दोन गझला : विनोद बुरबुरे

 


१.

तुटलो जरी कधीचा झुकलो कधीच नाही
माझ्याच अस्मितेला मुकलो कधीच नाही

दु:खास पाळताना जगणे हलंत झाले
सल घेउनी उरी ती झुरलो कधीच नाही

गळफास टाकलेले वाटेत लाख होते
पडलो जरी कितीदा फसलो कधीच नाही

मी दूत यातनांचा मी दूत चंदनाचा
गेलो उगाळल्या पण सरलो कधीच नाही

हृदयी रुते तयांच्या माझे भणंग गाणे
कलदार मी कुणाला पचलो कधीच नाही

हे युद्ध भाकरीशी आहे सुरू निरंतर
ना जिंकलो भलेही हरलो कधीच नाही

२.

पाजुनी सत्तेस सांगा आज केले तूल कोणी ?
काय चलनाची गुलाबी ही दिली का भूल कोणी ?

आमच्या दुरडीत साधी एक भाकर आज नाही
ठेवली आश्वासनावर ही उपाशी चूल कोणी ?

ती रमा होईल अथवा माय सावित्री, जिजाई
पोटच्या बागेतले मग का खुडावे फूल कोणी ?

वारसा हा चालवाया चळवळीचा सत्यशोधक
घेत का नाही कुणी यशवंत दत्तक मूल कोणी ?

शुद्ध त्यागाचा वसा सांभाळण्या हा गौतमाचा
येत नाही का समोरी आजही राहूल कोणी ?

मी धरण ओथंबलेले काळजाच्या आत भरतो
या जरा मग बंधुतेचा आज बांधा पूल कोणी !

....................................
विनोद बुरबुरे
यवतमाळ
९०९६७०८३७७

No comments:

Post a Comment