तीन गझलाः निशा डांगे

१.

लोकनिंदेच्या मुळावर वार झाला पाहिजे
शेर गझलेचा असा दमदार झाला पाहिजे

आग धगधगती असावी एवढी डोळ्यांमधे
फक्त नजरेनेच शत्रू ठार झाला पाहिजे

थेट छातीवर करो पण वार पाठीवर नको 
एवढा दिलदार माझा यार झाला पाहिजे

आपल्या नात्यात अनुभव जो मिठागत भेटला
तोच जीवन पोषणाचा क्षार झाला पाहिजे

छान मुरल्यावर उमाळे आठवांचे अंतरी
वेदनांचा गोड, आंबट खार झाला पाहिजे

२.

रीत दुनियेची मलाही पाळता येते
आपल्या गरजेप्रमाणे वागता येते

कोरडे नाते तुझ्याशी राखता येते
जोडता येते हवे तर तोडता येते

लाखदा येवोत दुःखे अंगणी माझ्या 
ओंजळीमधल्या सुखांना वाटता येते

भोवती काळोख मोठा दाटतो जेव्हा
ज्योत आशेची नव्याने लावता येते

वाचले नाहीत मोठे ग्रंथ मी केव्हा
जीवनाच्या पुस्तकाला चाळता येते

बघ मला सुद्धा बहाणे सांगणे जमते
बोलण्याचे, भेटण्याचे टाळता येते

काळजावर तू कितीही वार कर माझ्या
काळजाच्या वेदनांना झाकता येते

३.

लपवेन अंतरी मी सारे गुपीत माझ्या
अंगार आठवांचा आहे धगीत माझ्या 

ठेवू नकोस कुठली याहून तू अपेक्षा
स्वीकार जे मिळाले केवळ मिठीत माझ्या 

विझणार पेटलेला वणवा क्षणात एका
सामर्थ्य ठेवले हे मी फुंकरीत माझ्या

गाठायचे नभाला ठरवून झोपल्यावर
येतात चांदण्यांची स्वप्ने कुशीत माझ्या

आयुष्य आज इतके गतिमान होत आहे
क्षण ठेवले निसटते काही मुठीत माझ्या!

थकशील एकदा तू दुःखा छळून मजला
घेशील तू विसावा तेव्हा कुशीत माझ्या

दर्शन अखेर दे तू केव्हातरी विठोबा
राखून श्वास तितके ठेवी कुडीत माझ्या!
........................
निशा डांगे/नायगांवकर
पुसद

26 comments:

  1. वाह, सुरेख... तिन्ही गझला...

    ReplyDelete
  2. मनःपूर्वक धन्यवाद गझलकार सीमोल्लंघन
    आदरणीय श्रीकृष्ण राऊत सर

    ReplyDelete
  3. तीनही गझला छान आहेत निशा ताई.... मनःपूर्वक अभिनंदन 🌹🌹🌹

    ReplyDelete
  4. वाह छान गझला निशा

    ReplyDelete
  5. वाहहह...खूप छान

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद दादा

      Delete
  6. Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद

      Delete
  7. वाह....निशाताई

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद

      Delete
  8. वाह... कित्ती सुंदर...

    ReplyDelete
  9. तीनही गझल अप्रतिम

    काव्या शिरभाते

    ReplyDelete
  10. खूप छान निशा

    ReplyDelete
  11. मनःपूर्वक धन्यवाद

    ReplyDelete
  12. धन्यवाद अंजू ताई

    ReplyDelete
  13. थकशील एकदा तू दुःखा छळून मजला
    घेशील तू विसावा तेव्हा कुशीत माझ्या
    अतिशय सुरेख

    ReplyDelete
  14. अतिशय सुरेख

    ReplyDelete
  15. मनःपूर्वक धन्यवाद ताई

    ReplyDelete
  16. मनपूवर्क धन्यवाद स्मिता ताई

    ReplyDelete
  17. वा अतिशय मंत्रमुग्ध करणाऱ्या गझल आहेत....अप्रतिम आहे निशा ताई

    ReplyDelete
  18. अतिशय सुंदर सर्वच गझल निशाताई

    ReplyDelete
  19. दमदार लेखन ,अभिव्यक्ती प्रभावी

    ReplyDelete