तीन गझला : योगेश उगले

१.

चला बोलावणे आले उगाचच धावणे आले 
पुन्हा ढोरांप्रमाणे जीव  हा ओढावणे आले 

कधी हाती न काही लागले या हेलपाट्यांनी 
म्हणूनच  शेवटी माथी असे पस्तावणे आले 

मनाशी  राहते  माझ्या  लटांबर  फक्त दुःखाचे 
बघाया सुख तुझ्या डोळ्यांमधे डोकावणे आले 

कशी सत्कार करण्यातच निपटली पाच वर्षे ही 
अता  मतदान  दात्यांना  पुन्हा लोभावणे आले 

व्यथेची साथ कायमची सुखाचा भास वरकरणी 
व्यथा  लाडात आली तर तिला लाडावणे आले 

तुझी दावण तुझा खुंटा तुझे आकाश हे, 'योगी' 
तुला नवथर तुझ्या स्वप्नास हे समजावणे आले 
 
२.

नको तेवढी धसमुसळ्यागत करते आहे 
एक व्यथा दररोज जिवाला छळते आहे 

कुठे  हुडकतो  अधोगतीचे  कारण तू?
पदोपदी बघ तुला भावकी नडते आहे 

तुझी वंचना नकोस मिरवू इथे बापड्या 
प्रत्येकाला  जीवन  हे  फरफटते  आहे 

गोड बोलुनी पोचारा तू  जरी फिरवशी
तुझ्या इराद्यामधली सापट दिसते आहे 

मर्यादांचे  कधी व्हायला नको  लोढणे 
नात्यामधले  मला  एवढे  कळते आहे 

सरणावरती  आयुष्याचे  सरमड पडले 
डोळ्यांपुढती एक चिता धगधगते आहे 

नियतीच्या ताटाला 'योगी' वटकावण दे 
सूख तुझे बघ इकडे तिकडे पळते आहे 
 
३.

सरावी रोजची वणवण अशी चाहुल जिवाला दे 
उगाचच रोज कळवळते  दिलासा या मनाला दे 

दिठीच्या उंबऱ्यापाशी थबकला, त्या  उजेडाची 
घडावी अंतरी उधळण अशी उजळण तमाला दे 

जरा डोकावुनी जिवना उराशी चंदनाच्या बघ 
सुगंधाची जशी वर्दळ तसा दरवळ सुखाला दे 

जगाला  देत आले  ते  स्वतःसाठी  जरा  घेइल 
स्वतःचा वेचुनी सौरभ अशी ओंजळ फुलाला दे 

तुझ्या संवेदनेपायी.. तुझ्या कोजागिरीठायी.. 
जसे ओथंबते अंबर तसा गहिवर उन्हाला दे 

इथे माझ्या निजेलाही तुझे सामीप्य नसले तर 
असे कर साजणी केवळ तुझी स्वप्ने उशाला दे 

तुझ्या डोळ्यांत पाजळते कशाची वंचना 'योगी'? 
तिला  उपसून  डोळ्यांतुन  समुद्राचा  हवाला दे 


No comments:

Post a Comment