तीन गझला : विनोद गहाणे




१.

उन्हाचे कायदे वेडे,मला पाळायचे होते
तुला तापायचे होते,मला बरसायचे होते

व्यथे तू थांब थोडीशी,नको जाऊस माघारी
सुखाची झोप झाल्यावर,जरा भांडायचे होते

मनाच्या गर्द गाभारी,नकाशा कोरला असता
तुला फाडायचे होते,मला जुळवायचे होते

तुझ्या ताटातुटीनंतर,उरी हा पेटला श्रावण
मला विझवायचे होते,तुला जाळायचे होते

ढगाच्या आड लपलेल्या,घमंडी पावसाला त्या
भुईवर ना बरसल्याने,जरा चिडवायचे होते

तहानेने धरा सारी,जरा व्याकूळ झाल्यावर
तुझ्या हृदयातले निर्मळ,झरे आटायचे होते

२.

शेतातल्या पिकांची,मी कूस होत गेलो
भेगाळल्या भुईचा,पाऊस होत गेलो

अक्कल गहाण माझी,नेत्यापुढेच सारी
निष्पाप दंगलीचा,धुडगूस होत गेलो

मी जात चोरल्याचा,आरोप हा कशाला
मी तर क्षणाक्षणाला,माणूस होत गेलो

माधुर्य शोधतांना,ओठातला तुझ्या मी
बागेत कोकणाच्या, हापूस होत गेलो

आधार पेरणीला,थोडा तरी मिळाया
ग्रीष्मातल्या उन्हाचा,पाऊस होत गेलो

३.

कारुण्य प्रेम माया,हृदयात पाळ आता
तू बुध्द अंतरीचा,दररोज चाळ आता

आगीत देह माझा,जळणार हा भलेही
पेटून मी नव्याने,लिहिणार काळ आता

तू मागल्या स्मृतींना,देऊ नको उजाळा
जुळवून वेदनेशी,घेतोय नाळ  आता

सत्तेत भागिदारी,जेव्हा मला मिळाली
आधी जहाल होतो,झालो मवाळ आता

अंदाज पावसाचा,मज बांधता न आला
माझेच शेत मजला,म्हणती गचाळ आता 

2 comments: