दोन गझला : रामदास घुंगटकर



१.

उधारीत जगणे जगावे कशाला
इथे रोज थोडे मरावे कशाला ?

किती धावलो पण तरी सापडेना
अशा सावलीला धरावे कशाला ?

अबोल्यात मिटले जुने वैर सारे
उगा शब्द खर्ची करावे कशाला ?

सुगंधीत झाले उरी घाव ओले
विचारात आता सडावे कशाला ?

अरे क्षीण झाले तुझे पंख आता
खुल्या आसमंती उडावे कशाला?

नसे स्वाद काही, उगी पोट भरणी
अशा पंगतीला  बसावे कशाला ?

२.

उरलेत  श्वास थोडे, असणे  हुशार आता
कळला न डाव अंती, हरला जुगार आता

लिहितो  खुशाल सारे जगण्यातले तराणे
गझलेस आज माझ्या चढला खुमार आता

सुटतात सर्व गुंते सरणावरीच जळता
करपून का जगावे,नुसते उधार आता

दररोजच्या चितेवर  जळती जिवंत प्रेते
जगण्यास राहिला ना कसला सुमार आता

वटवून जन्म गेला किरदार माणसाचा
जमले कुणास नाही करणे सुधार आता

गरजून शांत झाले,मुरले ढगात पाणी
पडल्या कुठे न धारा,उडले तुषार आता

....................................
रामदास घुंगटकर, पुसद        ९६२३७६५३०२

No comments:

Post a Comment