तीन गझला : डॉ. सुनील अहिरराव

१.

नेमके केले खुले अंबर कशासाठी ?
छाटले आहेस माझे पर कशासाठी ?

जे जसे होते, क्षणापुरतेच होते तर
तेच आता वा पुन्हा नंतर कशासाठी 

जाणतो की दु:ख माझे फाटके होते
भरजरी त्याच्यावरी चादर कशासाठी

फैसला घेऊन झाला तर कृतीही कर
ऐनवेळेला जमाखातर कशासाठी

शब्द काळोखेनिळे उच्चारतानाही
काळजावरती गुलाबी शर कशासाठी 
 
हा तुझा लखलाभ तुज मेळा हुजूऱ्यांचा
आणखी गर्दीत माझी भर कशासाठी 

देउनी झाले तुला पर्वत, नद्या, सागर...
हा तुझा माझ्यातला वावर कशासाठी 

२. 

अजून माया पातळ झाली नाही
रिक्त दुखाची ओंजळ झाली नाही 

तुझ्या दिशेने एक वावटळ आली 
पण साधीशी सळसळ झाली नाही 

तुझ्या दर्शनासाठी आलो आहे 
नी अजुनी पत्रावळ झाली नाही

सहज वेगळे झालो होतो आपण
जरा कुठेही खळखळ झाली नाही 

मी पापी होतोच कदाचित तितका
मी गेल्यावर हळहळ झाली नाही 

दृष्ट तुला लागेल कदाचित माझी 
रात पुरेशी काजळ झाली नाही

३.

चेहरा निस्तेज अन पोटे खपाटीला..
शेवटी आलीच दु:खे भरभराटीला

मी युगापासून रांगेतच उभा आहे 
कोणता पर्याय आहे दाटिवाटीला 

द्यायचे तर दे मनापासून हे अंबर 
ही अशी कोरू नये उन्हे ललाटीला 

लांघली आपण गिरीशिखरे किती वेळा
नी इथे आलो पुन्हा सागरसपाटीला 

याच रस्त्याने कुठेसे घर तुझे आहे
नावही नाही कुठे दारास पाटीला 

त्याच वळणावर, जिथे भेटायचो आपण
आजही येतो तिथेच सुगंध माटीला 

No comments:

Post a Comment