तीन गझला : मीना शिंदे




१.

माझे मी पण गळून पडते तुझ्यापुढे
तू सुखकर्ता म्हणून झुकते तुझ्यापुढे 

दिवाळखोरी करून गेला कुलदीपक
घर उजळाया पणती जळते तुझ्यापुढे 

विश्वासाने हात पकडला मैत्रीचा
व्यथा वेदना सांगत बसते तुझ्यापुढे 

निवांत निजला स्वप्ने पाहत विजयाची
मंद गतीचे कासव पळते तुझ्यापुढे

गणित मांडले दुर्दैवाने चुकले ते
रडगाण्याचे पाढे म्हणते तुझ्यापुढे

आठवणींचा त्रासच होतो 'मीना 'ला
उघडपणे ती कबूल करते तुझ्यापुढे

२.

सरीसारखी  रिमझिमताना तुला पाहतो
झ-यासारखी खळाळताना तुला पाहतो

सायंकाळी दिवा लावते तुळशीपाशी
ज्योती सम तू प्रकाशताना तुला पाहतो

आठवणींचा चाफा जपला हृदयी माझ्या 
फुलांसारखी दरवळताना तुला पाहतो

ओढ लागली तुला अनावर समर्पणाची
नदीसारखी झुळझुळताना तुला पाहतो

तू येताना दिसते तेव्हा डोळे दिपती
विजेसारखी लखलखताना तुला पाहतो

मोत्यासम मी तुला जपावे वाटे 'मीना' 
दवासारखी चमचमताना तुला पाहतो

३.

मैत्रिणींना वाटते मी सोनचाफा
गंधवेडी हुंगते मी सोनचाफा

झाड याचे लावलेले अंगणी मी
आवडीने माळते मी सोनचाफा

काळजीने काळजाला जाळताना
काळजावर ठेवते मी सोनचाफा

वेदनेला अन् व्यथेला दूर नेतो
रोज जेव्हा पाहते मी सोनचाफा

रंग त्याचा गंध त्याचा तोच सृष्टी  विठ्ठलाला वाहते मी सोनचाफा

2 comments: