तीन गझला : भूषण कुलकर्णी


१.

वेगळे आहोत आपण हे बरे झाले
माणसे आहोत आपण हे बरे झाले

दाह दुसऱ्यांना नको अन् आपल्यालाही
कवडसे आहोत आपण हे बरे झाले

प्राप्त असते जाणिवांना वेदना होणे
कोडगे आहोत आपण हे बरे झाले

आपल्यातच सापडू शकतो अता हीरा
कोळसे आहोत आपण हे बरे झाले

जी हवी ती आपली प्रतिमा बघत राहू
आरसे आहोत आपण हे बरे झाले

गोडवा टिकला खरा नात्यामधे अपुल्या
दूरचे आहोत आपण हे बरे झाले

२.

मनात कुठले वादळ लपले कसे कळावे?
वरवरचे की खुशीत हसले कसे कळावे?

सुरुवातीला आपण सगळे सोबत होतो
नंतर कोठे अंतर पडले कसे कळावे?

आठवते की एक झरा प्रेमाचा होता
कुठून होते पाझर फुटले कसे कळावे?

किमान थोडे तरी बोलणे व्हावे आता
विसरलात की मनात स्मरले कसे कळावे?

प्रश्नपत्रिका कोण काढतो आयुष्याची?
किती कोणते उत्तर चुकले कसे कळावे?

वाटाघाटी चालू झाल्या नात्यामध्ये
काय मिळवले काय हरवले कसे कळावे?

धूळ विचारत आहे थोडे विसावताना
वादळ सरले अथवा उरले कसे कळावे?

३.

पुढच्या धुक्यात बघणे टाळायला हवे
पाऊल एक आता टाकायला हवे

पाउलखुणा नसाव्या वाटेत एवढ्या
नकळत कधीतरी मी हरवायला हवे

हरकत नसेल माझी चालायला पुढे
पण जायचे कुठे ते समजायला हवे

संन्यास घेतल्यावर होईल त्रास हा
म्हणतील लोक, याला सजवायला हवे

शिखरावरील झेंडे आहेत मोजके
खाली किती गळाले, शोधायला हवे

शिखरापर्यंत आलो, पण काय यापुढे?
आता फिरून खाली उतरायला हवे

.

1 comment: