१.
दिशा स्पष्ट व्हावी धुके दूर व्हावे
पुन्हा या धरेला नवे रूप यावे
पुन्हा झाड वेली भिजू दे सुखाने
ऋतू बदल होता फुलांनी फुलावे
नभी झेप घ्यावी पुन्हा पाखराने
नवे बळ पुन्हा दोन पंखात यावे
समारंभ व्हावेत गर्दी जमावी
सगे सोयरे मैत्र भेटीस यावे
परी लाडकी रोज स्वप्नात यावी
पुन्हा मूल झोपेत गाली हसावे
नव्याने पुन्हा रोज शाळा भरावी
भिती मुक्त जीवन मुलांनी जगावे
सुखाने जगावेत गणगोत सारे
जुनी भांडणे वाद सगळे मिटावे
भिती दूर व्हावी मनातील सारी
पुन्हा एकदा हात हातात यावे
मिठी घट्ट व्हावी पुन्हा जिवलगांची
मनातील अंतर पुन्हा शून्य व्हावे
२.
एकमेकांना जरा निरखून पाहू
आज नजरेने नजर काढून पाहू
नेमका कोठे असावा पावसाळा?
ये ढगाला टाचणी लावून पाहू
टेकलो आहोत का आपण नभाला
आपली उंची जरा मोजून पाहू
मागणे मागायचे आहे मलाही
तारका तुटतात का जागून पाहू
आपल्यावर लाख नजरांचे पहारे
यापुढे मग, फार सांभाळून पाहू
बंधने आहेत काही आपल्यावर
आणखी काही दिवस लांबून पाहू
३.
अजून जपली कोरी चिठ्ठी
शाळेमधली पहिली चिठ्ठी
वाचत होते दुरून दोघे
नजरे मधली हसरी चिठ्ठी
ओठ बोलले नाही काही
पुस्तकातून फिरली चिठ्ठी
चर्चा,गोंधळ,भांडण,
धमकी
किती गाजली साधी चिठ्ठी
प्रेमाचा संदेश गिरवला
झाली लाल गुलाबी चिठ्ठी
भरून आले डोळे माझे
पुढे वाचली नाही चिठ्ठी
आतुर झाले भेटीसाठी
इतकी होती भारी चिठ्ठी
छळतील तुला मित्र सारखे
खिशात जर सापडली चिठ्ठी
गुपित तुलाही कळले असते
कधी बोलली असती चिठ्ठी
वेळ निघूनी जाण्या आधी
तुला मिळावी माझी चिठ्ठी
शब्द सोबती आयुष्याचे
जपली श्वासा इतकी चिठ्ठी
.......................
मनीषा नाईक
Nice...
ReplyDelete