१.
काळजाला जाळण्याची हौस नाही राहिली!
हात त्याचा मागण्याची हौस नाही राहिली!
जाणले मी कोरडेपण त्या किनाऱ्याचे जसे
मग किनारा गाठण्याची हौस नाही राहिली!
दोन शब्दांनीच त्याच्या वार केले खोलवर
फार काही ऐकण्याची हौस नाही राहिली!
घेतला आहेस प्रेमा जीव माझा एवढा
जीव फिरुनी लावण्याची हौस नाही राहिली!
फक्त नावालाच आहे एवढा गोतावळा
फार नाती जोडण्याची हौस नाही राहिली!
देह सारा भस्म झाला पोळले काळीजही
या उन्हावर भाळण्याची हौस नाही राहिली!
भांडले होते तुझ्याशी प्रेम आहे म्हणुन तर
मग कुणाशी भांडण्याची हौस नाही राहिली!
२.
अशी झोप यावी मला गाढ आता
न येवो कधीही पुन्हा जाग आता
उभा जन्म सरला तुला साद देता
नको शेवटाला तुझी हाक आता
बसू दे सुखाला घडी दो घडी तू
नको वेदने वाजवू दार आता
सजा भेटली हाय! प्रेमात इतकी
कशाला कुणावर पुन्हा भाळ आता
किती रक्तबंबाळ काळीज झाले
कसे सांग खोडू तुझे नाव आता
जरी पाहिली वाट मी जन्मभर पण
पडावी न माझी तुझी गाठ आता
किती जीवना त्रास द्यावा मला तू
किती आठवू सांग गतकाळ आता
३.
ओठ बघू हे गाल बघू
की डोळ्यांचे जाल बघू ?
हाती दे तू हात तुझा
नंतर पुढचे हाल बघू
पुरी गुलाबी झाले मी
तो होतो का लाल बघू
मिठी किती उबदार तुझी
कशास दुसरी शाल बघू
सोबत राहू दोघेही
जाते कैसे साल बघू
त्याच्यासाठी हरले मी
आता त्याची चाल बघू
राम बघू सीतेचा की
तुझ्यात मी गोपाल बघू ?
.....................
अनिता बोडके
No comments:
Post a Comment