१.
मर्जी तुझ्या मनाची मी राखतोय हल्ली
आतून काळजाला मी जाळतोय हल्ली
वचने तुला दिलेली भुललो कधीच नाही
वचनेच सोबतीला मी ठेवतोय हल्ली
पाना फुलांत आता दिसतेस तूच मजला
समजून तू ! तयांशी मी बोलतोय हल्ली
जाणायला सखे मी आता तुझी खुशाली
हा चेहरा तुझा बघ मी वाचतोय हल्ली
मिटणार सांग केव्हा ? भलताच हा दुरावा !
ती वाट भेटण्याची मी पाहतोय हल्ली
सहवास हा तुझा पण लाभून काय गेला !
दुनियेत मैतरीच्या मी गाजतोय हल्ली
देणार साथ माझी ? वाटेत जीवनाच्या
ही वाट एकटा बघ मी चालतोय हल्ली
जावून 'माहुरेला' भेटून घे जराशी
दु:खात हाक तुजला तो मारतोय हल्ली
२.
पाहून संकटांना खचणार ना कधी मी
सांगून द्या तयांना झुकणार ना कधी मी
आलीत वादळे जर थैमान घालण्याला
कमजोर वादळांनी मिटणार ना कधी मी
ऐकून बोल आहे माझ्याच माणसांचे
चाखूनही प्रशंसा फसणार ना कधी मी
ही वाट एकट्याने मी चालतो निरंतर
गर्दीत माणसांच्या घुसणार ना कधी मी
माझ्या मनात वसते करुणा, दया, अहिंसा
वाईटही कुणाचे करणार ना कधी मी
आश्वासने कशाला देता उगीच आता ?
अन्याय पाहुनी गप बसणार ना कधी मी
.......................
प्रसेनजीत सुभाषराव माहुरे
काशिखेड, धामणगाव रेल्वे.
जि. अमरावती
मो.नं. 9373401869
No comments:
Post a Comment