तीन गझला : आर.के. आठवले


१.

इतकी नकोस लावू जोरात एक खिडकी
गाजेल बघ अशाने गावात एक खिडकी

असते सताड उघडी स्वप्नात गुंतलेली
पडली असेल नक्की प्रेमात एक खिडकी

बघ चावला असावा भुंगा तिला प्रितीचा
असते सदैव अपुल्या नादात एक खिडकी

बघतात दोन डोळे चोरून लाजणारे
का पाडते मला ही पेचात एक खिडकी ?

बघताच फार गर्दी  कारण मला कळाले
आली अता अशातच भावात एक खिडकी

कळले कधीच नाही धुडकावले मला का?
सलते अजून माझ्या हृदयात एक खिडकी

गुणधर्म चुंबकाचे वरदान लाभले अन्
भलतेच वागते मग तोऱ्यात एक खिडकी!

होत्या हजार खिडक्या हासून बोलणाऱ्या
पण वेगळीच होती साऱ्यात एक खिडकी

मी फक्त हासलो अन् दिसतेस गोड म्हटले
का बंद जाहली मग रागात एक खिडकी ?

२.

येतो जुन्या स्मृतींना घेऊन पावसाळा
जातो किती मनाला जाळून पावसाळा

तो सांद्र भास न्यारा होता तुझ्या मिठीचा
झरतात खूप डोळे पाहून पावसाळा

भरपावसात पडली दोघांत ही दरी अन्
गेलाय जीवनाशी खेळून पावसाळा

खडकाळ काळजावर हिरवळ फुटून येते
जातो मनात जेव्हा गाऊन पावसाळा

असणार या सरींना गतकाळ बाधलेला
पाहू चला गड्यांनो चाळून पावसाळा

रोखू कसा नदी मी, डोळ्यात दाटलेली
येतात वेदनाही माळून पावसाळा

ही लालसा असावी तुज पाहण्यास चिंब
मुद्दाम टाकतो हा भिजवून पावसाळा

३.

प्रेम कुणाला जुमानते का, करणाऱ्यांनी सांगावे
नशा प्रितीची कशी उतरते चढणाऱ्यांनी सांगावे

उठता बसता मनास छळतो, प्रेमभंग का इतकाही ?
'नकार' कळता, कसे जगावे, जगणाऱ्यांनी सांगावे

एक शब्दही बोलत नाही, वळून बघते जातांना
असे मनाला का छेडावे, वळणाऱ्यांनी सांगावे

हसण्याचा मी विषयच झालो, इतक्या वेळा हरलो मी
हार पचविणे जमते का ते, हसणाऱ्यांनी सांगावे

पोटासाठी घास मिळविण्या, धाप लागते कशी, किती
स्पर्धेच्या या युगात आता, पळणाऱ्यांनी सांगावे

........................             
आर.के.आठवले
आनंद पार्क, भराडी रोड सिल्लोड ता. सिल्लोड जि. औरंगाबाद
9011895917

No comments:

Post a Comment