दोन गझला : अजित सपकाळ

१.

तुझ्या आठवांनी जळावे कशाला
सदा आसवांनी गळावे कशाला

हवी सोबतीला तुझी साथ मजला
मला पापण्यांनी छळावे कशाला

तुझी सांजवेळी अशी भेट झाली
उगा पौर्णिमेने ढळावे कशाला

तिला राेज चाेरून मी न्याहळावे
बघावे तिने पण वळावे कशाला

खुळा सावल्यांचा मनी खेळ चाले
मनाने तरी हळहळावे कशाला ?

निरागस मुखावर तुझे गोड हसणे
जलांनी मधे खळखळावे कशाला 

२.

विठूराया कुठे तू नांदतो आहे
भिमातीरी तुला मी शोधतो आहे

मनामध्ये नसे भक्ती नसे श्रद्धा
तरी खोटा मुखवटा लावतो आहे

कपाळी लावतो बुक्का मुखी नामे
दिखावा हा जगाचा पाहतो आहे

सुखाने ह्या कधी नाकारले जेव्हा
तरी मायाच तू का राखतो आहे

व्यथा ह्या झोपडीची रे कशी सांगू
भुकेची आग भारी झेलताे आहे

जहाजाच्या शिडामध्ये शिरे वारा 
तरीही वादळांना पेलतो आहे

फुलांच्या ओंजळी मी वाहिल्या चरणी 
खुळ्या जगतास  कचरा भासतो आहे

........................
 
अजित सपकाळ
9766201539

No comments:

Post a Comment