'सैफ' अंदाज़-ए-बयाँ रंग बदल देता है
वर्ना दुनिया में कोई बात नई बात नहीं
-सैफ़ुद्दीन सैफ़
आपण सगळे माणसांचा वंश म्हणून सारखेच दिसत असलो तरी आपल्यातील प्रत्येकाला वेगळा चेहरा आहे, तो या जगात कितीही मिसळला तरी शोधता येतो. प्रत्येकाची आपली अशी स्वतंत्र कथा आहे व तो स्वत: तिचा नायक आहे. माना अगर नका मानू पण आपण आपल्या या कथेतील आपली भूमिका केंद्रस्थानी ठेवून पहाल तर इथे आपला जन्म आपले जन्मदाते, जन्माला चिकटलेली जात, नाती, धर्म, विशिष्ट स्वरूपाचा विचार करणार समुदाय, समाज, आपली आर्थिक परिस्थिती इत्यादी जे व जसं मिळतं ते जगातल्या अन्य कुणाहूनही भिन्न असतं! इथे प्रत्येकाच्या जीवनाचे स्वतंत्र असे रामायण आहे! त्यामुळे आपण आपल्या सोबत घडत असलेल्या गोष्टींना आपल्याच तऱ्हेने प्रतिसाद देतो, तेच आपलं वेगळेपण असतं!
थोडक्यात काय तर आपणच आपल्यासारखे (युनिक) असतो. आपल्यासारखा विचार फक्त आपणच करतो. प्रत्येकाचा साचा वेगळा त्या साच्यात मिसळली गेलेली माती, पाणी, उजेड वारा... सगळी रसायने, व त्यांचं प्रमाण याचा फार्म्यूलाच नंतर देव विसरून जातो. त्यामुळे फक्त आपणच आपल्यासारखे घडत असतो.
है और भी दुनिया मे सुखनवर बहुत अच्छे ;
कहते है के ग़ालिब का है अंदाजे बयाँ और
असं जेव्हा खुद्द ग़ालिब म्हणतो तेव्हा त्यातली 'ग्यानबाची मेख' ध्यानात घेतली पाहिजे.
आपण आपल्यासारखे लिहिले की ते दुसऱ्यासारखे होण्याचा प्रश्न निर्माण होत नाही, माझ्यासाठी हे इतके सरळ आहे. पण त्यासाठी आपल्याला आपली शाई, आपला रंग (खुदरंग) गवसला पाहिजे.
बशीर बद्र यांचे काही शेर...
'कौन कहता है दिल मिलाने को ?
कम से कम हाथ तो मिलाया कर ! '
'मोहब्बतों में दिखावे की दोस्ती न मिला
अगर गले नहीं मिलता तो हाथ भी न मिला '
'कोई हात भी न मिलाएगा, जो गले मिलोगे तपाक से
ये नए मिज़ाज का शहर है, ज़रा फासले से मिला करो '
बशीर बद्र साहेबांच्या ह्या तीनही शेरांत दिल दोस्त हाथ आणि गले मिलना यासारख्या शब्दयोजनांतून तीन वेगवेगळ्या गझलेत त्याच त्या वाटणाऱ्या प्रतिमा योजून प्रत्येक खयाल वेगळ्या तऱ्हेने खुलवला आहे. तीच साम्यस्थळे घेऊन आलेला हा निदा फाजलींचा शेर पहा ज्यात याच प्रतिमा आणखी वेगळ्या खयालाची देतात!
'दुश्मनी लाख सही ख़त्म न कीजे रिश्ता
दिल मिले या न मिले हाथ मिलाते रहिए '
ह्याच्याशी थोडं फार साम्य सांगणारा पण वेगळाच खयाल अनंत नांदुरकर 'खलिश' मांडतात तेव्हा...
'दिल के मिलने को अभी उम्र पड़ी है आगे
हाथ मिलते है अगर हाथ मिलाले ऐ दोस्त '
हेच हात मिळवणं किंवा हस्तांदोलन वगैरे सदानंद बेंद्रे 'मुसाफिर' यांच्या शेरात नव्याने कसे येते पहा -
'पुढे मी हात हस्तांदोलनासाठीच केला, पण
स्वतःची पाठ त्यांचे हात दोन्ही थोपटत होते '
म्हणजे काय तर प्रतिमा किंवा विषयवस्तूत साम्य असलं तरी खयाल ज्याचा त्याचा आपला असतो, वेगळा असतो.
म.भा. चव्हाण यांचा एक सिग्नेचर शेर आहे -
'जानवे घालू नका रे विठ्ठलाला
त्या बिचा-याला स्वतःची जात नाही '
'जात ' घेऊन आलेला, अगदी कालपरवा फेसबुकवर सुरेश इंगळे यांचा एक शेर वाचला,
'कुणी माणूसकीला ओळखत नाही
मला दे विठ्ठला तू जात एखादी '
.
आणि मला माझाच एक शेर आठवला -
'कोणती जात माझी विचारू नका
फक्त माणूस माना मला दोस्तहो '
त्यामुळे खयालांतील विषय -आशय - प्रतिमा यांच्या पुनरावृत्तीची फिकीर करण्याची गरज नसून बस् आपलं अस्सल असणं आणि आपण ते आपल्या पद्धतीने वेगळेपणानं मांडणं गरजेचं आहे असं मला वाटतं.
..............................
संजय गोरडे
नाशिक
खूप सुंदर संजूभौ !!
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDelete