तीन गझला : श्रीपाद जोशी

१. 

मावळतीला रंग उन्हाचे गेले
उदासवाणे दिवस कुणाचे गेले

हिरव्या फांदीवर बसलेले होते
पक्षी राखाडी रंगाचे गेले

फक्त फारतर तुमचा पैसा गेला
त्यांचे सगळे गेले…ज्यांचे गेले

वाक्यांमधली गंमत संपत गेली
कौतुक सुचणाऱ्या शब्दांचे गेले

इच्छा मातीच्या दुष्काळत गेल्या
धोधो वाहत मोह नभाचे गेले…

तिथवरती आठवले दुःखासोबत
इथवरती जे दिवस सुखाचे गेले

तेव्हाचा तो नकार आठवला अन
अप्रुप नंतर होकाराचे गेले

२.

तू अनोळखी झाल्याचा थोडाही प्रत्यय नाही
हा अभिनय आहे केवळ उरलेला परिचय नाही

डोळ्यात भाबडी स्वप्ने घेऊन जायचे कोठे
हृदयात तुझ्या थोडीही जर उरलेली सय नाही

पाउस घेऊनी आला दारावर गीत पुराणे
पण तेव्हाची भिनलेली देहात तशी लय नाही

ह्या अनोळखी वळणावर येऊन थांबलो दोघे
हे त्यात निसरडे तसले ते तेव्हाचे वय नाही

आजही तुझ्या त्या ओळी ऐकून गलबला होतो
“मज तुझी आठवण येते…” मज कुठलेही भय नाही

३. 

रिकामे होत जाताना मला व्यापून उरणारे
अवेळी कोसळत असते इथे आभाळ झुकणारे

उन्हाचा स्पर्श झालेला निथळत्या पारिजातावर
निखळले थेंब सोनेरी फुलांवर प्रेम करणारे

तुला सॉरी म्हणायाला पुन्हा कारण हवे आहे
तसे तर खूपसे आहेत माझा राग धरणारे

असावी खोल एखादी तशी सल पाहिजे असते
सुखी आहेत ते सगळे तुझ्या विरहात झुरणारे

चिरेबंदी जसा वाडा उभ्याने कोसळू जातो
तसे ढासाळते काही मनाच्या आत सलणारे

तुला आजन्म नाही द्यायचे ना घ्यायचे काही
तुलाही का बरे आहेत काही प्रश्न छळणारे

कुणी नाही इथे अपुले असे वाटू नका देऊ
कुणी नसते तिथे तेव्हा तिथे असतात असणारे

No comments:

Post a Comment