तीन गझला : संतोष कांबळे


१.

जिंकणे तर दूर,साधे हारणे जमले कुठे?
पाहिलेले स्वप्नही साकारणे जमले कुठे?

वीट आलेल्या किती नात्यांमधे मी गुंतलो-
ही नकोशी माणसे झिडकारणे जमले कुठे?

धावला असतास तू,पण मी कमी पडलो,मला-
पायरीखालून हाका मारणे जमले कुठे?

ठेवले डांबून वादळ,अन् विजाही कोंडल्या-
पापण्यांचे छत मला शाकारणे जमले कुठे?

आपले सगळे कवडसे झोपडीभर पांगले-
आठवांचे कुड जुने पोतारणे जमले कुठे?

२.

तुला अद्याप जी उंची स्वत:ची वाटली होती
खरेतर ती खरी उंचीच नव्हती,सावली होती

तशी तर एवढी गाथा लिहू शकलाच नसता तो
परंतू त्या तुक्याच्या सोबतीला आवली होती

कुणाला काय सांगू,दातही माझेच होते ते
जयांनी काल माझी जीभ गाफिल चावली होती

अपेक्षा तू फुलांची आजही का ठेवतो वेड्या?
इथे जर तूच झाडे बाभळींची लावली होती!

जगाने मूल्यमापन काय केले,माहिती नाही
तुझ्या रेषेजवळ मी रेष मोठी आखली होती

अताशा सावळ्यासाठी जरी वेडावल्या दिंड्या
अगोदर फक्त रुक्मीणीच त्याला भाळली होती

तिला अडवू न शकला ऐनवेळी पाश कुठलाही
तिच्या डोळ्यांमधे कुठली विहिर डोकावली होती?

३.

तो जसा दिंडीत भगवा ध्वज असू शकतो
तो तसा मक्का,मदीना,हज असू शकतो

वाचता गाथा मला इतकेच कळले की,
या व्यवस्थेचा तुका सावज असू शकतो

आणखी निरखून न्याहाळून पाहू द्या
हा विठोबा आमचा पूर्वज असू शकतो

आतमध्ये एकदा डोकाव चोखोबा
खोल गाभार्‍यातही ऐवज असू शकतो

पायरीवर ठेव माथा दर्शनाआधी
पायरीखाली कुणी अंत्यज असू शकतो

........................
संतोष वि.कांबळे
९४०४९९८८८८

2 comments: