इलाही जमादार यांचेे सोबत व्यंकटेश कुलकर्णी आणि सौ. अपर्णा कुलकर्णी |
जानेवारी २०२१ च्या शेवटच्या दिवशी मराठी गझल, काव्य क्षेत्रासाठी एक दुःखद घटना घडली. मराठी गझल पुत्र श्री. इलाही जमादार दि. ३१ जानेवारी २०२१ ला अनंतात विलीन झाले, तमाम मराठी गझल रसिकांना आणि मराठी गझलेला पोरकं करून गेले.
मी महाविद्यालयात शिकत असताना, इस १९९२ मध्ये 'एक जखम सुगंधी' हा मराठी गझल अल्बम रिलीज झाला. हा गझल अल्बम ऐकताना गायक, संगीतकार श्री. भीमराव पांचाळे यांच्या आवाजात शब्द कानावर पडले..
वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे?
आरश्याला भावलेली माणसे गेली कुठे?
रोज अत्याचार होतो आरशावरती अता
आरशाला भावलेली माणसे गेली कुठे?
ऐकताना भारावलेली अवस्था अनुभवत मी नकळत गझल प्रवासात सामिल होतो.
अंदाज आरशाचा वाटे खरा असावा
बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा
जखमा कशा सुगंधी होतात काळजाला
केलेत वार ज्याने तो मोगरा असावा
या गझलेनं श्री. इलाही जमादार यांना सर्वदूर प्रसिद्ध केलं. एकापेक्षा एक सरस, आशयसंपन्न गझला मराठी आणि हिंदी, उर्दू भाषेत त्यांनी लिहिल्या. त्याचबरोबर त्यांनी मराठी - उर्दू तसेच उर्दू- मराठी, तीन ओळींचे शेर असलेल्या गझल लिहिण्यासारखे प्रयोग सर्वप्रथम केले. मराठी गझल ही श्री. सुरेश भट यांच्यानंतर जनमनात रुजववण्यामध्ये श्री.इलाही जमादार आणि त्यांच्या समकालीन गझलकारांचं खूप मोठे योगदान आहे. मूळचे सांगली जिल्ह्यातील इलाही नौकरीनिमित्त पुण्यात आले आणि तिथेच स्थायिक झाले. 'कदम निवास, डेक्कन कॉलेज रोड' इथं त्यांचं वास्तव्य होतं. स्वभावाने मितभाषी आणि सभा, व्यासपीठांपासून नेहमी दूर राहणारे इलाही आपल्या चाहत्यांमध्ये मात्र रंगून जात असत.
इलाही सर आणि मी...
माझ्या वैयक्तिक आयुष्यात इलाही सरांचं स्थान खूप मोठं आहे. सुरुवातीच्या काळात माझ्यासारख्या कविता किंवा गझलेपासून खूप दूर असणाऱ्याला त्यांनी गझल लिहायला लावली, प्रेमाने गझल तंत्र शिकवलं आत्मविश्वास दिला, प्रोत्साहन दिलं. इस २०१७ मध्ये जुलै महिन्यात इलाही सरांना मी प्रथम भेटलो. त्याअगोदर ते नांदेडला आलेले असताना माझा पत्रकार मित्र दीपरत्न निलंगेकर याच्यामुळे इलाही सरांशी फोनवर प्रथम बोललो. पहिल्यांदा फोनवर बोलताना एकप्रकारचं दडपण होतं, इतका मोठा शायर, आपणास वेळ देईल का, व्यवस्थित बोलेल का? अशी शंका होती, पण पहिल्याच फोन भेटीत इलाही सरांसोबत आपुलकी, जिव्हाळा निर्माण झाला. माझ्या भाच्याच्या लग्नानिमित्त आम्ही पुण्यात गेलो असता, इलाही सरांना भेटायला जायचं ठरलं. एका ज्येष्ठ गझलकराला भेटायला जायचं तर कसं जावं ह्या विचारात मी होतो. विचारांती मी ठरवलं, एका छोट्या बाऊलमध्ये मोगरा किंवा इतर सुगंधी फुलं घेऊन जायचं आणि त्यांच्या पुढ्यात ती फुलं ठेवून त्यांचे शेर ऐकवायचे. हंगाम नसल्यामुळे पुण्यात मोगरा मिळाला नाही. मग निशिगंधाची फुलं घेऊन, मी, पत्नी अपर्णा, मुलगी श्रावणी आणि स्वरा सगळे त्यांच्या घरी गेलो. एका छोट्या भाड्याच्या घरात इलाही सर एकटेच रहात असत. घरी जाताच आम्ही त्यांच्या समोर निशिगंधाची फुलं ठेवली आणि मला पाठ असलेले बरेच शेर मी त्यांना म्हणून दाखवले. चर्चेत त्यांना गझलेसंदर्भात काही प्रश्नही विचारले. इलाही सरांनी नंतर त्यांच्या काही गझला म्हणून दाखवल्या. चर्चेत सरांनी मला विचारलं की, "तू काय लिहितोस?"
त्या काळात जेमतेम काही तोडक्या मोडक्या कविता लिहिणारा मी, तुलनेने काव्यलेखनात निष्क्रिय आणि उदासीन असलेला. बोलताना इलाही सरांना सांगितलं की "मी काहीही लिहीत नाही," पण सरांचा माझ्यावर विश्वास बसला नाही. मी संकोचामुळे तसं म्हणतोय असं त्यांना वाटलं.
नंतर मी हैद्राबादला आलो. पुढे नियमितपणे सरांशी फोनवर बोलणं सुरु झालं. प्रत्येक वेळी सर विचारायचे, "नवीन काय लिहिलं आहेस?", मी काहीच लिहिलेलं नसायचं, मी तसं त्यांना सांगायचो. पण प्रत्येक वेळी सर मला हाच प्रश्न विचारायचे आणि गझल लिहायला सांगायचे. पुण्यातील भेटीत त्यांनी मला 'जखमा अशा सुगंधी' हा त्यांचा गझलसंग्रह भेट दिला होता. त्यातील गझल वाचून, वृत्त, काफिया, रदीफ यांवर पेन्सिलने खुणा करून अभ्यास करायला सांगायचे. खऱ्या अर्थाने ती माझी ऑनलाईन शिकवणीच होती. प्रत्येक वेळी मी काहीही लिहिलेलं नाही हे सांगताना मला अपराध्यासारखं वाटत गेलं. त्या काळी त्यांच्या खालील काही शेरांनी माझ्या मनावर अक्षरशः गारूड घातलेलं होतं.
नको वेडे फुलू तूही कळीला सांगतो आम्ही
फुलांचे हार सुकलेले कुठेही टांगतो आम्ही
विसावा घेतला जेथे निवारा पेटला तोही
विजेच्या आसऱ्याला का मनोरे बांधतो आम्ही?
हे असे बागेवरील उपकार केले
कत्तली करुनी फुलांचे हार केले
ठेवुनी शाबूत काया वार केले
फक्त आत्म्याला त्यांनी ठार केले
ऐकला मी हुंदका जेव्हा हवेचा
पाडुनी भिंती घराच्या दार केले
काळजाला सारखा जाळीत गेलो
मी तिला भेटायचे टाळीत गेलो
हात धरुनी सावली गेली उन्हाचा
मी तिचे आभास कुरवाळीत गेलो
टाकली किरणे कोणी वाटेत माझ्या
मी प्रकाशालाच ठेचाळीत गेलो
सांग कुठल्या प्रार्थना चा हात होता ?
घात तू केलास की अपघात होता ?
व्यर्थ मी अभिषेक केला आसवांचा
मानलेला देव पाषाणात होता
लावला ज्याने दिवा माझ्या उशाला
तो खरा तर एक झंजावात होता
इलाही सरांच्या सततच्या पाठपुराव्याने मी गांभीर्याने गझलाभ्यास सुरू केला. त्याचवेळी मला श्री. सुरेशकुमार वैराळकर यांच्याकडून 'गझलेची बाराखडी' प्राप्त झाली आणि मग हळूहळू मला गझलतंत्र जमायला लागलं. मी गझल लिहायचा सराव करत गेलो. हळूहळू माझी लेखनातली भीड चेपली आणि तोडकं मोडकं लिहून मी जेव्हा काही शेर किंवा गझल त्यांना फोनवर ऐकवायचो तेव्हा ते माझं खूप कौतुक करायचे, प्रोत्साहन द्यायचे, आवश्यक तिथे सूचनाही करायचे. जेव्हा मी त्यांना म्हणायचो की, "नशीबाने तुमच्यासारखा गुरू लाभलाय सर", तेव्हा लगेच म्हणायचे, "व्यंकट, एक लक्षात ठेव, स्वतःला कधीही लघू समजायचं नाही".
माझ्या गझल लेखनाचं रोप इलाही सरांनी लावलं. मी महाराष्ट्राबाहेर रहात असल्यामुळे त्यांच्याशी नेहमी फोनवरच संपर्क असायचा. कामामुळे कधी फोन करायला जमलं नाही तर सरांना करमत नसे. मग त्यांचा स्वतःहून फोन यायचा. प्रसंगी याबद्दल ते मला रागवायचे देखील. पण त्या रागावण्यातही प्रेम दडलेलं असायचं. आस्थेने अपर्णा, श्रावणी, स्वरा या सगळ्यांबद्दल विचारायचे.
एकटेपण
इलाही जमादार हे तसे एकटेच. पत्नी, मुलगा, सून यांचं अकाली निधन, यामुळे सर गेली कित्येक वर्ष पुण्यात एकटेच राहायचे. शिक्षण संपल्यावर नौकरीनिमित्त ते पुण्यात पहिल्यांदा आले तेव्हा त्यांचं एकटेपण, एकांत, त्यांना खायला उठायचा. घर प्रथमच सोडलेलं. पुण्यात फारशा ओळखी नव्हत्या. हा एकांत, एकटेपण आणि मुळात स्वभावातील बुजरेपणा यामुळे त्यांच्या मनातील विचार कागदावर उतरवायला त्यांनी सुरुवात केली. पुढे श्री. सुरेशचंद्र नाडकर्णीं यांच्यामुळे गझल तंत्राची ओळख आणि गझल लेखनाची सुरुवात झाली. मुळातच अंगी असलेली उत्तम काव्य प्रतिभा आणि गझलेच्या आकृतिबंधाचं गारुड, यामुळे त्यांनी आपलं उभं आयुष्य गझलेला अर्पण केलं. मागील काही वर्षांत इलाही सरांनी दोहे पण लिहिले. नांदेडच्या प्रा. विकास कदम या त्यांच्या मानसपुत्राने 'दोहे इलाहीचे' हे पुस्तक अपार श्रद्धेनं संपादित करून नुकतंच प्रकाशित केलं आहे.
आपल्या अजरामर गझलांमुळे इलाही जमादार यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात घरोघरी पोहोचलं. नांदेड, लातूर, मराठवाडा, विदर्भात त्याना खूप प्रेम मिळालं.
वार्धक्य आणि आजारपण
मागील काही वर्षांपासून इलाही सरांची तब्येत त्यांना साथ देत नव्हती. बोलताना म्हणायचे, "आता माझी स्मरणशक्ती कमी झालीय, गझल लेखनही थांबलंय. आता तुम्ही मुलं लिहाल तेच माझ्यासाठी खूप काही आहे." दरवर्षी १ मार्चला त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना काहीतरी नवीन लिहिलेलं ऐकवलं की म्हणायचे, "माझ्यासाठी हेच बर्थडे गिफ्ट आहे."
मृत्यूपूर्वी काही महिने आगोदर त्यांची तब्येत खालावत गेली. पं. हृदयनाथ मंगेशकरांनी मात्र जातीनं लक्ष घालून, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात इलाही सरांवर मोफत उपचार केले. एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराचा केलेला तो आदर, सन्मानच होता.
इलाही सरांचे मानसपुत्र
तसं पाहिलं तर इलाही सरांवर महाराष्ट्र आणि महाष्ट्राबाहेरील असंख्य रसिकांनी भरभरून प्रेम केलं. पण माझ्या माहितीत इलाही सरांचे दोन मानसपुत्र, ज्यांनी सरांवर जिवापाड प्रेम केलं, मनापासून त्यांची सेवा केली, असे नांदेडचे प्राध्यापक विकास कदम आणि पुण्याचे मंगेश रूपटक्के. इलाही सरांच्या आजारपणात मंगेशने पोटच्या मुलाप्रमाणे इलाही सरांची सेवा केली. सरांची तब्येत बरी होत नाही हे पाहून कित्येक वेळा मंगेशला भावविवश, हळवं झालेलं मी जवळून पाहिलंय, अनुभवलंय. शरीर थकल्यामुळे केल्या जाणाऱ्या उपचारांवर सरांच्या शरीराने सकारात्मक असा प्रतिसाद दिला नाही आणि दिवसेंदिवस सरांची तब्येत खालावत गेली. पुढे इलाही सरांच्या नातेवाईकांनी त्यांना पुण्यावरून सांगली येथे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. शेवटच्या दिवसात त्यांची शुश्रूषा केली. पण शेवटी 'ईश्वरेच्छा बलीयसी'...
जन्मठेप, आत्म्याला कोणी, दिली `इलाही’?
कुडीस, कारावास म्हणालो, चुकले का हो?
असं म्हणणारे गझलपुत्र इलाही जमादार यांची वयाच्या ७५ व्या वर्षी कुडीच्या कारावासातून कायमची सुटका झाली. आपल्या आयुष्याची अखेर कशी व्हावी हे इलाही जमादार यांनी अगोदरच ठरवून टाकलेलं होतं. ते म्हणतात...
पंचमहाभूतांनाच आज सांगणार आहे मी
माझी तिरडी उचलायला
खांदे द्या, मडकं धरा
आणि...
तुमच्यातच तुम्ही मला
घेऊन चला
मात्र...
परत हा
उपद्व्याप
करू नका!
आपल्या आशयघन गझलांमधून, इलाही सर तमाम मराठी गझलकार, गायक, संगीतकार आणि रसिकांच्या मनामध्ये सतत राहणारंच आहेत. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
...............................
व्यंकटेश कुलकर्णी, हैदराबाद
मनस्पर्शी
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद घेवारे साहेब 🙏
ReplyDelete