प्रयोग आहे. नितीन भट (९८५०९५१८१४) यांचा गझल-गीत लेखनाचा हा प्रवास बहारदार असून तो अधिक सघन आणि समृद्ध व्हावा ह्या शुभेच्छा !
..........................................
◼️ देवरुप, नेताजी रोड /धरणगाव /जि. जळगाव.
No comments:
Post a Comment