१.
अंतरातले हेतू जर का सुंदर असते
दोघांमध्ये हाकेइतके अंतर असते
प्रश्न लटकले नसते मित्रा फासावरती
जगण्यासाठी शिल्लक थोडे उत्तर असते
एक 'निरंतर शाळा' आहे जीवन म्हणजे
'पुस्तकबाह्य अनुभव' त्याचे दप्तर असते
प्रीती म्हणजे दुसरे तिसरे नसते काही
चिडीचूपसे दरवळणारे अत्तर असते
अवतीभवती मुकी वाजते अभिन्न टाळी
कुणी तनाने, कुणी मनाने किन्नर असते
२.
सुचण्याआधी खूप खोलवर मुरते जीवन
जणू स्वतःच्या प्रेमामध्ये पडते जीवन
धडपडते अन् कोष फोडते अखेर उडते
लढते म्हणून फूलपाखरू बनते जीवन
याला बदलू त्याला बदलू करता करता
स्वतः बदलते तेव्हा कोठे कळते जीवन
छापा-काटा,जन्म नि मृत्यू जुळ्या नोकऱ्या
चलनापोटी नाणे बदलत बसते जीवन
व्यक्ती मरते तरी निरंतर जीवन पळते
"मृत्यूलाही मृत्यू नसतो" म्हणते जीवन
ज्या गुणगुणल्या,ज्या अनुभवल्या मौनामध्ये
त्या ओळींनी हसते रडते सजते जीवन
देह म्हणाला,"जिद्दीचे मन अपंग नसते.
तिच्या बळावर एवरेस्टही चढते जीवन"
३.
यातनांचे जागरण अन् तोच गोंधळ
तू युगांचे ठणकणारे बदल संबळ
कागदावर काळजावर की मनावर
सांग कोठे रक्त अश्रू सुकवले वळ
कोण आई,सून,आजी,लेक ताई ?
फक्त मादी! फक्त धुंदी !फक्त चंगळ?
तू चितेवर जिंदगीवर फेकलेली
धर्मवेड्या सांत्वनांची धूळ निव्वळ
हासवावी खेळवावी जोजवावी
काळजावर रांगणारी मुग्ध सळसळ
भोगलेले दुःखधारी सुख म्हणाले
गझल म्हणजे जीवनाची अमर हळहळ
........................
विजया टाळकुटे
No comments:
Post a Comment