तीन गझला : रत्नमाला शिंदे .


१.

फूल म्हणुन जर तोडले कुणी तोडू दे
मात्र शेवटी माझे अत्तर होऊ दे

जगणे मरणे जे असेल ते पाहिन मी
नाव एकदा तुझ्या दिशेने वळवू दे

समुद्र होणे अवघड नाही तितकेसे
नदीसारखे आत स्वतःच्या वाहू दे

खरी असो वा खोटी नंतर पाहू ना
दुनिया म्हणजे काय नेमके समजू दे

समजेल मला कोठे आहे नक्की मी 
मला एकदा सर्व नकाशे जाळू दे

आयुष्याची व्याख्या आहे कळायची
पुढच्या जन्मी फूलपाखरू होऊ दे
 
२.

फक्त आकाश पाहिले आपण
होत गेलो किती निळे आपण

काय समजून घेतले आपण 
ऐकले तेच पाहिले आपण

हेच सांगून सर्वजण गेले
सर्व आहोत एकटे आपण

आवडू लागलो जगालाही!
छान आहोत खेळणे आपण

होत राहील आठवण ताजी
आणि होणार मग शिळे आपण

वाढले आपले वजन थोडे
होत गेलो किती खुजे आपण

काय म्हणतील लोक हे बघतो
लोक म्हणजेच आतले आपण

आत असते कितीतरी गर्दी
आत नसतोच एकटे आपण

पाय आहेत फक्त इच्छांना 
आणि आहोत पांगळे आपण

झाड होण्यामधे मजा आहे
मात्र झालोत लाकडे आपण 

३.

किती जुन्या अन् नकोनको त्या गोष्टी आपण
रोज रोज वाढत जाणारी रद्दी आपण

दुःख तुझे अन् माझे आहे वेगवेगळे
एका झाडावरचे नाही पक्षी आपण

हाच फरक की प्रत्येकाची गती वेगळी 
तिथल्या तिथेच लुडबुडणारी गर्दी आपण

काळासोबत आपणसुद्धा बदलत गेलो
तरिही ठरलो केवळ खोटी नाणी आपण

उशिरा कळले हात आपले फाटुन गेले
किती दूरवर रेटत नेली गोणी आपण

काय बुडाले होते ते तर कळले नाही
पुन्हा पुन्हा पण मोजत बसलो खोली आपण

1 comment: