तीन गझला : प्रशांत पोरे


१.

काहीतरी खळबळजनक दावा करा 
चर्चेमधे राहाल, कांगावा करा 

आपापल्या सोयीप्रमाणे वापरा 
डावा, कधी उजवा, कधी डावा करा 

तो बोलला नाहीच जर जे पाहिजे
दावून त्याला पिंजरा, रावा करा 

आहे किती समजेल दम तुमच्यामधे
गल्लीतला हा माज परगावा करा 

दुनिया भयंकर जंगलाच्यासारखी
मग लेकराला आपल्या छावा करा 

बोलाल पण करणार का काही कधी
पाहू किती तुमच्यात बळ? जावा करा 

जो देव तुमच्या मनगटामध्ये वसे
त्याचीच कायम प्रार्थना, धावा करा

२. 

काय असावे निःपाताचे तुम्हीच कारण सांगा 
कोण असावा रावण आणिक कोण बिभीषण सांगा

फुलपाखरात सुरवंटाचे जसे रूपांतर होते 
तसा आपल्या आयुष्याचा एखादा क्षण सांगा 

जितका जिवलग होता त्याहुन कट्टर झाला आहे 
कुठल्या शब्दांच्या जखमांचे उरलेले व्रण सांगा

मी वाल्याचा वंशज, भाळी अवहेलनाच माझ्या 
भरलेला मी नव्हता कोणासाठी रांजण सांगा 

तुझी सावली पडली होती तुझ्यासारखा झालो 
याहुन दुसरे अद्वैताचे कुठले लक्षण सांगा 

तुमच्या असण्याने हे माझे असणे नसणे झाले 
कसे तुम्हाला पुन्हा द्यायचे मी आमंत्रण सांगा 

शरीर आहे इथे परंतु इथे तिचे मन नाही 
तिने आणले कसल्या आठवणींचे आंदण सांगा

३.

कोण कसली ह्या जिवाला लागली लागण!
वाहवत तर चाललो नाहीत ना आपण? 

सत्य आहे पण कुणीही मानले नाही,
एक माझ्या आत मी जोपासला रावण.

जिंदगी शहरातली प्रेशर कुकर मित्रा,
ह्या बुडाशी आग वरती ठेवले झाकण!

मोडली आहे सवय की, आजही आहे?
वाजण्याचे भय, म्हणुन काढायचे काकण!

रोग माझा व्हायचा नाही कमी बहुधा,
लाभले नाही तुझ्या अधरातले चाटण.

मान्य नव्हते, पण मला टाळायचे होते,
शोधले; नाही मिळाले एकही कारण!

धूप ना व्हावी तुझी, मी काळजी घेतो,
बांध मी, माझ्या नशीबी शेवटी राखण!

1 comment: