तीन गझला : सुधीर कांबळे



१.

हे घाव का मनीचे सोलून रात गेली
घायाळ काळजाला भेदून रात गेली

सांगून दुःख लोका, होते कधी कमी ते
का आस ही मनाला लावून रात गेली

देऊ नकोस जागा द्वेषास जीवनी तू
बुद्धत्व गौतमाला देऊन रात गेली

जाळा खुशाल गावे,कापा खुशाल आम्हा
रक्तात भीमराया पेरून रात गेली

गातोस का सुधीरा तू गीत वेदनांचे
आहे तुझी सखी ती सांगून रात गेली

२.

जीवना तू सोस थोडा त्रास माझा
आवरू मी लागलो रे श्वास माझा

घाव दे तू जिंदगी ताजे तवाने
सुख तुझे भासे मला गळफास माझा

लावली बोली जरी माझीच त्याने
तोच होता यार तेंव्हा खास माझा

चारली मी धूळ जेंव्हा शेवटी रे
सारखा पाण्यात त्याला भास माझा

पाजती जे गाढवा पाणी दयाळू
चोरती ताटातला ते घास माझा

३.

जीवनाचे हेच माझ्या सार आता
लेकरू आईस होते भार आता

राहिले रे कोण येथे यार आता
सावल्याची भेट होते फार आता

टाळले सूर्यास मी नाना परीने
मेण झाले काळजाचे  दार आता

कोणती ही प्रीत राणी पाळती ते
मारतो लैलास मजनू ठार आता

शौक होती शायरी माझी कधी रे
शेर माझे काळजाची तार आता 

No comments:

Post a Comment