‘कोणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी,’ ही एकच ओळ वाचल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. पुढे उभ्या असलेल्या प्रत्येक स्त्री मध्ये स्वतःची आई दिसणे आणि ‘कोणाच्याही मुलीत स्वतःची मुलगी दिसणे’ ह्या दोन्ही गोष्टी शिवाजी महाराजांच्या वैचरिक वारशातूनच आल्या आहेत. अरुण म्हात्रे ते अजीम नवाज राही अशा अनेक दिग्गज सूत्रसंचालक यांनी संचालन करताना कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी सादर केलेली, अनेक वृत्तपत्र, मासिके अनेक लेखात संदर्भ म्हणून ह्या कवितेचा होणारा वापर, अगदी कॉलेजच्या मुलामुलींच्या टी शर्ट आणि मोबाईल वॉल पेपर आणि परीक्षेच्यासाठी वापरल्या जाणार्या खरडा/पृष्ठ (पॅडवर) ह्यावर वेगवेगळ्या सुलेखनकारांनी अजरामर केलेली ही कविता प्रदीप निफाडकर ह्यांना कशी सुचली असावी, ह्याचा विचार करीत प्रदीप निफाडकर यांनाच विचारणा केली आणि समोर आला एक अकल्पित काव्यविभोर भावनिक गुंतावळीचा काव्य इतिहास...
समाजात मुलींच्या रोडावत जाणार्या संख्या पाहून त्याबद्दल हळहळ व्यक्त करीत मुलांचा हव्यास धरणार्या लोकांपेक्षा मुली असल्याने आयुष्यात किती आकर्षक रंग भरले जातात. त्यांचे ते नटणे, बांगड्या, क्लिपा, फ्रॉक, डूल, पुन्हा ते मॅचिंगबिचिंग ह्यात तिचे बालपण कधी संपून जाते आणि अंगणातील तुळशीचे रोप अचानक मोठे होण्याची जाणीव व्हावी, तशी मुलगी मोठी झाल्याची आनंद देणारी आणि अस्वस्थता वाढणारी तगमग... मग तिचे ते सासरी जाणे मग घरदाराचे बोचणारे मुकेपण आणि ती माहेरी आली की पुन्हा संपूर्ण परिसरात चैतन्य पसरविणारा चिवचिवाट... सर्वच अवर्णनीय असते. मुलांचे असले काही नसते. एक पॅन्ट-शर्ट घेतला की झाले. त्यातही नाही म्हंटले तरी तुमच्यासाठी घेतलेली चप्पल मुलाच्या पायात आली म्हणजे तर त्यातून होणार्या मध्यमवर्गीय गोड कुरबुरीही गोड असतात. पण मुली असल्या म्हणजे वाढत जाणार्या आनंदाची सर त्याला क्वचितच येते. संवेदनशील मनाचे कवी आणि गझलकार प्रदीप निफाडकर आणि त्याच्या सहचारिणी अनिताताई ह्यांनी तर बाळाचा जन्म होण्याआधीच तिचे नाव ‘प्रांजली’ असे ठरवून ठेवले होते. 'माझी मुलगी' ही अजरामर काव्यकृती खर्या अर्थाने प्रांजलीसाठीच त्यांनी लिहिली. प्रांजली पाठीवरही निफाडकरांच्या घरी मुलगीच झाली तिचे नाव अबोली. अबोलीच्या जन्माने प्रदीपजी आणि सौ अनिताताई ह्यांचा आनंद द्विगुणित झाला. प्रदीपजी ह्यांना तर आजही एखादया मित्रांकडेही भेटीनिमित्त गेले तर त्यांच्या मुलींशी गप्पा मारायला फार आवडते. कारण सोपे .... कोणाच्याही मुलींमध्ये दिसते माझी मुलगी... त्या आपल्याच मुली ह्या विश्व भावनेतून.
एकदा अमरावतीचे प्रसिध्द आर्किटेक्ट विश्वजित तुळजापूरकर प्रदीपजींकडे जेवायला आले. ते हिंदी गीतांचे-गझलांचे फार मोठे शौकिन होते, त्यामुळे साहजिकच त्यांचे लिखाण हिंदी-उर्दूत जास्त. त्यांचे गुरू उर्दूचे तेथील शायर हाफीज उल्लाखान ‘मोमीन’ हे होते. जेवण झाल्यावर गप्पा मारता मारता तुळजापूरकर यांनी त्यांची करुण कहाणी ऐकविली. त्यांची मोठी मुलगी आजी आजोबांकडे म्हणजे दर्यापूरला गेली आणि तिथेच नदीत बुडून वारली. आपल्यासमोर आपल्या काळजाचा तुकडा असा निघून गेल्यावर बापाच्या मनात काय वेदना प्रसवतात हे फक्त बापालाच कळतं, ती पीडा, ती व्याकुळ वेदना प्रदीपजी ह्यांनी नेमकी टिपली आणि त्यांच्या डोक्यात सर्रकन दोन ओळी जन्मल्या.
आकाशातील तारा बनली माझी मुलगी
देवालाही का आवडली माझी मुलगी?
ह्या दोन्ही ओळी त्यांनी तुळजापूरकर यांना ऐकविल्या आणि “ही तुमच्या मराठी गझलेची सुरूवात समजा आणि आता पुढचे शेर तुम्ही लिहा,” असे म्हणून त्यांच्याकडून बाकीची हकीकत ऐकू लागले. अगदी कालपरवा घडली असावी अशी ती वेदना ताजी होती. तुळजापूरकर हकीकत ऐकवीत होते. काय होते ते नेमके कळत नव्हते. पण निफाडकरांच्या डोक्यात भराभर शेर जन्म घेत होते. न राहवून त्यांनी प्रांजलीला कागद आणायला सांगितले आणि ते शेर उतरवून घेऊ लागले.
लपाछपीच्या डावामध्ये किती लपावे?
कोणालाही ना सापडली माझी मुलगी
मनाप्रमाणे जगणे येथे कठीण होते
जितके जगता आले,जगली माझी मुलगी
आठवतो मी, तेव्हा येते तिचे हासणे
माझ्यावरती केव्हा रुसली माझी मुलगी?
आता हे रुसणं लडिवाळ आणि खोडकर नव्हतं तर ते अतिशय जीवघेणे होते, ही अशी निर्मिती कशी होत होती ते काही निफाडकर यांना समजत नव्हते. एक एक शेर तयार होत होता, ते लिहून मित्रांसह स्वतःच्या मुलींना आणि पत्नीला ऐकवीत होते.
तिचे मला हे बोल बोबडे कळले कोठे?
गेल्यावरती मजला कळली माझी मुलगी
अजून माझ्या काळजात ती बसून आहे
काळाने या कुठे उचलली माझी मुलगी
कधी कळीवर, कधी फुलावर, कधी दवावर
जागोजागी मला भेटली माझी मुलगी
कुठे जायचे असो मला ती सोबत नेई
जाताना हे कसे विसरली माझी मुलगी
आठ शेर अर्ध्या तासात झाले. ‘जाताना हे कसे विसरली माझी मुलगी,’ ही ओळ तर काळीज चिरणारी होती. इतक्या झरझर एका संवेदनशील आणि काव्यायाशयाबाबत गंभीर भूमिका असलेल्या गझलकाराच्या गझला फार कमी होतात. पण त्यादिवशी काय झाले ते समजत नव्हते. सारे अवाक् झाले. गझल पूर्ण झाली आणि निफाडकर ह्यांनी ती मित्राला देऊनही टाकली. पुढे तुळजापूरकर ह्यांनी ती कोठे वापरली नाही. मात्र प्रदीप निफाडकर ह्यांनी ही रचना कोठेही स्वतःची म्हणून सादर केली नाही की कोठे छापून आणली नाही. मी फार आग्रह धरल्यावर ‘माझी मुलगी’ची जन्मकथा सांगताना ओघात त्यांनी ती माहिती मला दिली आणि मला ती कवितेच्या प्रसवकळा कशा सोसाव्या लागतात, ते सांगताना अधोरेखित करावे वाटले. त्यानिमित्ताने ‘माझी मुलगी’ ह्या कवितेच्या पूर्वकाव्याची ओळखही रसिकांना झाली, हे समाधान वेगळे आणि अवर्णनीय आहेच. तसेही बर्याच जणांना निफाडकर शेरच्या शेर देत असल्याने घरच्यांना त्याबद्दल काही वाटायचे कारणही नव्हते. तुळजापूरकर निघून गेले आणि सौ. अनिताताई अबोली आणि प्रांजली ह्यांची आपसात ‘किती मस्त गझल झाली’ या आनंदात चर्चा सुरू झाली. मुलींचा आनंद पाहून निफाडकर ह्यांच्यामधील कवी आणि बाप एकाचवेळी जागा झाला,‘अरे, दुसर्यांच्या मृत मुलीवर आपण लिहितो, पण ज्यांनी अशा आपल्या अनेक गझलांसाठी घरच्या जबाबदार्या उचलल्या, गरिबी सहन केली, दुःख सहन केले त्या आपल्या मुलींवर आपण काहीच का लिहीत नाही?’ हा विचार जागृत झाला, अस्वस्थता वाढली पुन्हा मन खाऊ लागले. ‘आपण का लिहीत नाही आपल्या मुलीवर?’ इथपासून ते, ‘अरे, त्या मुलीवर लिहिले तीही आपलीच मुलगी नव्हती का?’ अशी विचारांची लढाई सुरू झाली. मनात एकदा भावनिक द्वंद्व सुरू झाले की मनाच्या दोन भूमिकांच्या पैकी एका भूमिकेवर दुसरी भूमिका जोपर्यंत विजय मिळवत नाही तोवर मनाची दशा कशी असते हे त्या माणसाच्या शिवाय इतर कुणाला सांगता येत नाही. कसेबसे दोन दिवस गेले दोन दिवस मनाचे मनाशी युद्ध म्हणजे मेंदूत अक्षरशः पानिपतचे युद्ध रंगावे तशी परिस्थिती. तिसरा दिवस होता, 14 जून 2006 तो विषय काही डोक्यातून गेला नव्हता, जात नव्हता. त्यांचे मित्र तुळजापूरकर कधीच अमरावतीला पोहोचले. त्यांचा तिकडून फोन आला. त्यांनी मोमीनजी यांच्यासह, सौ. तुळजापूरकर आणि काही मित्रांना ती गझल ऐकविली होती. सर्वांनी केलेले कौतुक ते सांगत होते. पण कवींचे मन ? ते मात्र लढाईतच होते. ही स्थिती फार भयावह असते, कुणाचा आधार घेता येत नाही, काही दुखत नसते आणि बरं वाटते असंही नसते. मग रात्री त्या मनाच्या कोलहालातून जन्मलेल्या अस्वस्थतेत निफाडकर लिहू लागले-
जागोजागी भेटत असते माझी मुलगी
कोणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी
‘वा काय सुंदर सुचलंय!’ कागदावर मतला लिहिला आणि त्यांनी अबोलीकडे पाहिले. कोणाच्याही मुलीत स्वतःची मुलगी पाहण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या स्त्री दाक्षिण्याचा संस्कार असावा लागतो आणि तो निफाडकर ह्यांच्यात ठासून भरलेला होता. मध्यंतरी ‘सैराट’ नावाचा चित्रपट आला होता. त्यातील रिंकू राजगुरू ह्या अभिनेत्रीचे फोटो अनेकांच्या मोबाईल मध्ये दिसायला लागले, तिच्यावर तिचे वयाने मोठे दिसणे आणि इयत्ता 9 वीत शिकणे ह्यावर पोस्ट येऊ लागल्या. त्यातील एक पोस्ट माझ्याकडे आल्यावर ती पाठविणारास मी चांगलेच फैलावर घेतले त्यावेळी ‘अहो, ती अभिनेत्री आहे तिच्यासाठी आपल्या मैत्रीत का मीठ ओतता?’ असं पुढच्या व्यक्तीने मला सुनावले. त्यावर ती अभिनेत्री असली तरी ती इयत्ता 9 वी मध्ये आहे आणि ह्या वर्षी माझी मुलगी सुद्धा 9 वी मध्ये आहे. तिच्या बद्दल वाईट विचार माझ्या मनात येऊ शकत नाही, असे मी त्यास ठणकावून सांगितले आणि थोड्याच वेळात त्याने ती पोस्ट ‘डिलीट फॉर एव्हरीवन’ करून मला निफाडकर ह्यांची ‘माझी मुलगी’ ही कविता टाकली. मैत्री अजूनही कायम आहे हे वेगळे सांगणे नको, तर निफाडकर यांची प्रांजली नटण्याच्या बाबतीत खूप उत्साही आणि उल्हासी होती. पण अबोली तशी नाही. तिला नटायलाच नको असते. ती जितकी साधी तितकी सुंदर आणि सोज्ज्वळ दिसते. ते आठवून निफाडकर यांच्या पुढच्या ओळींनी जन्म घेतला....
तिला न रुचते नटणे-बिटणे तरी नेहमी
परीसारखी सुंदर दिसते माझी मुलगी
ब्युटीपार्लर मधून आलेल्या बायकोच्या सौंदर्याची प्रसंशा न करणारे अनेक मित्र आहेत पण त्यांना आपली कन्या नेहमी परी आणि राजकुमारी वाटत असते. मला वाटते की जगातील विश्व सुंदरीच्या नवर्यालाही स्वतःची मुलगीच जास्त सुंदर वाटत असेल. आणि जगातील सर्वात सक्षम नायक जगातील सर्वात प्रेमळ आणि सर्वश्रेष्ठ अशी व्यक्ती म्हणून या मुली नेहमी बापाचे कौतुक मैत्रिणींना सांगत असतात. ते निफाडकर ह्यांना आठवले आणि,
‘मला मिळाले किती चांगले आईबाबा’
- मैत्रिणींना सांगत असते माझी मुलगी
ह्या ओळी जन्मास आल्या. गझल तयार होत होती आणि अशातच निफाडकर यांच्या मनात एक शंका आली, आपल्याला दोन मुली तेव्हा आपण ‘माझ्या मुली’ असे न लिहिता ‘माझी मुलगी’ असे का लिहीत आहोत. तेवढ्यात एक शेर सुचला आणि त्याने हे द्वंद्व संपविले, त्यात चित्र काढणारी, पोळ्या करणारी गाणी म्हणणारी प्रत्येक अल्लड बापाला, कवीला आपली मुलगी वाटू लागली. आलेल्या कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी दुःखाला पिसण्याची कल्पना त्यांनी वापरली आणि तमाम मराठी रसिक बापास आपल्या मुलींमध्ये शक्तीचे प्रतीक दिसू लागले. खरे तर ‘तुम्ही जितके वैयक्तिक लिहीत जाता, तितके ते वैश्विक होत जाते,’ हे व. पु. काळे ह्यांचे ‘पार्टनर’ ह्या कादंबरीतील वाक्य ‘माझी मुलगी’ ही कविता लिहिताना सत्यात उतरले आहे असे वाटते.
चित्र काढते, पोळ्या करते, गाणे गाते
दुःखालाही खुशाल पिसते माझी मुलगी
मी कवितेची जन्मकथा लिहिताना एके ठिकाणी बोललो आहे की तुमच्या आयुष्यात घडलेल्या कोणत्याही काळातील कोणत्याही घटना काव्यरुप घेऊन अवतरु शकतात. आपल्याला ही निर्मिती वर्तमानाचा भाग वाटते मात्र ते काव्यबीज भूतकाळात पेरलेले असू शकते त्या अनुषंगाने कवीला एक घटना आठवली. नाशिकला त्यांच्या वास्तव्य काळात त्यांचे राहते घर हे बैठे होते. त्यांच्याकडे भाजीवाले नेहमी दारावर येत. मे महिन्यात, दिवाळीत एका भाजीवाल्यांची मुलगीसुध्दा त्यांच्यासोबत यायची. त्या मुलीची आणि प्रांजलीची गट्टी जमली होती. अनिताताई त्या मुलीलाही स्वतःच्या मुलीसोबत खायला काहीतरी द्यायच्या. एक दिवस ती मुलगी म्हणाली, “प्रांजली, तू पण ये ना आमच्या घरी.” ते सातपूरला रहात होते. मग कवींनी गरिबांच्या घरचे ते आमंत्रण स्वीकारून, मे महिन्यातील एक दिवस ठरवून भाजीवाल्या बाबांना तिला घेऊन जायला सांगितले. ते सकाळी येऊन घेऊन गेले. कवी स्वतःच्या कामाला गेले. दुपारी जेवायला घरी आले. अनिताताईंनी ताट वाढले. पण त्या दोघांनाही जेवण जाईना. घर उदास उदास वाटत होते. ताटात अन्न तसेच, ‘प्रांजली नाही तर जेवण जात नाही,’ वगैरे बोलणे सुरू असतानाच. भाजीवाले बाबा आले. आणि ते म्हणाले, “अहो, काय मुलगी आहे तुमची? एक घास खाल्ला नाही. तिच्या आवडीचे काय काय दिले आम्ही पण ती खातच नाही. अखेर तिला सायंकाळी सोडायच्या ऐवजी आत्ताच घेऊन आलो मी.” ही घटना आठवली, आपण लेकीविना आणि लेक आपल्या विना एक घास खात नाही, हा अनुभव आपल्यापैकी अनेकांना आलेला असतो कवी आणि त्यांच्या मुलीच्या प्रेमाचा हा प्रसंग लोणच्याप्रमाणे चांगला मुरला होता. तो अनुभव शब्दरूप घेऊन तमाम मायबापाच्या लेकरावरील प्रेमाची साक्ष देत म्हणू लागला,
गळ्यात माझ्या घास उतरण्या ‘नाही’ म्हणतो
अवतीभवती जेव्हा नसते माझी मुलगी
‘मेरी छोरिया छोरोसे कम है क्या?’ असं म्हणणारा ‘दंगल’ चित्रपटातील अमीर खान आठवतो का? ज्यांना मुलींनी कधी मायबापाला मुलगा नाही याची जाणीव होऊच दिली नाही. त्यांना तर अभिमान वाटावे असे वाक्य आहे ते. अगदी ‘दंगल’ चित्रपटाच्या आधीच प्रदीप निफाडकर ह्यांनाही त्यांच्या मुलींनी मुलगा नसल्याची उणीव भासू दिली नव्हती. एकदा मोटारीचे टायर पंक्चर झाले तेंव्हा तर प्रांजलीने स्वतः ते टायर काढून स्टेपनी लावली होती. कालपरवा मुंबईला राहणार्या आमच्या वर्षाच्या मुलीने, निशाने, घरातील सिलिंग फॅन स्वतः खाली काढून तो दुरुस्तीसाठी नेऊन दिला ती नुकतीच दहावी उत्तीर्ण झालेली, अशा मुली मुलांप्रमाणे काम करू लागतील तर त्या मायबापाला अभिमानच वाटेल, नाही का? एकदा जवळ पैसा नसताना रिध्दीसिध्दीतील सदनिका कवींनी आरक्षित केली शेवटी डोक्यावर निवारा तर हवाच. त्यावेळी पूर्ण रकमेचे कर्ज काढले. आता ते फेडायचे तर बापाची ओढाताण होणार हे लक्षात घेऊन अबोलीने शाळेत जाण्यासाठी लावलेली रिक्षा बंद केली. ती पायीपायी जाऊ लागली. मुली अशा स्वतःच्या शरीराला त्रास देत होत्या, इच्छा मारत होत्या. या अनुभवांना गझलेत गुंफत कवींनी लिहिले,
कर्जाचा हा डोंगर थोडा हलण्यासाठी
मुलासारखे राबत असते माझी मुलगी
पुढे घरातील प्रांजलीचा एक बालपणीचा झोका घेत असलेला फोटो पाहून तसेच नागपंचमीमध्ये जरी आजकाल दिसणार्या झोक्यांची संख्या कमी असली तरी हे झोके कालबाह्य झाले नाहीत हे दिलासादायक आहे अजूनतरी,
हळूहळू मग चालतात हे वादळवारे
झोक्यावरती जेव्हा बसते माझी मुलगी
असे लिहिणार्याा कवींना अबोलीला रोज रात्री झोपताना एक गोष्ट सांगावी लागायची. तिला सांगितलेली गोष्ट पुन्हा सांगितली की ती लगेच पुढचे सारे सांगून ‘नवी गोष्ट सांगा,’ अशी आग्रह धरायची. प्रांजली तशी नव्हती. तिला फक्त ‘नीज नीज माझ्या बाळा’ हे कवी दत्त यांचे अंगाईगीत म्हटले की पटकन बापाच्या कुशीत शिरून झोप यायची,
तिला लागली गझलांची ह्या खोड आगळी
हळूच रात्री कुशीत घुसते माझी मुलगी
कधी कवींच्या कवी मित्रांसोबत किंवा इतर मित्रांच्या सोबत गप्पा-कविता सुरू झाल्या पहाट कधी व्हायची ते कळतच नसे. असेच एकदा कवी उशिरा घरी आले तर प्रांजली व अनिताताई रात्रभर जागून वाट पहात होत्या. तेव्हाच नव्हे तर जेव्हा जेव्हा कवी घरी थोडे जरी उशिरा गेले तेव्हा तेव्हा हेच दृश्य असायचे. मग ह्या वाट पाहण्याच्या आठवणी शेरात आल्या,
घरी यायला मला जरासा उशीर होता
आईसोबत जागत बसते माझी मुलगी
कवींची आई ते दहावीत असताना वारली. नंतर त्यांना काय किंवा इयत्ता 6 वी असताना आई सोडून गेली असा मी काय... आई नंतर खर्या अर्थाने आईचे सुख मुलींच देतात. कित्येक सणांना आई मुलांना ओवाळते. त्या त्या सणांच्या दिवशी मुलीं बापाला ओवाळतात, हे आपण सर्वांनी पाहिलेले आणि अनुभवलेले आहे. मग त्या आठवणीने कवींच्या कागदावर ओवाळणी घातली ती पुढीलप्रमाणे,
आठवते मज माझी आई अशीच होती
जेव्हा माझे डोळे पुसते माझी मुलगी
आता अशी भावना वाचली की डोळे पाणावतात मग कवींच्याही डोळ्यांना धारा लागल्या होत्या. ते खरोखरच रडू लागले. अश्रूभिजला आनंदोत्सव ह्या कवितेत जेंव्हा मी स्वतःच
चारा खा पाणी पी भुर्रकुन उडून जा
इतका सोपा अर्थ काढू नकोस पोरी
काळजाचा हा तुकडा जपण्यासाठी
कोणत्याच बापाजवळ नसते तिजोरी
असे लिहिले तेव्हा मी माझ्या सहा सात वर्षाच्या मुलीकडे पाहत हमसून हमसून, ओक्षीबोक्शी कसे रडतात ते अनुभवले होते. जी कविता लिहिताना कवी स्वतः रडतो त्यापेक्षा चांगली कविता कोणतीच नसते असे मला वाटते, तर डोळे पुसत निफाडकर कागदावर नजर टाकून झोपणार तोच आणखी एक ओळ फक्त सुचली. 'तिला न्यायला राजकुमारा उशिरा ये तू' अरे, हे काय ? ही ओळ का आली? आणि एकटीच ? शेरात तर दोन ओळी हव्यात ना? मग ते विचार करू लागलो. एवढे शेर सुचले पण या ओळीला पुढची ओळ काही केल्या सुचेना. त्या विचारात झोप कधी लागली कळलेच नाही. सकाळी सवयीप्रमाणे अनिताताईला गझल वाचून दाखविली, हे एक फार धाडसी काम स्वतःच्या कविता स्वतःच्या पत्नीला वाचून तिची दाद मिळवायची... त्यासाठी काव्य निर्मळ तर हवेच शिवाय स्वतःच्या लिखाणावर विश्वासही हवाच. तर त्यांनी ती गझल मुलींना आणि पत्नीला ऐकविली. सगळे खूपच खुश झाले. पण तिला न्यायला ही ओळ पुढे जात नव्हती. दोन दिवस असेच गेले. आणि सर्रकन पुढची ओळ आली-
तिला न्यायला राजकुमारा उशिरा ये तू
अजुनी मजला अल्लड दिसते माझी मुलगी
हा शेर पूर्ण झाला आणि १७ जून २००६ ला आणि गझल पूर्ण झाल्याचे समाधान प्रदीप निफाडकर ह्यांना झाले. मग निफाडकर यांच्या ह्या ‘तिसर्या’ मुलीने म्हणजे कवितेने जगभर प्रवास केला. कधी जन्मदात्यासोबत तर कधी एकटीनेच कोणत्याही सूत्रसंचालक किंवा कवीसोबत. कोणी तरी अमेरिकेतून फोन करून सांगायचा, कोणी तरी दुबईत ती म्हणून दाखविण्याचा आग्रह करायचा, कोणी अजून काही. अरुण म्हात्रे याने ती अनेक ठिकाणी म्हटली व त्यावेळी ते आवर्जून हे म्हणायचे की अक्षरवाड्.मय म्हणून ह्या गझलेची नोंद झाली आहे. कराडचे अभिजित कुलकर्णी असो की नांदेडचे देवदत्त साने, पुण्याचे बाबा खराडे असो की चंद्रकांत वानखेडे, बुलढाण्याचे अजीम नवाज राही असो की नाशिकचे शाम पाडेकर यांच्या सूत्रसंचलनात ती गझल असतेच. हर्षित अभिराज व संजय वत्सल यांनी चाली लावून प्रत्येक कार्यक्रमात ती सादर केली आहे. त्या गझलेने अनेकांना मैफल जिंकण्याचे कसब दिले आहे. हर्षित अभिराज यांनी त्या गझलेला घेऊन एक ध्वनिफीत काढायची ठरविले. त्यात काही गाणी शांता शेळके आणि ना.धों. महानोर या ज्येष्ठ कवींची होती. प्रदीप निफाडकर ह्यांची तेवढी एकच गझल होती. महानोर साहेबांना हर्षितने विचारले की या ध्वनिफितीला काय नाव देऊ? त्यावर क्षणाचाही विचार न करता महानोर म्हणाले, 'माझी मुलगी' . हे त्यांचे मोठेपण आहे. नाहीतर ते त्यांच्या कवितेची ओळ सांगू शकले असते पण त्यांनी ‘माझी मुलगी’ हे नाव सुचवले. उर्दू साहित्य परिषदेचे संस्थापक आसिफ सय्यद यांनी ही गझल उर्दूत तर इस्लामपूरच्या इंग्रजीच्या प्राध्यापिका शैलजा यादव यांनी ती गझल इंग्रजीत भाषांतरीत केली.
एकदा कवींना गोव्याहून फोन आला. त्या बाईंचे नाव राधा भावे. निफाडकर काही बोलायच्या आत त्यांनी सांगितले की तुमचे आभार मानायला हा फोन केला आहे. त्यावर कवी म्हणाले,“आपली तर काही ओळखदेख नाही. माझे धन्यवाद कशाकरिता?” त्यावर त्यांनी हकीकत कथन केली. त्या कवयित्री आहेत. त्यांनी तेथील एका कविसंमेलनात त्यांची कविता वाचली. तिचा आशय असा होता की मुलांना मी वेळ देऊ शकत नाही. उगाचच मी आई झाले. त्यांच्या लहान मुलीला, गायत्रीला वाटले आपण झालो म्हणून आई असे म्हणते आहे की उगाचच मी आई झाले. गैरसमजामुळे तिने रागारागाने कट्टी घेतली. बर्याच दिवस हा अबोला सुरू होता. गायत्रीला तिचे वडील आईने तुझ्या आवडीचे हे आणले, ते आणले सांगून हा अबोला तोडायचा प्रयत्न करीत होते. पण उपयोग होत नव्हता. अखेर एका संमेलनाला ते सारे गेले होते. तिथे अरुण म्हात्रे यांनी ‘माझी मुलगी’ ही कविता म्हटली. त्यावर गायत्री म्हणाली, “बघ अशी कविता लिहितात. तू बघ कशी लिहिलीस.” आणि त्यांचा अबोला तुटला. त्याबद्दल धन्यवाद मानायला त्यांनी फोन केला होता. आयुष्यात एका मुलीचा आईशी अबोला तुटला यापेक्षा या कवितेने अजून काय द्यायला पाहिजे? तीच कवितेची खरी कमाई. तर प्रांजली आणि अबोली ह्यांच्यासह प्रत्येक मुलगी सजीव होत प्रत्येक बापाचं मन ओलेचिंब करणारी ही कविता तमाम महाराष्ट्रात गौरविली गेली आणि एक दिवस अचानक ही महाराष्ट्राची आवडती असलेली माझी मुलगी म्हणजेच प्रदीप निफाडकर ह्यांची ज्येष्ठ कन्या प्रांजली अपघातात मरण पावली, आणि खरोखरच महाराष्ट्राच्या काव्यप्रांताचा हंबरडा दाटून आला. मुलगी निधन पावण्याचे दुःख प्रदीप निफाडकर ह्यांच्यासह तमाम महाराष्ट्राने अनुभवले. अशी ही अभिजात काव्याचा बहुमान मिळावा अशी सुंदर कविता, तिला मिळालेला लोकाश्रय, तिला प्राप्त झालेले बहुमान, देशा विदेशात झालेला तिचा प्रवास, तिच्या ओळीतून झिरपणारे अश्रू, प्रत्येक बापाला दिसणारी स्वतःची मुलगी आणि ह्या सर्वांच्या सोबत तिचे म्हणजे त्या काव्य नायिकेचे दुर्दैवी निधन ह्या सर्व गोष्टी ह्या महाराष्ट्राने स्वतः जगल्या, असे म्हणावे वाटते. ‘माझी मुलगी’ बद्दल आणखी काय लिहावे ... कितीही लिहिले तरी समाधान होत नाही अगदी आपल्या लाडक्या कन्येचे कितीही लाड केले तरी आपले कधीही समाधान होत नाही ना, अगदी तसेच.... नाही का?
..........................................
किरण शिवहर डोंगरदिवे
वॉर्ड न 7, समता नगर, मेहकर
ता मेहकर जि बुलडाणा पिन 443301
मोबा 7588565576
.
डोळ्यात अश्रू आणणारा अप्रतिम लेख! प्रदीप हा माझा जवळचा मित्र असल्याने हा लेख अजूनच भावला!
ReplyDeleteखूपच सुंदर लेख... माझी मुलगी या गझलेची जन्म कथा... शेवट हेलावून टाकणारा
ReplyDelete