तीन गझला : जयवंत वानखडे


१.

कधी तिचीही कळी खुलावी इतके व्हावे
स्वत:हुनी ती  मिठीत यावी इतके व्हावे

तिच्या मिठीची नशा चढावी ऊर्जा यावी
जीवनभर ती मिठी स्मरावी इतके व्हावे

भिरभिरणाऱ्या तिच्या बटांना बघण्यासाठी
वाऱ्यानेही लय साधावी इतके व्हावे

सदा सर्वदा तिच्या अंगणी वसंत नांदो
वार्धक्याची नजर हटावी इतके व्हावे

सुखी आपल्या संसारी ती रमली आहे
तरी एकदा भेट घडावी इतके व्हावे

तिच्या मिठीतच नयन मिटावे जातांनाही
पूर्ण एवढी इच्छा व्हावी इतके व्हावे

खुणावतो बघ नदीकाठचा एकांत पुन्हा
गतकाळाची सफर घडावी इतके व्हावे

२.

पोटासाठी कुणी राबतो येथे मरमर
असून सगळे तृप्त कुणाची नसते ढेकर

व्यथा वेदना नांदत असता काळ थांबतो
सौख्य जरासे दारी येता सरतो भरभर

सुरकुतलेल्या देहावरच्या खुणा सांगती
जगून घे तू जगणे आहे उरले पळभर

रेंगी,दमणी,टांगा  गिळले नव्या युगाने
गोठ्यामागे पडून आहे तुटके खासर

आयुष्याच्या मध्यावर तू कशास थकतो
अजून बाकी चालायाचे अर्धे अंतर

३.     

दूर जाणारा जवळ मी आणला गुंता
बोललो थोडे खरे अन् वाढला गुंता

मी तुझा आहे तरी नाहीस तू माझी
आपल्या नात्यात का फोफावला गुंता

आसवांच्या मैफिलीची सांगता झाली
हुंदक्यासोबत जरासा संपला गुंता

गुंतती हातात जेव्हा हात प्रेमाने
वाटते दोघास तेव्हा चांगला गुंता

शांततेच्या सारखे शोधात असते मन
एवढा मागे मनाच्या लागला गुंता

........................
जयवंत वानखडे,
कोरपना
जिल्हा चंद्रपूर
भ्रमणध्वनी ९८२३६४५६५५

No comments:

Post a Comment