दोन गझला : सिराज शिकलगार

१.

आज काल फार लाड, चालले तुझे सखे
वागणे तरीच द्वाड, जाहले तुझे सखे
 
काल माय बाप याद काढता जरा कुठे
आज पाय खाड खाड, चालले तुझे सखे

रोज रोज या मनात, दार वाजते तुझे
आज का असे कवाड, झाकले तुझे सखे

जाहलो निराश फार, फळ कधी मिळेल का
भासते उगाच झाड, वाढले तुझे सखे

शब्द एक गोड गोड, का तुझ्या मुखी नसे
वदन फक्त ताड ताड, चालले तुझे सखे

ऐकतो तुझेच रोज, बोल बोल बोलणे
वाटते जिभेस हाड वाढले तुझे सखे

मीलनास आज फार ओढ वाटते तुला
बोलणे तरी लबाड जाहले तुझे सखे

२.

का बरे माझे कुणाला, बोलणे हे पटत नाही
यार माझी जिंदगानी, का बरे ही कटत नाही

पेलतो ना जोखमीचा, ताण माझ्या या तनूला
राहते ध्यानात ना जे, मी उगी ते रटत नाही

भासले सोपे मला जे, तेवढे मी घेत आलो
जे जिवाला त्रास देते, मी तयाला झटत नाही

ढीग आहे दाैलतीचा, हाव बाकी खूप आहे
दान केले सर्व ज्याने, रास त्याची हटत नाही

भावते भोळे मनाला, आस त्याची या जिवाला
रोखले मी लालसेला, हाव काही घटत नाही

जोडले ना हात कोठे, जाहलो लाचार नाही
रोखल्या वाटा कुणी त्या, काम माझे तटत नाही

भावतो जो मित्र त्याला, अर्पितो सर्वस्व माझे
भाव नाही स्वस्त माझा, मी कुणाला गटत नाही

No comments:

Post a Comment